Friday, July 31, 2020

वनामकृविच्‍या वतीने आयोजित किड व्‍यवस्‍थापनावरील ऑनलाईन वेबिनार मालिकेस मोठा प्रतिसाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील जागतिक बँक व भारतीय कृषि अनुसंधान परीषद पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्य शिक्षण प्रकल्प (नाहेप) व कृषि कीटकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दर आठवडयात सुदृढ पर्यावरणासाठी कृषि रसायनांचा संतुलित वापर यावर ऑनलाईन राज्‍यस्‍तरीय वेबीनार मालिकेचे आयोजन करण्‍यात आले असुन या मालिकेचे दुसरे सत्रात दिनांक २९ जुलै रोजी कपाशीतील गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विस्‍तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर हे होते.

मुख्य मार्गदर्शक किटकशास्‍त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी सद्य परिस्थितीत गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापना बाबत सखोल असे मार्गदर्शन करून गुलाबी बोंडअळीचा जीवनक्रमाबाबत माहिती दिली. सद्या वातावरण ढगाळ असल्याने व कापसाला पातेफुले लागत असल्याने गुलाबी बोंडअळीचे पतंग सक्रीय झालेले आढळून येत आहे. मादी पतंग पातेफुले यावर अंडी घालतातत्यामुळे कपाशीच्या पिकात कामगंध सापळे लावण्याची ही योग्य वेळ असुन कपाशीच्या पिकात नियमित सर्वेक्षण करुन डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात, असा सल्‍ला दिला.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ. अशोक ढवण म्‍हणाले की, पिकांतील किडींचे व्यवस्थापन करताना अचुक वेळ साधणे फार महत्वाचे असते. त्याकरिता विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाने अत्यंत योग्य वेळी शेतक-यांमध्ये गुलाबी बोंडअळी बाबत जनजागृती करण्यासाठी ऑनलाईन वेबिनार कार्यक्रमाचे आयोजन केले असुन याचा निश्चितच शेतकरी बांधव व कृषि विस्‍तारक यांना लाभ  होईल, अशी अपेक्षा व्‍यक्‍त केली. तसेच मार्गदर्शनात डॉ. देवराव देवसरकर यांनी कपाशीवरील किड व्यवस्थापनाचे महत्व विषद केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आयोजक डॉ धीरज कदम यांनी केले. या वेबिनारमध्‍ये शेतकरी बांधव व कृषि विस्‍तारक मोठया संख्‍येने सहभागी झाले होते. या राज्यस्तरीय वेबीनार मालिकेचा पुढचा भाग शनिवार दिनांक १ ऑगष्ट रोजी संध्याकाळी ७.०० वाजता आयोजित केला असुन यामध्ये सोयाबीनवरील कीड व्यवस्थापनावर किटकशास्‍त्रज्ञ डॉ. अनंत बडगुजर मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रमात सहभागी होण्‍यासाठी झुम आयडी ९४१ ५३५ ०६१६ व पासवर्ड १२३४५ याचा वापर करावा तसेच कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्‍या युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे. कार्यक्रमात बहुसंख्य शेतक-यांनी सहभागी व्हावे असे आवाहन विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.