Thursday, December 1, 2022

वनामकृविच्‍या नांदेड येथील कापुस संशोधन केंद्रात शेतकरी मेळावा संपन्‍न

कापूस पीक लागवडीत यांत्रिकीकरणाची गरज ……. मा. कुलगुरू डॉ. इंद्र मणि 

कापुस लागवडीकरिता मोठा खर्च होत असुन उत्‍पादन खर्च करण्‍याची आवश्‍यकता आहे, लागवडीमध्ये मंजुरांवर मोठा खर्च होतो, मजुर वेळेवर मिळत नाहीत यावर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाची गरज असल्याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ. इंन्‍द्र मणि यांनी व्यक्त केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांच्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रामध्ये भारतीय कृषि संशोधन परिषदे अंतर्गत योजनांच्या माध्यमातून दिनांक १ डिसेंबर रोजी आयोजित शेतकरी मेळावा व निविष्ठा वाटप कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. यावेळी व्‍यासपीठावर कार्यकारी परिषद सदस्य श्री भागवत देवसरकर, संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर, संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. देवसरकर, अखिल भारतीय कापूस संशोधन प्रकल्प, कोईम्बत्तुरचे प्रकल्प समन्वयक डॉ. ए. एच. प्रकाश, महाबीजचे महाव्यवस्थापक डॉ. लहाने, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री रविशंकर चलवदे, कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, आधुनिक काळात कितीही बदल झाला तरीही शेतकरी हाच जगाचा पोशिंदा राहणार आहे. भविष्य शेतीमध्‍ये ड्रोन तंत्रज्ञानावर वापर वाढणार असुन यामुळे शेतक-यांचा वेळ व श्रम बचत होण्‍यास मदत होईल, असे प्रतिपादन करून कापूस पिकातील संशोधन व प्रसार कार्याबद्दल कापूस संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञाची त्‍यांनी प्रशंसा केली.

मार्गदर्शनात संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, बदलत्या हवामानात तग धरणारा नांदेड ४४ बीटी हा वाण वनामकृविद्वारे महाबीजच्या माध्यमातून शेतक-यांसाठी उपलब्ध करून दिला आहे. लवकरच एनएचएच २५० बीटी व एनएचएच ७१५ बीटी  महाबीजच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. कापूस पीक फायदेशीर ठरण्यासाठी कपाशीची सघन पद्धतीने लागवड करणे गरजेचे असल्‍याचे ते म्‍हणाले.

डॉ. ए. एच. प्रकाश यांनी कापूस वेचणीवरील खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरण होणे अगत्याचे असुन कापूस पीकाच्या उत्पन्नामध्ये स्थैर्यकरिता कपाशीमध्ये आंतरपीक पद्धतीचा अवलंब करण्‍याचा सल्‍ला दिला. वनामकृविद्वारे राबविलेल्या उपक्रमांमुळे कपाशीतील गुलाबी बोंडअळी नियंत्रणात यश आल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी. बी. देवसरकर म्‍हणाले की, परभणी कृषी विद्यापीठाच्‍या वतीने 'माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी' हा उपक्रम मागील तीन महिन्यापासून संपुर्ण मराठवाडयात राबविण्यात येत असून याद्वारे शास्त्रज्ञ शेतक-यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

कार्यकारी परिषद सदस्य श्री भागवत देवसरकर यांनी नांदेड येथील संशोधन केंद्राच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री रविशंकर चलवदे यांनी भरडधान्याचे आहारातील महत्व सांगुन कृषि विभागाच्या यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन इत्यादी योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने शेतक-यांनी अर्ज दाखल करण्‍याचे आवाहन केले. तसेच महाबीज चे महाव्यवस्थापक डॉ. लहाने यांनी सार्वजनिक क्षेत्रातील नविन बीटी संकरित वाण लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत देऊ असे सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर बेग यांनी व संचलन डॉ. अरविंद पांडागळे यांनी केले. यावेळी शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे अधिकारी व शेतकरी यांनी कापूस संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर संशोधन प्रयोगांची पाहणी केली. कार्यक्रमात अनुसूचित जाती उपयोजना आणि प्रथम दर्शनी प्रात्‍याक्षिक अंतर्गत कृषि निविष्‍ठांचे वाटप करण्‍यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. बस्वराज भेदे, डॉ. विजय चिंचाणे, डॉ. पवन ढोके, प्रा. अरुण गायकवाड, श्री पाटील, रणवीर, तुरे, अडकिने, गौरकर, इडोळे, श्रीमती ताटीकुंडलवार, सुरेवाड, तेलेवार, श्री सोनुले  आदींनी परिश्रम केले.