Thursday, January 26, 2023

वनामकृवित प्रजासत्‍ताक दिन उत्‍साहात साजरा

देशाची सुरक्षा जवानांच्या हातात आहे आणि अन्न सुरक्षा शेतकऱ्यांच्या हातात आहे. शेतकरी बांधवाच्‍या कल्‍याणाकरिता आपण सर्वांनी मिळून काम करू असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या मुख्‍य प्रांगणात कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते ध्‍वजारोहण करून प्रजासत्‍ताक दिन साजरा करण्‍यात आला, त्‍यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धीरज‍कुमार कदम, विद्यापीठ नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कुशाळकर, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ जी एम वाघमारे, विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी प्रजासत्‍ताक दिनांच्‍या सर्वांना शुभेच्‍छा देऊन पुढे म्‍हणाले की, संपुर्ण देशात राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी लागू झाली आणि भारत हा लोकशाही देश बनला. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे, जे दोन वर्षे, अकरा महिने आणि अठरा दिवसांच्या अथक परिश्रमानंतर तयार करण्यात आले आहे. हा प्रजासत्ताक दिन भारतीय लोकांसाठी विशेष आहे, कारण यावर्षी आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही साजरा करत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयांच्या मनात देशभक्ती आणि मातृभूमीबद्दल अपार आपुलकी आणि आदर जागृत करतो. याप्रसंगी छात्रसेना अधिकारी डॉ. जयकुमार देशमुख यांच्‍या मार्गदर्शनाखाली छात्रसैनिकांनी कुलगुरू यांना मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री उदय वाईकर यांनी केले. कार्यक्रमास विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.