Saturday, July 4, 2020

पिक लागवडीवरील खर्च कमी करणारे कृषी तंत्रज्ञान अवलंब करावा ..... विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर

मौजे भाटेगांव (ता कळमनुरी) येथे शेतक-यांच्‍या प्रक्षेत्रास भेट व मार्गदर्शन

कृषि संजीवनी सप्‍ताहांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ व तोंडापुर (जि हिंगोली) येथील कृषि विज्ञान केंद्र यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक 3 जुलै रोजी मौजे भाटेगांव (ता कळमनुरी) येथे शेतक-यांना मार्गदर्शन करण्‍यात आले. कार्यक्रमास मुख्‍य मार्गदर्शक विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर यांनी मार्गदर्शन केले तर कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कयाधु शेतकरी उत्‍पादक कंपनीचे संचालक श्री आबासाहेब कदम हे होते व वरिष्‍ठ शास्‍त्रज्ञ डॉ प्रमोद शेळके, विषय विशेषतज्ञ डॉ अनिल ओळंबे, डॉ अजय सुगावे, रोहीणी शिंदे आदींची उपस्थिती होती.

मार्गदर्शन करतांना डॉ देवराव देवसरकर म्‍हणाले की, पिक लागवडीवरील खर्च कमी करून उत्‍पादन वाढीसाठी शेतक-यांनी स्‍वत: चे बियाणे स्‍वत: तयार करावे व घरीच लिबोळीं अर्क तयार करून वापरावे. उत्‍पादन वाढीसाठी सोयाबीनची पेरणी रूंद वरंबा व सरी पध्‍दतीने करावी, जेणे करून जास्‍त पाऊस झाल्‍यास सरीवाटे पाण्‍याचा निचरा होईल व कमी पाऊसात सरीमधील पाण्‍याचा पिक वाढीसाठी उपयोग होईल. हळद पिकासाठी लागवडी अगोदर रासायनिक व जैविक बेणे प्रक्रिया करून लागवड करावी, ज्‍यामुळे रोगाचा प्रादुर्भाव होणार नाही.

कार्यक्रमात शेतक-यांना कीड व्‍यवस्‍थापनाकरिता कामगंध सापळयाचा वापर यावर डॉ अजय सुगावे यांनी माहिती दिली तर सुरक्षित बियाणे साठवणुक यावर डॉ रोहणी शिंदे यांनी माहिती दिली. प्रास्‍ताविक डॉ प्रमोद शेळके यांनी केले तर सुत्रसंचालन डॉ अनिल ओळंबे यांनी केले. प्रगतशील शेतकरी श्री चंद्रशेखर गावंडे यांच्‍या शेतीस देऊन बीबीएफ पध्‍दतीने पेरणी केलेल्‍या व ठिंबक सिंचन पध्‍दतीचा वापर केलेल्‍या हळदीच्‍या प्रक्षेत्रास भेट दिली. कार्यक्रमास गावातील शेतकरी उपस्थित होते.