Monday, September 29, 2025

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या दीक्षारंभ कार्यक्रमाचा समारोप

 विद्यार्थ्यासाठी आम्ही आहोत – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रमाचा दिनांक २९ सप्टेंबर २०२५ रोजी समारोप करण्यात आला. अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. व्यासपीठावर सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे आणि विभाग प्रमुख डॉ वीणा भालेराव होत्या.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, “विद्यार्थ्यासाठी आम्ही आहोत” या भावनेतूनच विद्यापीठाचे कार्य चालते. त्यांनी गृह विज्ञान महाविद्यालयाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात झालेल्या परिवर्तनाचा इतिहास नमूद केला. पूर्वी या महाविद्यालयात केवळ मुलींनाच प्रवेश मिळत असे. मात्र भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने गृह विज्ञान या शाखेत बदल करून तिला सामुदायिक विज्ञान असे नाव दिले. यामध्ये समाजाशी निगडित समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असे उपयुक्त शिक्षण दिले जाते. शासनाने देखील गृह विज्ञान व सामुदायिक विज्ञान या पदव्यांना समान मान्यता दिली असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांना मिळत आहे.

सामुदायिक विज्ञान ही कृषी संलग्न शाखा असून, यात आरोग्य, आहार, स्वच्छता, आनंदी जीवन, व्यक्तिमत्व विकास, उद्योजकता विकास अशा विविध अंगांनी विद्यार्थ्यांची जडणघडण केली जाते. याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मशक्ती वाढीस लागते. हे विद्यापीठ अनेक राष्ट्रीय मानांकनात वरच्या क्रमांकावर असून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे अ’ दर्जा प्राप्त विद्यापीठ आहे. महाराष्ट्रातील एकमेव सामुदायिक विज्ञान महाविद्यालय या विद्यापीठात आहे, याचा उल्लेख करून माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

यावेळी त्यांनी विद्यापीठाची तुलना नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्थानाशी केली व त्याच दर्जाचे विद्यापीठ उभारण्याचा मानस व्यक्त केला. विद्यापीठात पायाभूत सुविधांची उभारणी करण्यासाठी विशेष प्रयत्न होत असल्याचे सांगत त्यांनी भविष्यात मुलींसाठी भव्य, आधुनिक व अद्ययावत वस्तीगृह उभारण्याची दृष्टी मांडली. विद्यापीठाच्या यशामागे साधेपणा आणि मेहनत हेच मुख्य घटक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

पूर्वी फक्त दीक्षांत समारंभ होत असत, मात्र नवीन शैक्षणिक धोरणानुसार दीक्षारंभ कार्यक्रमाला महत्त्व प्राप्त झाले आहे. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी महत्त्वाचे टप्पे समजावून सांगितले जातात. महाविद्यालयीन नियमावली, शैक्षणिक कार्यपद्धती, चांगल्या–वाईट सवयी, विद्यापीठ व पालकांच्या अपेक्षा याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते.

विद्यार्थ्यांना प्रेरित करताना माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, मेहनतीला आणि आनंदाला पर्याय नाही. प्रत्येकाने सरळ मार्गाने चालावे, आपले जीवन सुखी ठेवावे व कोणावरही राग धरणे टाळावे. शिक्षण हा केवळ ज्ञानप्राप्तीचा नव्हे तर चारित्र्य निर्माण करण्याचा भाग आहे. शिक्षणातून आपले जीवन घडते. प्रत्येकाने आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवले पाहिजे, भावनिक दृष्ट्या सक्षम राहिले पाहिजे. विनम्रता हीच खरी पात्रता असून पात्रतेतून धन मिळते, धनातून मदत करण्याची क्षमता निर्माण होते, त्यातून आनंद मिळतो व पुढे जीवन सुखमय होते.

त्यांनी पुढे सांगितले की, अहंभाव ठेवू नये. उत्कृष्ट नागरिक होण्यासाठी जीवनातील प्रत्येक आव्हान स्वीकारावे, एकमेकांना मदत करावी. यामध्येच खरा आनंद आहे. त्यांनी मानव आणि प्राणी यांच्या अवयवांच्या रचनेतील फरक समजावून देत विद्यार्थ्यांना आपले विचार नेहमी उंच ठेवण्याचा सल्ला दिला. कोणतीही द्वेषभावना न बाळगता क्षमाशील वृत्ती वाढवावी, यशस्वी जीवनाचे खरे मूल्य हेच आहे, असे सांगितले. शेवटी, कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा देत प्रार्थना केली.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, नवीन शैक्षणिक धोरणानुसार सामुदायिक विज्ञान अभ्यासक्रमांमध्ये अनेक सकारात्मक बदल झाले आहेत. या अभ्यासक्रमात आहार, व्यक्तिमत्व विकास, उद्योजकता विकास व कौशल्य विकास यांना विशेष महत्त्व दिले गेले असून त्यातही उद्योजकता विकासास प्राधान्य देण्यात आले आहे. याशिवाय, अनेक विषयांना दुरुस्त प्रणालीद्वारे अभ्यासक्रमाशी जोडण्यात आले आहे. या अभ्यासक्रमाचे हे एकमेव महाविद्यालय महाराष्ट्रातील अ’ दर्जा प्राप्त विद्यापीठात कार्यरत आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवेश मिळणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी अभिमानाची बाब आहे.

यशस्वी जीवनासाठी कौशल्याधारित शिक्षण फार महत्त्वाचे असून ते या महाविद्यालयात परिपूर्णरित्या उपलब्ध होणार आहे. यासाठी केवळ विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी. विद्यापीठाच्या मुख्यालयातच हे महाविद्यालय स्थापन असल्याने विद्यार्थ्यांना विद्यापीठातील सर्व अत्याधुनिक सुविधा मिळतात. या सुविधांचा योग्य लाभ घेत विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमामधून उत्कृष्ट नागरिक म्हणून घडावे, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी केले. त्यांनी मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या दीक्षारंभ कार्यक्रमात आयोजित व्याख्याने व विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमात प्रथम वर्षातील विद्यार्थीनी श्रावणी डोके आणि विद्यार्थी गौरव नरताम यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत महाविद्यालयात प्रवेश घेतल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या प्रसंगी विभागप्रमुख डॉ. विजया पवार व डॉ. नीता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे आयोजन सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण प्रभारी डॉ. वीणा भालेऱाव आणि दीक्षारंभ समारोप समन्वयक डॉ. शंकर पुरी यांनी केले. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.