वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कापूस संशोधन योजना आणि केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर यांच्या वतीने कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन (आयआरएम) तंत्रज्ञान प्रसार प्रकल्प विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि आणि संचालक संशोधन डॉ.दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्प परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील टाकळगव्हाण, बाभळगाव, बोरगव्हाण आणि परभणी तालुक्यातील परळगव्हाण व ताडलिमला या गावातील प्रत्येकी १० याप्रमाणे एकूण ५० शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येत आहे. प्रकल्पातंर्गत एक दिवसीय दिनांक २५ जानेवारी रोजी शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे टाकळगव्हाण तालुका पाथरी येथे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्री. वैजनाथ महिपाल तर प्रमुख अतिथी म्हणून कापूस संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ. अशोक जाधव हे होते. प्रमुख मार्गदर्शक दिर्घकालीन खत प्रयोगाचे प्रभारी अधिकारी डॉ. रामप्रसाद खंदारे, प्रकल्प समन्वयक किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, वरीष्ठ संशोधन सहाय्यक डॉ. प्रशांत जाधव आदींची उपस्थिती होती.
मार्गदर्शनात डॉ. अशोक जाधव म्हणाले की, शेतकऱ्यांनी नेहमीच्या पद्धतीने कापूस लागवड न करता कमी कालावधीच्या वाणांची घन पध्दतीने लागवड करावी त्यामुळे हेक्टरी झाडांची संख्या वाढून सरासरी उत्पन्नात वाढ होईल त्यासोबतच शेतकऱ्यांनी ६० दिवसांनी झाडाची शेंडे खुडावीत किंवा शिफारशीनुसार वाढ रोधक रसायनांचा योग्य वापर करून झाडांची होणारी कायीक वाढ थांबविल्यास अधिक उत्पन्न मिळेल.
मनोगतात सरपंच श्री. वैजनाथ महिपाल यांनी विद्यापीठातर्फे हा कार्यक्रम त्यांच्या गावामध्ये आयोजित केल्याबद्दल विद्यापीठाचे आभार मानले आणि विद्यापीठातर्फे वेळोवेळी अशा कार्यक्रमाचे आयोजन करून कापसासोबतच ऊस, टरबूज व इतर फळबाग याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे असे मत व्यक्त केले.
मृदाशास्त्रज्ञ डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी पीक उत्पादन वाढीसाठी जमिनीचे आरोग्य बाबत माहिती देतांना म्हणाले की, जमिनीचा सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असुन शेणखत, हिरवळीचे खत, जैविक संवर्धने यांचा वापर करून अधिक उत्पन्न घ्यावे, असा सल्ला दिला.
डॉ.दिगंबर पटाईत यांनी कीटकनाशक प्रतिकारशक्ती व्यवस्थापन प्रकल्पा विषयी दिली माहिती शेतकऱ्यांनी कापूस शेती मध्ये गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करून प्रकल्पातील शेतकऱ्यांना वाटप केलेल्या निविष्ठ वापराबाबत माहिती देऊन फरदड न ठेवण्याचे आवाहन केले. कपाशी मधील एकात्मिक कीड व्यवस्थापन व कीटकनाशकाचा सुरक्षित वापर याविषयी मार्गदर्शन केले. तर डॉ. प्रशांत जाधव यांनी कापूस उत्पादन वाढीचे बारकावे सांगितले.
प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी श्री
ज्ञानेश्वर इंगळे यांनी प्रकल्पांतर्गत प्रकाशित दिनदर्शिका २०२३ मध्ये दिलेल्या
विविध तंत्रज्ञानाविषयी व विद्यापीठाच्या माहिती वाहिनीबद्दल माहिती दिली. मान्यवरांच्या
हस्ते प्रकल्पांतर्गत प्रकाशित दिनदर्शिका २०२३ चे विमोचन करून प्रशिक्षणार्थींना
वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी कृषिभुषण पुरस्कार प्राप्त
शेतकरी श्री. बाबासाहेब रणेर, ग्रामविकास अधिकारी श्री. राहुल मानोलीकर, रिलायन्स
फाउंडेशनच्या श्रीमती विजया ठेंगे, श्री. गणेश गिरी आदीसह
गावातील व परिसरातील २०० शेतकरी व महिला शेतकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन आत्माचे
सहायक तंत्र अधिकारी श्री.नितीन जाधवर यांनी केले तर आभार श्री.दिपक महिपाल यांनी मानले. कार्यक्रम
यशस्वीतेसाठी श्री.नारायण ढगे, दिपक महिपाल, अनिल महिपाल, अनिल तायनाक, रामप्रसाद तायनाक, दत्ता महिपाल, महादेव फुन्ने आदीसह समस्त गावकऱ्यांनी प्रयत्न केले.