सध्याच्या ढगाळ वातावरणामुळे हरभ-यावर घाटेअळी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे तसेच रोप अवस्थेत हरभ-यामध्ये रोप कुरतडणा-या अळीचा देखील काही ठिकाणी प्रादुर्भाव होऊ शकतो त्याकरिता पुढील प्रमाणे किडींचे व्यवस्थापन करण्याचा सल्ला विद्यापीठ शास्त्रज्ञांनी दिला आहे.
घाटेअळीच्या व्यवस्थापनाकरीता शेतामध्ये इंग्रजी " T " आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत तसेच घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर पुढील पैकी कोणत्या एक रासायनिक किटकनाशकाची फवारणी करावी. इमामेक्टिन बेंझोएट ५ टक्के - ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ८८ ग्रॅम किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के - ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर ६० मिली किंवा फ्लुबेंडामाईड २० टक्के - ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे प्रती एकर १२५ ग्रॅम फवारावे. तसेच जमिनीलगत रोपे कुरतडणारी अळीचा प्रादुर्भाव असल्यास क्लोरपायरीफॉस २० टक्के - २० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे प्रति एकर ४०० मिली खोडाभोवती आळवणी करावी.
असा सल्ला कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ.जी.डी.गडदे, किटकशास्त्रज्ञ डॉ.डी.डी.पटाईत व श्री.एम.बी.मांडगे यांनी दिला असुन अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दुरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० यावर संपर्क करावा.
संदर्भ - संदेश क्रमांक: ०८/२०२१ (०२ डिसेंबर २०२१) कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वनामकृवि, परभणी