Thursday, April 14, 2022

आजच्‍या तरूणांनी डॉ बाबासाहेबांचा आदर्श घेऊन ज्ञान सागरात हरवुन गेले पाहिजे .... कुलगुरू मा डॉ अशोक ढवण

वनामकृवित भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्‍साहात संपन्‍न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी कार्यालयाच्‍या वतीने भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती दिनांक १४ एप्रिल रोजी उत्‍साहात साजरी करण्‍यात आली. भारतरत्‍न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या प्रतिमेचे कुलगुरू मा डॉ अशोक ढवण यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले. याप्रसंगी सामुदायिक वंदना करण्‍यात आली.

यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माइल, प्राचार्य डॉ उदय खोडके, प्राचार्या डॉ जया बंगाळे, विद्यार्थ्‍यी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, डॉ दयानंद टेकाळे, प्रा दिलीप मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शन करतांना कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील अनेक देशांच्‍या संविधानाचा बारकाईने अभ्‍यास करून भारतीय परिस्थितीस अनूकुल अशी जगातील सर्वश्रेष्‍ठ संविधानाची निर्मिती केली. डॉ बाबासाहेब तासनतास ग्रंथालयात वाचन करत असे. वाचनामुळे विचारात प्रगल्‍भता येते. वाचन हे आपल्‍या दैनंदिन जीवनाचा भाग झाला पाहिजे. उथळ ज्ञानाचा काही उपयोग नाही. कोणत्‍याही क्षेत्रात काम करतांना वाचनाचा उपयोग होतो. आज इंटरनेटच्‍या माध्‍यमातुन अनेक चांगली पुस्‍तके उपलब्‍ध आहेत, त्‍यांचे वाचन विद्यार्थ्‍यांनी केले पाहिजे. आजच्‍या तरूणांनी डॉ बाबासाहेबांचा आदर्श घेऊन ज्ञान सागरात हरवुन गेले पाहिजे.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ रामप्रसाद खंदारे आणि सोपान राठोड यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, प्राध्‍यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता विविध समित्‍यांचे अध्‍यक्ष, सदस्‍य, डॉ आशाताई देशमुख, डॉ शाहु चौहान आदीसह विद्यार्थी कल्‍याण अधिकारी कार्यालयाचे कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.