Wednesday, April 13, 2022

भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन तरूणांनी वाचन संस्‍कृती जपली पाहिजे ........ श्री प्रभाकर साळेगांवकर

परभणी कृषी महाविद्यालयात भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती निमित्‍त आयोजित व्‍याख्‍यानात प्रतिपादन

डॉ बाबासाहेबांच्‍या विचारांत मोठी प्रगल्‍भता होती. ज्‍या कोलंबिया विद्यापीठात डॉ बाबासाहेब शिकले, त्‍या विद्यापीठाच्‍या १०० बुध्‍दीमान विद्यार्थ्‍यांच्‍या यादीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला क्रमांक आहे. भारतीय संविधान हे डॉ बाबासाहेबांनी जगातील दिलेली मोठी देणगी आहे. डॉ बाबासाहेबांना लहानपणापासुनच वाचनाची आवड होती, अखंड तासनतास ते वाचन करत. त्‍यांच्‍या पासुन आदर्श घेऊन आजच्‍या तरूणांनी वाचन वाचन संस्‍कृती जपली पाहिजे, असे प्रतिपादन माजलगांव येथील मुख्‍याध्‍यापक श्री प्रभाकर साळेगांवकर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषी महाविद्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्‍मा फुले यांच्‍या जयंती निमित्‍त दिनांक १३ एप्रिल रोजी व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल हे होते तर व्‍यासपीठावर विभाग प्रमुख डॉ संजीव बंटेवाडविभाग प्रमुख डॉ प्रविण वैद्य आदींची प्रमुख उपस्थिती होती.

श्री प्रभाकर साळेगांवकर पुढे म्‍हणाले की, महापुरूषांना धर्माधर्मा मध्‍ये व जातीजाती मध्‍ये विभागु नका. आपण महापुरूषांना डोक्‍यावर घेतले पण हदयात घेतले पाहिजे. देशातील सामाजिक ऐक्‍य गरजेचे असुन संकुचित वृत्‍ती सोडली पाहिजे. समाज परिवर्तनाकरिता महात्‍मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रमाणे विचारांना कृतीची जोड दिली होती.

अध्‍यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल म्‍हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर  व महात्‍मा फुले यांनी अनेक संकटात जीवन जगायला शिकविले. तरूणांनी भुतकाळ विसरून वर्तमान काळावर लक्ष केंद्रीत करण्‍याचा सल्‍ला त्‍यांनी दिला.

सुत्रसंचालन  ज्ञानेश्‍वर पवार यांनी केले तर आभार डॉ प्रविण वैद्य यांनी मानले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, डॉ डि एस पेरके, डॉ रावसाहेब भाग्‍यवंत आदीसह महाविद्यालयातील प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.