Thursday, April 21, 2022

राज्याचे कृषीमंत्री मा ना श्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत गोळेगांव कृषी महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन

कृषी शिक्षणातील मुलींचे प्रमाण ५५ टक्केपर्यंत वाढले आहे, या महाविद्यालयामुळे ग्रामीण भागात कृषी शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, चांगले विद्यार्थी घडतील. यापुढील काळात महाविद्यालयात मुला-मुलींचे वस्तीगृह, कर्मचारी निवासाच्या सोयी, सुविधासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे प्रतिपादन कृषिमंत्री मा ना श्री दादाजी  भुसे यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत गोळेगाव (ता.औंढा नागनाथ) येथील कृषी महाविद्यालय इमारत उद्घाटन आणि महिला शेतकरी मेळाव्याचे आयोजन दिनांक २१ एप्रिल रोजी करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. महिलांच्या सन्मानासाठी सदरिल कृषी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन महिला शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवणविद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य आमदार डॉ. राहुल पाटीलकृषी सचिव श्री एकनाथ डवले,  शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. भगवान आसेवार, लातूर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे (हिंगोली), उपविभागीय कृषी अधिकारी बळीराम कच्छवे (परभणी), माजी शिक्षण संचालक डॉ. विलास पाटील, प्राचार्य डॉ.उदय खोडके, महिला शेतकरी लक्ष्मी भिसे, रेणुका जाधव, यशोदा सोळंके, विजय देशमुख, द्रोपदी काळे आदिची प्रमुख उपस्थिती होती.

कृषीमंत्री मा ना श्री दादाजी भुसे पुढे म्हणाले, माननीय मुख्‍यमंत्री यांच्‍या संकल्‍पनेतुन विकेल ते पिकेल अभियान राबविण्‍यात येत आहे. सन २०२२ हे वर्ष शेतकरी महिला सन्‍मान वर्ष म्‍हणुन साजरे करण्‍यात येत आहे. शेतकरी महिला सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल आणि महिला बचत गटाची उत्पादने विक्रीसाठी शासकीय जागा उपलब्ध करुन दिल्या जातील. पूर्वी कृषी विभागाच्या ३० टक्के योजना महिलांसाठी राखीव होत्या. येत्या काळात ५० टक्के योजना महिला शेतकऱ्यांसाठी राखीव राहणार आहेत. शेतीतील निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग वाढला पाहिजे, सात बारा उता-यावर महिलांचे नाव लागले पाहिजे, यासाठी शासन प्रयत्‍नशील आहे. वन्यप्राण्यांमुळे पीकांची मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. वन्य प्राण्यांचा त्रास असलेल्या भागात पीक संरक्षणासाठी मॉडेल तयार केले जाईल. कृषीपंपाना दिवसाच्या वेळी सलग आठ तास वीजपुरवठा करण्याचे निर्देश ऊर्जा विभागाला देण्यात आले आहेत. महिला बचत गटांना स्मार्ट योजनेअंतर्गंत जास्तीजास्त कर्जपुरवठा केला जाईल. या वर्षी हंगामात शेतकऱ्यांना बियाणे व खताचा तुटवडा होऊ दिला जाणार नाही, असेही ते म्‍हणाले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, ग्रामीण भागात कृषि शिक्षणाची सुविधा पोचविण्‍यासाठी विद्यापीठ कटिबध्‍द आहे.

भाषणात आमदार मा डॉ राहुल पाटील यांनी कृषि विद्यापीठ संशोधनाच्‍या आधारे कृषि तंत्रज्ञान विकासाशिवाय शेती उत्‍पादनात वाढ होणे शक्‍य नसल्‍याचे म्‍हणाले तर शेतकरी महिला सक्षमीकरणासाठी शासन विविध उपक्रम राबवित असल्‍याचे कृषी सचिव श्री एकनाथ डवले यांनी सांगितले.   

कार्यक्रमात काळा पाणीतांडा येथील महिला शेतकरी अनिता पवार, वसमत येथील उद्योजिका वनिता दंडे यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. प्रास्‍ताविक डॉ भगवान आसेवार यांनी केले तर आभार प्रा पुंडलिक वाघमारे यांनी मानले. कार्यक्रमास शेतकरी महिला, विद्यापीठातील प्राध्‍यापक, शास्‍त्रज्ञ, तसेच कृषि विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.