Saturday, April 30, 2022

मौजे उजळंबा येथील तरूण शेतकरी श्री लक्ष्‍मण धोतरे यांना क्रीडा हैद्राबादचा उत्कृष्ट कोरडवाहू शेतकरी पुरस्कार

हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहु शेती संशोधन केंद्राच्‍या ३८ व्‍या वर्धापन दिनी दिनांक २५ एप्रिल रोजी श्री लक्ष्मण विठ्ठल धोतरे यांना हैद्राबाद येथे “उत्कृष्ट कोरडवाहू शेतकरी पुरस्काराने” सन्मानीत करण्यात आले. कार्यक्रमास भारतीय कृषि शास्‍त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्‍यक्ष डॉ गुरूबच्‍चन सिंग, हैद्राबाद येथील क्रीडा संचालक डॉ व्‍ही के सिंग, माजी कुलगुरू मा डॉ बी वेंकटेश्‍वरलु, प्रकल्‍प समन्‍वयक डॉ रविंद्र चारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आणि हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम (AICRPDA-NICRA) ही योजना सन २०११ पासून राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत परभणी जिल्‍हातील मौजे बाभुळगाव आणि मौजे उजळांबा या कोरडवाहू गावांमधील शेतकऱ्यांच्या शेतावर कोरडवाहू तंत्रज्ञानाचा वापर करुन विविध पीक प्रात्यक्षिके घेण्यात येतात. यात मौजे उजळांबा येथील तरूण शेतकरी श्री लक्ष्मण धोतरे यांनी विद्यापीठ शास्त्रज्ञानांच्या मार्गदर्शनानुसार रुंद वरंबा सरी - बीबीएफ पध्दतीने सोयाबीन पेरणी, सोयाबीनच्या ४ ओळीनंतर बळीराम नांगराने सऱ्या पाडणे, पोटॅशियम नायट्रेटची फवारणी आदी कोरडवाहू तंत्रज्ञानाचा अवलंब केला, त्‍यामुळे त्‍यांच्‍या उत्पादनात भरिव अशी वाढ झाली. यामुळे सदरिल कोरडवाहु तंत्रज्ञानाचा अवलंब गावातील तसेच शेजारील गावातील इतर शेतकरी बांधवानीही अवलंब करित आहेत. त्याबद्दल श्री लक्ष्मण विठ्ठल धोतरे यांची उत्कृष्ट कोरडवाहू शेतकरी पुरस्कारांसाठी निवड झाली. कोरडवाहु कृषि तंत्रज्ञानाबाबत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पाचे मुख्य शास्रज्ञ डॉ वासुदेव नारखेडे आणि कृषि अभियंता डॉ मदन पेंडके यांनी श्री धोतरे यांना वेळो‍वेळी मार्गदर्शन केले. या पुरस्‍काराबाबत कुलगुरू मा. डॉ. अशोक ढवण, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, मुख्य शास्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. मदन पेंडके, प्रा. रावसाहेब राऊत, डॉ. पपिता गोरखेडे आदींनी श्री लक्ष्‍मण धोतरे यांचे अभिनंदन केले.