Friday, July 3, 2020

वनामकृविच्‍या वतीने वसमत तालुक्‍यातील मौजे चिखली व मौजे सति पांगरा ये‍थे शिवार फेरीचे आयोजन

मा.कुलगुरु डॉ.अशोक ढवण यांची शिवार फेरीत सहभाग व मार्गदर्शन

दिनांक 1 जुलै रोजी माजी मुख्‍यमंत्री तथा हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतरावजी नाईक यांचा जन्म दिवस कृषि दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व कृषि विभाग यांच्‍या वतीने संपुर्ण मराठवाडयात दिनांक 1 जुलै ते 7 जुलै दरम्‍यान कृ‍षि संजीवनी सप्‍ताह अभियान राबविण्‍यात येत असुन दिनांक 1 जुलै रोजी वसमत तालुक्‍यातील मौजे चिखली व मौजे सति पांगरा येथे शिवार फेरीचे आयोजन करण्‍यात आले होते. शिवार फेरी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांची विशेष उपस्थिती होती तर संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. देवसरकर, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ.पी.आर.देमुख, विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. यु. एन. आळसे, उपविभागीय कृषि अधिकारी हिंगोली श्री. बी. एस. कच्छवे, तालुका कृषि अधिकारी श्री.कल्याणपाड आदींची उपस्थिती होती. कोविड-19 विषाणुच्‍या प्रादुर्भावात सर्व नियमांचे पालन करून शिवार फेरी घेण्यात आली.

मौजे चिखली येथील शिवार फेरी दरम्‍यान मा. कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांनी तिफणीवर सोयबीनची पेरणी केली व शेतक-यांशी संवाद साधला. मौ.सति पांगरा येथे कुलगुरू मा. डॉ. शोक ढवण वृक्षारोपन करण्‍यता आले. सध्या परिसरात सोयबीन, कापुस, हळद आदी पीके बहरली असून पाऊस समाधानकारक आहे. वाटेत सोयबीन कोळपणी चालू असतांना मा.कुलगुरु व संचालक विस्तार शिक्षण यांना कोळपेच्‍या सहाय्याने शेतक-यांसोबत कोळपणी केली.

वसमत तालुक्यात करवंद हे एक नविन फळपीक म्हणून पुढे येत असुन जवळपास शंभर एकर क्षेत्रावर करवंदाची व पेरुची लागवड झाली आहे. श्री.संजय लोंढे यांचे शेतात दहा एकर क्षेत्रावर करवंद पेरू आंतरपीक घेण्यात आले आहे, याची पाहणी मान्‍यवरांनी केली. तालुक्यात ओवा लागवडही मोठया प्रमाणावर होणार असल्याचे शेतक-यांनी सांगितले. कुलगुरु मा.डॉ अशोक ढवण यांनी फळपिकांचे विपणन, आकर्षक पॅकींग, प्रक्रिया आदी विषयांवर शेतक-यांना सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ.देवसरकर यांनी शेतक-यांना ओवा, करवंद, पेरू पीकांवर एक दिवसाचे प्रशिक्षण विद्यापीठस्तरावर आयोजित करण्यात येईल असे सांगितले. श्री.कच्छवे यांनी कृषि विभागातील योजनांची तर श्री.कल्याणपाड यांनी लॉकडाऊनच्या काळात गटामार्फत थेट विक्री केल्याची माहिती दिली.

शेतकरी श्री.बालाजी यवंते, श्री.कदम, श्री.संजय शिंदे यांनी करवंद पीकाला फळपिक म्हणून मान्यता मिळावी व प्रक्रिया उद्योगासाठी विद्यापीठाने सहकार्य करावे अशी मागणी केली. हिंगोली जिल्हयातील शेतक-यांनी केलेल्या नाविन्यपुर्ण उपक्रमांची मा कुलगुरू यांनी  प्रशंसा करून इतर शेतक-यांनी त्याच्या आदर्श घेण्‍याचा सल्‍ला दिला.