वेबिनार मालिकेच्या माध्यमातुन दर शनिवार सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठ किटकशास्त्रज्ञ साधणार संवाद
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बॅक व भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप) सेंटर ऑफ एक्सलन्स कृषी उत्पादकता वाढीकरिता यंत्रमानव, ड्रोन व स्वयंचलित यंत्राद्वारे डिजिटल शेती या प्रकल्पाच्या वतीने सुद्दढ पर्यावरणासाठी कृषि रसायनाचा संतुलित वापर यावर राज्यस्तरीय वेबिनार मालिकेचे आयोजन करण्यात आले असुन या मालिकेचे उदघाटन दिनांक २५ जुलै रोजी पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्हणुन पुणे येथील कृषि महाविद्यालयाचे माजी सहयोगी अधिष्ठाता तथा किटकशास्त्रज्ञ डॉ अजितसिंह चंदेले हे होते. कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, विभाग प्रमुख डॉ संजीव बंटेवाड, नाहेप प्रकल्पाचे मुख्य अन्वेषक डॉ गोपाळ शिंदे, आयोजन सचिव डॉ धीरजकुमार कदम उपस्थित होते.
मार्गदर्शनात किटकशास्त्रज्ञ डॉ अजितसिंह चंदेले म्हणाले की, रासायनिक किडनाशकांचा अयोग्य व अतिरेकी वापरामुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. पर्यावरण पुरक एकात्मिक कीड व्यवस्थापन करण्याची गरज असुन जैविक किडनाशकांचा वापर वाढवावा लागेल. ज्या ठिकाणी आपणास रासायनिक किडनाशकांस पर्याय उपलब्ध आहे, त्या ठिकाणी वापर टाळला पाहिजे.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्हणाले
की, रासायनिक किडनाशकांच्या अतिरेक वापरामुळे पर्यावरण व मानवाच्या आरोग्य
अनिष्ट परिणाम होत आहे. रासायनिक किटनाशकांचा वापर मर्यादीत ठेवुन जैविक घटकांचा वापर
करावा लागेल. परभणी कृषि विद्यापीठ जैविक किडनाशके, बुरशीनाशके
व जैविक खत निर्मितीवर भर देत असुन याचा शेतकरी बांधव मोठा लाभ घेत आहेत. विद्यापीठ
शास्त्रज्ञ सातत्याने ऑनलाईन पध्दतीने शेतकरी बांधवाशी संवाद साधत असुन दर शनिवारी
किटकशास्त्रज्ञ वेबिनारच्या माध्यमातुन संवाद साधणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तांत्रिक सत्रात डॉ संचिव बंटेवाड यांनी रासायनिक किटकनाशकांची सुरक्षीत हाताळणी यावर तर डॉ बस्वराज भेदे यांनी रासयनिक किटकनाशकाची ओळख व संतुलित वापर यावर मार्गदर्शन केले. तसेच शेतकरी बांधवानी विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठ शास्त्रज्ञांनी उत्तरे दिली.
प्रास्ताविक विभाग प्रमुख डॉ संजीव बंटेवाड यांनी केले. सुत्रसंचालन डॉ मेघा जगताप यांनी केले तर आभार आयोजन सचिव डॉ धीरजकुमार कदम यांनी मानले. सदरिल वेबिनारला राज्यातील शेतकरी बांधव, कृषि विस्तारक, कृषि अधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या वेबिनार मालिकेच्या माध्यमातुन दर शनिवार सायंकाळी ७ वाजता ऑनलाईन पध्दतीने विद्यापीठ किटकशास्त्रज्ञ संवाद साधणार असुन विद्यापीठाच्या युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv यावर थेट प्रक्षेपण होणार आहे.