Monday, April 18, 2022

कृषि विकासात परभणी कृषि विद्यापीठाचे भरीव असे योगदान ....... माजी कुलगुरू डॉ योगेन्‍द्र नेरकर

वनामकृविचा माजी विद्यार्थ्‍यांचा कार्य गौरव सोहळा संपन्‍न 

परभणी कृषी विद्यापीठाने विविध पिकांचे विकसित केलेले वाण व कृषि तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन देशातील व राज्‍यातील शेतकरी विकासाकरिता भरीव असे योगदान दिले आहे. विद्यापीठाचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात आपले योगदान देत असुन भविष्‍यातही सर्वांनी एक‍त्र येऊन शेतकरी बांधवाच्‍या समृध्‍दी करिता कार्य करू या, असे प्रतिपादन महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा डॉ योगेन्‍द्र नेरकर यांनी केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या सुवर्ण महोत्‍सवी वर्षाचे औचित्‍य साधुन दिनांक १८ एप्रिल रोजी आयोजित विद्यापीठाच्‍या माजी विद्यार्थ्‍यांचा कार्य गौरव सोहळाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे होते तर प्रमुख अतिथी म्‍हणुन महात्‍मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ योगेन्‍द्र नेरकर हे उपस्थित होते. व्‍यासपीठावर महाराष्‍ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी महासंचालक डॉ एम जी लांडे, माजी शिक्षण संचालक डॉ एम व्‍ही ढोबळे, माजी विभागीय पोलिस आयुक्‍त श्री एम जी सानप, माजी विस्‍तार शिक्षण संचालक डॉ जी एस जाधव, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ अशोक ढवण म्‍हणाले की, सर्वांच्‍या सामुदायिक प्रयत्‍नातुन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ उभे राहिले असुन कृषि शिक्षण, संशोधन व विस्‍तार शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन कृषि विकासात मोठे योगदान दिले आहे. विद्यापीठाच्‍या विविध वाणाच्‍या बियाणांची शेतकरी बांधवामध्‍ये मोठी मागणी असते, मुलभुत व पैदासकार बियाणे निर्मितीवर विद्यापीठाने भर दिला असुन बीजोत्‍पादनाचे विशिष्‍ट प्रारूप तयार केले आहे, यामुळे समाधानकारक बीजोत्‍पादन होईल. डिजिटल शेती करिता लागणारे तंत्रज्ञान व मनुष्‍यबळ निर्मितीवर विद्यापीठाने नाहेप प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातुन पुढाकार घेतला आहे. शेती व शेतकरी बांधवापुढे अनेक आव्‍हाने आहेत, सर्वांनी मिळुन या आव्‍हानावर मात करून पुढची वाटचाल करावयाची आहे. आर्थिक अडचणीतही विद्यापीठ निर्मित निविष्‍ठामधुन प्राप्‍त महसुलातुन विद्यापीठाचे कार्य चालु आहे.

डॉ एम जी लांडे म्‍हणाले की, मराठवाडयातील प्रत्‍येक खेडयात एक तरी विद्यापीठाचा माजी विद्यार्थी आहे, त्‍यांच्‍या रूपात प्रत्‍येक खेडयात कृषि विद्यापीठ पोहचले आहे. यावेळी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी डॉ जी एस जाधव, श्री एस एस राऊत, डॉ एम व्‍ही ढोबळे, श्री एम जी सानप, श्री दत्‍ता शिंदे, डॉ बापु आडकिणे, डॉ भगवानराव कापसे, डॉ सी व्‍ही मायी, डॉ एम जी उमाटे, श्री भागनागरे, डॉ व्‍ही डी साळुंके, डॉ अशोक सेलगांवकर आदींनी आपले मनोगत व्‍यक्‍त केले. 

कार्यक्रमात मराठवाडयातील आठही जिल्‍हयातील विद्यापीठाचे माजी विद्यार्थ्‍यांचा मान्‍यवरांच्‍या हस्‍ते शाल व मान्‍यचिन्‍ह देऊन गौरविण्‍यात आले. कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या हस्‍ते प्रसिध्‍द कवि श्री इंद्रजित भालेराव लिखित विद्यापीठ गीताचे विमोचन करण्‍यात आले. गीतास प्रा अशोक जोंधळे यांनी संगीत दिले असुन सौ आशाताई जोंधळे यांनी स्‍वरबध्‍द केले आहे.  सदरिल गीत रचना आणि स्‍वरबध्‍द करण्‍यासाठी विद्यापीठस्‍तरावर माजी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील यांच्‍या अध्‍यक्षतेखाली समिती गठित करण्‍यात आली होती. कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी विद्यापीठाच्‍या वाटचालीवर प्रकाश टाकला. सुत्रसंचालन डॉ रणजित चव्‍हाण यांनी केले तर आभार विद्यार्थी कल्‍याण अधिकारी डॉ सचिन मोरे यांनी मानले. कार्यक्रमात मराठवाडयातील आठही जिल्‍हयातील माजी विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्‍यापक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


विद्यापीठ गीताचे विमोचन 



माजी कुलगुरू मा डॉ योगेन्‍द्र नेरकर