Tuesday, September 12, 2023

वनामकृविच्‍या ब्‍लॉगला अकरा वर्ष पुर्ण, सात लाख पेक्षा जास्‍त वेळेस वाचन

कृषि तंत्रज्ञान प्रसारास होत आहे मदत, २०२३ पोस्‍ट ब्‍लॉगवर प्रसिध्‍द

आपल्‍या प्रतिसाद व सहकार्य बद्दल शतश: आभार

वसंतराव नाईक मराठवाडा कृ‍षी विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्‍याने १२ सप्‍टेबर २०१२ मध्‍ये promkvparbhani.blogspot.com हा ब्‍लॉग सुरू करून आज अकरा वर्ष पुर्ण झाले. या अकरा वर्षात हा ब्‍लॉग सात लाख पेक्षा जास्‍त वेळेस पाहीला वाचला गेला. आजपर्यंत विद्यापीठाच्‍या २०२३ बातम्‍या, पोस्‍ट, घडामोडींची माहिती छायाचित्रासह ब्‍लॉगवर प्रसिध्‍द करण्‍यात आल्‍या, म्‍हणजेच दरमाह साधरणत: १५ पोस्‍ट प्रसिध्‍द होतात. यास वाचकांनी भरभरून असा प्रतिसाद दिला, विशेषत: या विविध बातम्‍यास प्रसारमाध्‍यमाच्‍या प्रतिनिधींनी आपआपल्‍या दैनिकात, साप्‍ताहिक, मासिक तसेच इलेक्‍ट्रानिक माध्‍यमात मोठी प्रसिध्‍दी दिली, त्‍यामुळे लाखो लोकांपर्यंत ही सर्व माहिती पोहचण्‍यास मोठी मदत झाली. सदर प्रसिध्‍द केलेल्‍या पोस्‍ट या विद्यापीठातील विविध घडामोडी, कृषि तंत्रज्ञान, कृषि सल्‍ला, कृषि हवामान अंदाज, कृषि संशोधन, विद्यापीठ उपलब्‍धी आदींशी संबंधीत आहेत. सदर ब्‍लॉगचा शेतकरी बांधव, विद्यार्थी, सामान्‍य नागरीक ही वाचक असुन कृषि तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत त्‍वरित पोहोचविण्‍यास मदत होत आहे. हा ब्‍लॉअविरत कार्यरत राहण्‍यास विद्यापीठाचे या अकरा  वर्षातील सर्व सन्‍माननीय कुलगुरू, विस्‍तार शिक्षण संचालक, शिक्षण संचालक, संशोधन संचालक कुलसचिव यांचे मोलाचे मार्गदर्शन प्रोत्‍साहन लाभले. तसेच विद्यापीठांतर्गत असलेले विविध संशोधन केंद्रे, महाविद्यालये, विद्यालये, कृषि विज्ञान केंद्रे, विविध कार्यालये येथील अधिकारी, कर्मचारी, शास्‍त्रज्ञ विद्यार्थी यांचे मोठे योगदान आहे. ब्‍लॉग लिखाणात सातत्‍य राहीले, ते सर्व वाचक वर्गाच्‍या प्रतिसादामुळेच. गेल्‍या अकरा वर्षातील विद्यापीठाच्‍या विविध घडामोडीचा सदर ब्‍लॉग हे साक्ष असुन आजही कोणतीही मागील घडामोडी बातम्‍या छायाचित्रासह आपण पाहु शकतो, हे सर्वांच्‍या सहकार्यामुळेच शक्‍य होऊ शकले. विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या वतीने उपयुक्‍त कृषी तंत्रज्ञान आणि कृषि सल्‍ला वेळोवेळी प्रसिध्‍दीमुळे शेतकरी बांधवाना निश्चितच लाभ होत आहे.  विद्यापीठाचा जनसंपर्क अधिकारी या नात्‍याने सर्वांचे शतश: आभार, या पुढेही आपला असाच प्रतिसाद सहकार्य लाभो, हीच अपेक्षा. 

धन्‍यवाद

आपला स्‍नेहांकित 

जनसंपर्क अधिकारी, वनामकृवि, परभणी

Monday, September 11, 2023

बालक हेच उज्वल देशाचे भविष्य ....... कुलगुरू मा डॉ. इन्‍द्र मणि

वनामकृवितील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्‍या वतीने आयोजित आजी आजोबा महोत्सवउत्साहात साजरा

बालक हेच देशाचे उज्वल भविष्य असल्याने त्यांचे उत्कृष्टपणे संगोपन होणे ही  प्रत्येक कुटुंबाची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेच्‍या वतीने दिनांक १० सप्‍टेंबर रोजी आजी आजोबा महोत्सवउत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन माननीय कुलगुरू यांच्‍या सुविद्य पत्नी श्रीमती जयश्री  मिश्रा आणि शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके हे उपस्थित होते.

कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि पुढे म्‍हणाले की, बालकांना आजी आजोबांचा सहवास मिळणे म्हणजे त्यांचे फार मोठे भाग्य असल्याने कुटूंबियांना याबाबत जाणीव असावी. अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये विनयशीलता, नैतीकता, सहकार्याची भावना असे उत्तम गुण विकसित करण्याची जबाबदारीही कुटूंबियांचीच आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता वृक्षसंवर्धन, पाण्याची बचत, परिसर स्वच्छता याविषयी बालकांना गोष्टीच्या रुपात धडे देण्याविषयी आजी आजोबांनी पुढाकार घेण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

मार्गदर्शनात डॉ. उदय खोडके  म्‍हणाले की, बालपणी आजी आजोबांनी केलेल्या संस्काराचा पगडा कायम व्यक्तीवर राहत असल्याने आजी आजोबांचे स्थान महत्वाचे आहे.

प्रास्‍ताविकात सहयोगी अधिष्ठाता डॉ.जया बंगाळे यांनी बालकांच्या विकासात आजी आजोबांचे असणारे योगदान याचा सन्मान राखण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन महाविद्यालयातर्फे करण्याची परंपरा  असल्याचे सांगुन बालकांना आजी आजोबांचे सान्निध्य लाभल्यास या बालकांचा उत्कृष्ट सर्वांगीण विकास होऊन ती बालके अधिक प्रेमळ, नम्र ,आशावादी, दृढ निश्चयी व मानसिकदृष्ट्या अधिक सक्षम होतात असे संशोधनातून स्पष्ट झाल्याचे नमूद केले. 

कार्यक्रमात शाळेच्या उत्कृष्ट नृत्य, नाटिका सादर केल्या. आजी व आजोबा यांच्या विषयी मनोगत सादर केले. आजी आजोबांनी देखील त्याचे कलागूण सादर केले, यात भजन, गौळण, गीत गायन, कविता वाचन, संस्कृत श्लोक, आजोबांनी तबला व हार्मोनियम वादन आदी कलागुण सादर केले. तसेच आजी आजोबांसाठी मनोरंजक खेळांचे आयोजन करण्‍यात आले होते. विजयी आजी आजोबां ना बक्षिस देऊन सन्मानित केले. सूत्रसंचालन डॉ. विणा भालेराव तर आभार शिक्षिका श्रुती औंढेकर यांनी मानले. महोत्सवाच्या यशस्वीततेसाठी प्रा.प्रियंका स्वामी, प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.