उत्तर प्रदेशातील
गोरखपुर येथील महायोगी गोरखपुर कृषि विज्ञान केंद्राच्या वतीने दिनांक १० जानेवारी
ते १४ जानेवारी दरम्यान कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. कृषि महोत्सवातील
कृषी प्रदर्शनीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन
प्रकल्प पशुशक्तीचा योग्य वापर योजनेच्या वतीने विकसित विविध बैलचलित अवजाराचे
दालन शेतकरी बांधवाकरिता विशेष आकर्षणाचे केंद्र ठरले. सदर दालनास दिनांक १४ जानेवारी
रोजी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मा श्री योगी आदित्यनाथ यांनी भेट देऊन बैलचलित
अवजारांची पाहाणी केली. यावेळी कृषी अभियंता डॉ स्मिता सोलंकी, डॉ राहुल
रामटेके, अजय वाघमारे,
जी बी आडे,
रूपेश काकडे आदींनी मुख्यमंत्री यांना विविध अवजारांची माहिती
दिली. यात बैलचलित फवारणी यंत्र, बैलचलित बहुविध पेरणी यंत्र, धसकटे गोळा करणे अवजार, तिहेरी
कोळपे, बैलचलित सरी पाडणे यंत्र, ऊसाला माती लावणे अवजार, एक बैलाची अवजारे, बैलचलित सोलार तणनाशक व किटकनाशक फवारणी यंत्र आदींचा समावेश होता. यावेळी
डॉ स्मिता सोलंकी माहिती देतांना म्हणाल्या की, सदर यंत्र पर्यावरण
पुरक व गोरक्षकांना उपयुक्त असुन कमी खर्चिक आहेत. यावेळी माननीय मुख्यमंत्री यांनी
सपुर्ण कृषि अवजारांची माहिती घेऊन सदर अवजारांची प्रशंसा केली.
सदर कृषि
अवजारांचे दालन विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनानुसार
गोरखापुरे प्रदर्शनीत लावण्यात आले होते. मा डॉ इन्द्र मणि यांनी डॉ स्मिता सोलंकी
यांचे अभिनंदन करून म्हणाले की, परभणी कृषि विद्यापीठ विकसित अनेक यंत्र व तंत्रज्ञान हे
देशातील इतर राज्यातील शेतकरी बांधवाकरिताही उपयुक्त असुन विद्यापीठ विकसित यंत्रे जास्तीत
जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहचविण्याकरिता विविध कंपन्यासोबत सामंजस्य करार करण्याची प्रक्रिया चालु आहे.