Monday, January 23, 2023

जीवनात यशस्‍वी होण्‍याकरिता दुरदृष्‍टी, शिस्‍त आणि कठोर मेहनत याची जोड पाहिजे...... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

वनामकृवितील परभणी कृषी महाविद्यालयात आयोजित नवप्रवेशित पदवीच्‍या विद्यार्थ्‍याचा स्‍वागत समारंभात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवानिमित्‍त शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मध्‍ये नवप्रवेशित पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या विद्यार्थ्‍याकरिता स्‍वागत समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, प्रमुख मार्गदर्शक शिक्षण तज्ञ श्री महेश पाटील उपस्थित होते. व्‍यासपीठावर प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, जिमखाना उपाध्‍यक्ष डॉ पी आर झंवर, शिक्षण प्रभारी डॉ आर व्‍ही चव्‍हाण, कार्यक्रम अधिकारी डॉ आर जी भाग्‍यवंत आदींची उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, प्रत्‍येक व्‍यक्‍तीला स्‍वत:ची जबाबदारी व कर्तव्‍याची जाणीव पाहिजे. जीवनात अनेक समस्‍या येतात, समस्‍यांना धीराने तोंड दिले पाहिजे. जीवनात यशस्‍वी होण्‍याकरिता दुरदृष्‍टी, शिस्‍त आणि कठोर मेहनत याची जोड पाहिजे. आपल्‍या मनात नकारत्‍मक विचार मोठया प्रमाणात येतात, परंतु नकारात्‍मक विचार जाणीवपुर्वक कमी करून सकारात्‍मक विचारांची पेरणी केली पाहिजे, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

शिक्षण तज्ञ श्री महेश पाटील म्‍हणाले की, महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्‍यांचे व्‍यक्‍तीमत्‍व विकसित होत असते. युवकांनी आपल्‍यातील ऊर्जा सकारात्‍मक कामाकरिता वापरावी. राष्‍ट्र बांधणीमध्‍ये युवकांचे मोठे योगदान आहे.

कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले. सुत्रसंचालन विद्यार्थी अभिषेक खराडे आणि प्रेम कांबळे यांनी केले तर आभार डॉ. आर जी भाग्‍यवंत यांनी मानले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. यावेळी आयोजित सांस्‍कृतिक कार्यक्रमात महाविद्यालयाच्‍या विद्यार्थ्‍यांनी कला सादर केल्‍या.