वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील ५० टक्के शिक्षक व शिक्षकेतर पदे मागील काही वर्षापासून रिक्त असल्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याच बरोबर संशोधनावर विपरित परिणाम होत असून विस्तार कार्याची गती देखील मंदावली आहे. त्याचा परिणाम मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कृषि विषयक मार्गदर्शनावर होत आहे. सदर बाब विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य माननीय आमदार डॉ. राहुल पाटील यांनी राज्याच्या विधानसभा अधिवेशानाच्या पटलावर मांडून विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर पदे रिक्त असल्यामुळे त्यांचे होणारे परिणाम सभागृहास अवगत केले. विद्यापीठातील रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी यासाठी त्यांनी कसोशिने प्रयत्न केले. तसेच विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य माननीय आमदार श्री सतीश चव्हाण यांनी देखील अधिवेशनात विद्यापीठातील रिक्त पदांबाबत लक्षवेधी सूचना केली होती. या दोन्ही सन्माननीय कार्यकारी परिषद सदस्यांनी केलेल्या कार्याचा परिपाक म्हणून विद्यापीठातील रिक्त पदे भरण्याच्या अनुषंगाने शासनस्तरावर हालचाली सुरु झालेल्या आहेत. दिनांक ११ एप्रिल रोजी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेची बैठक आयोजीत करण्यात आली होती. सदर बैठकीत कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण यांनी कार्यकारी परिषद सदस्य तथा माननीय आमदार डॉ. राहुल पाटील यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन करून आभार मानले तसेच कार्यकारी परिषद सदस्य माननीय आमदार श्री सतीश चव्हाण यांचे विद्यापीठाच्या वतीने आभार मानले. बैठकीस विद्यापीठाचे संचालक शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, नियंत्रक श्रीमती दिपाराणी देवतराज, उपविद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे आदीसह इतर अधिकारी उपस्थित होते.