Wednesday, July 29, 2020

वनामकृविमध्ये राज्यस्तरीय ऑनलाइन बाल विकास प्रशिक्षणाचे आयोजन

सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अनेक संकटांचा सामना करत असतानाच शिक्षणाच्या बाबतीतही अनेक समस्या उद्भवत आहेत. या आव्हानात्मक काळातही गरजूंना करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्‍या मानव विकास कौटुंबिक अभ्यास विभागाच्‍या वतीने ५ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर कालावधीत बाल विकास शैक्षणिक केंद्रांचे व्यवस्थापन या राज्यस्तरीय ऑनलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सध्याच्या काळात बहुतांश कुटुंबातील दोन्ही पालक नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेले असल्याने बाल विकास  केंद्रांना अतिशय महत्त्व प्राप्त झाले असुन दर्जेदार बालविकास केंद्रांची मागणी वाढत आहे. सदरील अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केले प्रशिक्षणार्थी दर्जेदार बालविकास शैक्षणिक केंद्र जसे की प्ले स्कूल, नर्सरी स्कूल, किंडरगार्टन, बालविकास केंद्र, बालछद केंद्र (हॉबी सेंटर) आदी सुरू करण्यास अथवा या केंद्रांमध्ये शिक्षक, संगोपक, पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका पदावर नोकरी करून अर्थार्जन करण्यासाठी सक्षम होतात. तसेच बालकांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रभावी पालक होण्याकरिता  हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. प्रशिक्षणास प्रवेश घेण्यासाठी उमेदवार किमान इयत्ता बारावी उत्तीर्ण असणे अनिवार्य असून महिला व पुरुषांसाठी प्रवेश खुला आहे. तेव्हा या संधीचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन प्रशिक्षणाच्या समन्वयिका डॉ जया बंगाळे व डॉ वीणा भालेराव यांनी केले आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रशिक्षणाच्या अधिक माहितीसाठी ८३२९३७२९७४, ७५८८०८२०५६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा.