Friday, March 11, 2016

बचत गट समुहांनी कंपन्या स्थापन करून सक्षम बनावे...... कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु

औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्रात जागतिक महिला दिनानिमित्‍त शेतकरी महिला मेळावा संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्‍या औरंगाबाद येथील कृषि विज्ञान केंद्र व कृषि विभागाचा आत्‍मा प्रकल्‍प यांचे संयुक्‍त वतीने दिनांक ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्‍त शेतकरी महिला मेळाव्‍याचे आयोजन औरंगाबाद कृषि विज्ञान केंद्रात करण्‍यात आले होते. मेळावे उदघाटन कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्‍वरलु यांच्‍या हस्‍ते झाले, तर प्रमुख पाहुणे म्‍हणुन विभागीय आयुक्‍त मा डॉ उमाकांत दांगट हे उपस्थित होते. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसलेडॉ प्रजा तल्‍हार, प्रा विजया नलावडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात कुलगुरू मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु म्‍हणाले की, कर्नाटक, गुजराज, तेलंगण राज्‍यात गेली 25 वर्षापुर्वीच बचत गटांची स्‍थापन होऊन या बचत गटांचा समुह संगणकाशी जोडुन वाटचाल करत आहेत. बचत गट निर्मीत मालाची बाजारात मोठी मागणी आली तरी ती पुर्ण करण्‍याची क्षमता महाराष्‍ट्रातही बचत गटांनी निर्माण करायला हवी, त्‍यासाठी अनेक बचत गट समुहाची एक कंपनी कार्यान्वित व्‍हावी, ही काळाची गरज आहे. बचत गटांच्‍या माध्‍यमातुन ग्रामीण अर्थकारण सुधारण्‍याची ताकद महिलांमध्‍ये असुन यासाठी अधिकाधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्‍त मा डॉ उमाकांत दांगट यांनी आपल्‍या भाषणात केले. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ बी बी भोसले आपल्‍या भाषणात विद्यापीठाच्‍या उमेद अभियानाचे उदिष्‍ट सांगुन दुष्‍काळ परिस्थितीत देखील महिलांनी घरच्‍यांचा मनोबल वाढविण्‍याचे कार्य करण्‍याचा सल्‍ला दिला.

मेहनत म्‍हणजे नफा व दुर्लक्ष म्‍हणजे तोटा हा मुलमंत्र डॉ प्रजा तल्‍हार यांनी दिला तर घराचे घरपण टिकवुन गृहलक्ष्‍मी ही धनलक्ष्‍मी व्‍हावी, यासाठी प्रयत्‍न करा, असे आवाहन प्रा विजया नलावडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक कार्यक्रम समन्‍वयक डॉ एस बी पवार यांनी केले. सुत्रसंचालन प्रा दिप्‍ती पाटगांवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा गीता यादव यांनी केले. कार्यक्रमास महिला शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होत्‍या. यावेळी महिला बचत गटांच्‍या विविध पदार्थाच्‍या समावेश असलेल्‍या प्रदर्शनीचे आयोजन करण्‍यात आले होते.  


Thursday, March 10, 2016

तेलबिया उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

वनामकृवितील अखिल भारतीय समन्‍वय करडई संशोधन प्रकल्‍प व हैद्राबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय तेलबिया विकास कार्यक्रमांतर्गत तेलबिया उत्पादन तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

Wednesday, March 9, 2016

गृहविज्ञान महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा


टिप - सदरील बातमी प्राचार्या, गृहविज्ञान महाविद्यालय, वनामकृवि, परभणी यांच्‍या कडुन प्राप्त

Friday, March 4, 2016

वनामकृवितील सहाय्यक नियंत्रक श्री दिवाकर काकडे सेवानिवृत्त

वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठातील कृषि महाविद्यालयाचे सहाय्यक नियंत्रक श्री दिवाकर काकडे दिनांक २९ फेब्रुवारी रोजी प्रदिर्घ विद्यापीठ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांनी विद्यापीठात निम्नस्तर शिक्षण विद्याशाखा, कृषि महाविद्यालय, उस्मानाबाद व कृषि महाविद्यालय, परभणी येथे विविध पदावर कार्य केले. त्‍यांचा सेवानिवृत्तनिमीत्य परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या वतीने आयोजित सेवागौरव कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. अशोक ढवन, प्राचार्य डॉ. डि. एन. गोखले, प्राचार्य डॉ. यु. एम. खोडके, माजी प्राचार्य डॉ. एन. डी. पवार, डॉ. महेश देशमुख आदींची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यावरांनी श्री काकडे यांच्या ३६ वर्षातील सेवा कालावधीतील केलेल्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले तर श्री काकडे यांनी सत्काराला उत्तर देतांना आपण विद्यापीठामुळेच मोठे झालो असुन आभार मानण्यापेक्षा सदैव विद्यापीठाचे ऋणात राहील असे सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री पी. पी. कदम, कृष्णा जावळे, सुभाष जगताप, एकनाथ घ्यार, श्रीमती दिपाली सवंडकर आदींनी परीश्रम घेतले. कार्यक्रमास विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

Wednesday, March 2, 2016

वनामकृविचे अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ स्पर्धेमध्ये नेत्रदिपक यश

वनामकृविच्‍या संघाने सर्वसाधारण उपविजेतेपदासह पटकावीले तीन सुवर्णदोन रौप्‍य व दोन कांस्‍य पदके
बेंगलोंर येथे आयोजित अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ स्पर्धेमध्ये वनामकृविचा पदके प्राप्‍त संघासोबत विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख, संघ व्यवस्थापक डॉ आशा देशमुख, प्रा. डि. एफ. राठोड आदी
**********************
कोंईबतुर येथीतामीळनाडू कृषि विद्यापीठात २२ ते २६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित अखिल भारतीय आंतर कृषि विद्यापीठ स्पर्धेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या ३९ विद्यार्थ्यानी विविध क्रीडा प्रकारात सहभाग नोंदविला. सदर स्पर्धेमध्ये वनामकृविच्या हॉलीबॉल मुलींच्या संघाने चुरशीच्या सामन्या बँगलोर कृषि विद्यापीठाच्या संघाचा पराभव करत सुवर्ण पदक मिळविले तर ॲथेलेटीक्स क्रिडा प्रकारात वनाकृविच्या संघास दोन सुवर्ण, दोन रौप्‍य व दोन कांस्‍य पदके प्राप्‍त केली. स्पर्धे सर्वसाधारण विजेतेपद बँगलोर कृषि विद्यापीठाने पटकावीले तर उपविजतेपद वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीच्या संघाने पटकावीले. विद्यापीठ संघाच्या या उत्कृष्ट प्रदर्शनाबददल कुलगुरू मा. डॉ बी व्‍यंकटेश्वरलु, शिक्षण संचालक डॉ. अशोक ढवण व विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ महेश देशमुख यांनी अभिनंदन केले. सदर संघाचे संघ व्यवस्थापक म्हणुन डॉ आशा देशमुख, प्रा. डि. एफ. राठोड व प्रा. एस. यु. चव्हाण यांनी काम पाहिले.

Monday, February 22, 2016

शिवकालीन धोरणांचा तरूणांनी अभ्यास करावा ....... प्राचार्य डॉ. उदय खोडके

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्‍साहात साजरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महविद्यालयात दिनांक 19 फेब्रवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्‍साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ उदय खोडके हे होते तर डॉ विठ्ठलराव घुले हे प्रमुख वक्‍ते होते.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ उदय खोडके म्‍हणाले की, पाणी अडवा पाणी जिरवा व आदर्श शेतसारा पध्‍दत यासारख्या शेतक-यांना उपयुक्‍त योजना शिवाजी महाराजांनी अमलात आणल्या. सामान्य जनता, महिला, शेतकरी व दुर्बल घटक कडे महाराजांनी विशेष लक्ष्य दिले. शिवाजी महाराजाच्‍या काळातील विविध धोरणांचा अभ्‍यास तरुणांनी करावा, असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. विठ्ठलराव घुले मार्गदर्शन करतांना म्‍हणाले की, छत्रपती उच्‍चतम प्रशासक व सयंमी व्‍यक्‍तीमत्‍व होते. समाजातील प्रत्‍येक घटकांचा विचार ते करीत. कोणावरही अन्‍याय व अत्‍याचार होणार नाही यासाठी महाराज विशेष लक्ष देत असत, सध्‍या राष्‍ट्रीय अखंडतेसाठी देशात सामाजिक एकोप्‍याचे प्रयत्‍न मोठया प्रमाणात होत असुन छत्रपतीचे स्‍वराज्‍य हे आपल्‍या समोरील एक आदर्श आहेत, असे प्रतिपादन त्‍यांनी केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थीनी जान्हवी जोशी, मनीषा बुलांगे, अश्विनी कदम आणि कविता लाड यांनी स्वागतगीत गायिले. विद्यार्थ्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशीही एकांकिका सादर केली. याप्रसंगी शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रफित सुद्धा दाखविण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विध्यार्थी श्री प्रशांत अटकळ व पाटीलबा खाडे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.विवेकानंद भोसले, डॉ. स्मिता खोडके, प्रा. भास्कर भुईभार प्रा. हरीश आवारी, प्रा. सुमंत जाधव, प्रा.संदीप पायाळ, डॉ.गोपाल शिंदे, प्रा.संजय पवार, प्रा.प्रमोदिनी मोरे, प्रा. लक्ष्मीकांत राऊतमारे, श्री.फाजगे आदींसह सर्व अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. 


Friday, February 19, 2016

मौजे झरी येथील जलयुक्त शिवार अभियानाच्या कामास कुलगुरू मा. डॉ. बी. व्यंकटेश्वरलु यांची भेट

लोकसहभागातुन चालु असलेल्‍या कामाचे कुलगुरूनी केले कौतुक
परभणी तालुक्‍यातील मौजे झरी लोकसहभागातुन महाराष्‍ट् शासनाच्‍या चालु असलेल्‍या जलयुक्‍त शिवार कार्यक्रमाचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु मा. डॉ. बी. व्‍यंकटेश्‍वरलु यांनी दिनांक १८ फेब्रुवारी रोजी भेट दिली व चालु असलेल्‍या कामाचे कौतुक केले. यावेळी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले, प्रगतशिल शेतकरी श्री. कांतराव देशमुख, मृद व जलसंधारण तज्ञ शास्‍त्रज्ञ डॉ. एस. डी. पायाळ, प्रा. डी. डी. पटाईत हे उपस्थित होते. झरी येथील प्रगतीशिल शेतकरी कृषिभुषण श्री. कांतराव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सदरील काम प्रगतीपथावर आहे. मा. कुलगुरु यांनी झरी येथे झालेल्‍या जलयुक्‍त शिवार अंतर्गत नाम नदीवर झालेल्‍या नाला खोलीकरण, सिमेंट बंधारा, पुनर्भरण कामास भेट देऊन पाहणी केली.
   सदरील प्रकल्‍पाची माहिती देतांना श्री. कांतराव देशमुख यांनी म्‍हणाले की, या कामामुळे दुष्‍काळात देखील पाणी अडविल्‍याने गावक-यांना फायदा झाला. शेतीकरीता बियाणे, औषधी, खते, उपलब्‍ध करुन देता येतील पंरतु पाणी उपलब्‍धतेसाठी मात्र लोकसहभागातुन याप्रकारची कामे राबविली गेली पाहिजेत, ज्‍यामुळे पाण्‍याचा प्रश्‍न कायमचा मिटविता येईल. झरी गावचा आदर्श घेऊन इतर गावांनी देखील अशी कामे निर्माण करुन दुष्‍काळात देखील पाणी टंचाईवर मात करता येईल. 
श्री. देशमुख पुढे म्‍हणाले की, झरी येथे जलयुक्‍त अभियांनातर्गत नाला खोलीकरणाचे काम हाती घेण्‍यात आले आहे. गावचे एकुण 12500 एकर क्षेत्र असुन त्‍यात एकुण 9 नाल्‍यांचा समावेश आहे. त्‍यापैकी नाम (लेंडी) नदीच्‍या खोलीकरणाचे काम सध्‍या 6 कि.मी पर्यंत पुर्ण झाले आहे. या खोलीकरनात सरासरी 15 मीटर रुंद व 6 मीटर खोल अशा प्रकारे काम होत असुन सध्‍या या कामामुळे 0.019 टि.एम.सी पाणी साठा निर्माण होणार आहे व भविष्‍यात 9 नाल्‍याचे एकुण 29 कि.मी खेालीकरणाचे काम पुर्ण करण्‍याचा मानस श्री. कांतराव देशमुख यांनी विषद केला. हे काम पुर्ण झाल्‍यास 0.092 टि.एम.सी ऐवढा मोठा पाणी साठा भुगर्भात निर्माण होणार आहे व त्‍याअंतर्गत याचा फायदा कोरडवाहु शेतीतील जवळपास 12500 एकर क्षेत्रातील पिकास संरक्षीत सिंचनासाठी होऊन त्‍यामुळे शेतक-यांच्‍या उत्‍पादनात भरीव वाढ होणार असुन कोरडवाहु शेतीत शाश्‍वता येण्‍यास मदत होणार आहे व याकामी विदयापीठातील शास्‍त्रज्ञांचा तांत्रिक सल्‍ला मोलाचा ठरणार आहे. फाऊनडेशन तर्फे चालु असलेल्‍या उपक्रमाची देखील माहिती करुन घेतली. या अंतर्गत शेवगा लागवड केलेल्‍या प्रक्षेत्रास भेट देऊन विदयापीठाद्वारे नाम फाऊन्‍डेशनला सर्वतोपरी सहकार्य करण्‍यात येईल असे आवर्जुन सांगितले व त्‍यांच्‍या कामाचे कौतुक करुन त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍या. याप्रसंगी श्री. कांतराव देशमुख यांनी कोरडवाहु शेतीत व  जलयुक्‍त शिवार या कार्यासाठी तांत्रिक मार्गदर्शनाकरीता नाम फाऊनडेशन सोबत विदयापीठाचा सांमजस्‍य करार करण्‍याची ईच्‍छा व्‍यक्‍त केली. विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. बी. बी. भोसले यांनी यावेळी नाम फाऊनडेशनच्‍या विस्‍तार कार्यात विदयापीठाचा सहभाग नोंदवीण्‍यात येईल व लवकरच सांमजस्‍य करार करण्‍यात येईल असे सांगितले. सदरील कामाचा दर्जा अंत्‍यंत चांगला असुन या कामामुळे भावी काळात निश्चितच दिर्घकालीन फायदा होणार असुन गाव टॅकरमुक्‍त होण्‍यासही मदत होणार आहे.