वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत असलेल्या तुळजापुर येथील कृषि विज्ञान केंद्रआणि उस्मानाबाद कृषि विभागातील आत्मा व कृषि विभाग, यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित किसान भागीदारी – प्राथमिकता हमारी अंतर्गत तुळजापूर कृषि विज्ञान केंद्रात दिनांक 26 एप्रिल रोजी शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आत्मा, उस्मानाबादचे प्रकल्प उपसंचालक श्री.किरवले तर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन तुळजापूरचे पशुधन विकास अधिकारी (विस्तार), डॉ. के. ऐ. खाडे, तालुका कृषि अधिकारी श्री.संजय जाधव, विद्यापीठ शास्ञज्ञ डॉ. रमेश पाटील, डॉ. संदेश देशमुख, शेळी उद्योजक श्री. गुंडूपवार, केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ विजयकुमार जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मेळाव्याच्या सुरूवातीला भारत सरकार चे कृषिमंञी मा. श्री. नरेंद्र तोमर यांनी देशातील विविध कृषि विज्ञान केंद्रांतंर्गत उपस्थित शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद साधत मार्गदर्शन केले.
मार्गदर्शनात डॉ. खाडे म्हणाले की, शेतकरी हा देशातील सर्वात मोठया बँकेचा व्यवस्थापक असून त्याने शेतीशी आधरित जोडधंद्यामध्ये गुंतवणूक केलेले पैसे एक ते दोन वर्षात दुपटीपेक्षा जास्तीची वाढ होवू शकते. अशा प्रकारची क्षमता इतर कुठल्याही उद्योगधंद्यामध्ये नाही. शेतकऱ्यांनी शेतीसोबत पशुधन आधारित जोडधंद्याकडे वळावे, असा सल्ला त्यांनी दिला. डॉ. संदेश देशमुख म्हणाले की, जिल्हयातील शेतकऱ्यांनी विद्यापीठ निर्मित बैलचलित विविध शेती अवजारांची माहिती घेवून त्यांचा वापर आपल्या शेतीत करावा तसेच सदरील बैलचलीत अवजारे ही ट्रॅक्टर चलीत अवजारांपेक्षा स्वस्त असून सोबतच त्यामुळे पेट्रोल-डिझेल या इंधनाची देखील गरज भासत नाही. शेतकऱ्यांनी शेतीशी निगडीत जोडधंद्यांची निवड करताना सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करावा, असे प्रतिपादन डॉ.रमेश पाटील यांनी केले. उस्मानाबाद जिल्हयातील शेळी उद्योजक श्री. गुंडूपवार भाषणात म्हणाले की, जिल्हयातील प्रसिध्द असलेली उस्मानाबादी शेळी महाराष्ट्राच्या बाहेर 8-9 राज्यांमध्ये त्यांनी पोहचवली असून, त्यासाठी सतत विविध नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यात येत आहेत. आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, तमिळनाडू, केरळ आदि राज्यातून उस्मानाबादी शेळीला प्रचंड मागणी असल्याचे सांगुन त्यांनी त्यांच्या गोटबँक या मोहिमे विषयीस माहिती दिली. श्री.संजय जाधव यांनी कृषि विभागाच्या विविध योजना तर श्री.किरवले यांनी आत्मांतर्गत विविध प्रकल्पांची माहिती दिली.
कार्यक्रमात जिल्हयातील कृषि व पुरक क्षेञात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या विविध शेतकरी, महिला शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्या आदिंचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक कार्यक्रम समन्वयक श्री. विजयकुमार जाधव यांनी केले. सुञसंचालन शास्ञज्ञ प्रा.वर्षा मरवाळीकर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. कृष्ण झगडे यांनी केले. मेळावा यशस्वीतेसाठी कृषि विज्ञान केंद्राचे डॉ.भगवान आरबाड, प्रा.गणेश मंडलिक, प्रा.अपेक्षा कसबे, डॉ.नकुल हारवाडीकर, श्री.शिवराज रूपनर, आत्म्याचे श्री. राहूल लोंढे यांनी प्रयत्न केले.