Friday, December 16, 2022

वनामकृवितील कापुस विशेषज्ञ डॉ. बेग यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्काराने सन्‍माननित

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत असलेल्‍या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राचे कापूस विशेषज्ञ डॉ. खिजर समद बेग यांना महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेच्‍या वतीने राज्‍यस्‍तरीय ‘उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्कार’ राज्याचे कृषिमंत्री मा. ना. श्री. अब्दुल सत्तार यांच्या हस्ते दिनांक १४ डिसेंबर रोजी देण्यात आला. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात पार पडलेलेल्या ५० व्या संयुक्त कृषि संशोधन व विकास समिती बैठकीच्‍या उदघाटन प्रसंगी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी दापोली येथील डॉबासाकोकृविचे कुलगुरू मा. डॉ. संजय सावंत, वनामकृविचे कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणि, राहुरी येथील मफुकृ‍विचे कुलगुरू मा. डॉ. प्रशांतकुमार पाटील, अकोला येथील डॉपंदेकृविचे कुलगुरू मा. डॉ. शरद गडाख, महाराष्‍ट्र शासनाचे प्रधान सचिव (कृषि) मा. श्री. एकनाथजी डवले, कृषी परिषदेचे महासंचालक मा. श्री. रावसाहेब भागडे, संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. कृषि संशोधनातील भरीव अश्‍या योगदानाबद्दल डॉ. खिजर समद बेग यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. पुरस्‍काराबद्दल कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि, संचालक संशोधक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर आदीसह कृषि विद्यापीठाचे अधिकारी, शास्त्रज्ञ व कर्मचारी यांनी डॉ बेग यांचे अभिनंदन केले आहे.

डॉ. खिजर बेग यांचे संशोधन कार्य  

डॉ. बेग मागील १९ वर्षांपासून कृषि संशोधनात कार्यरत असुन सोयाबीन व कापूस पिकातील एकूण १६ वाणांच्या विकासामध्ये सहभाग आहे. सोयाबीन पिकातील एमएयुएस १५८, एमएयुएस १६२, एमएयुएस ६१२ व एमएयुएस ७२५ हे ४ वाण त्यांनी विकसित केले असुन एमएयुएस १६२ हा कम्बाईन हार्वेस्टरद्वारे कापणी-मळणी साठी उपयुक्‍त असणारा राज्यातील पहिला वाण आहे. खोडमाशीसाठी सहनशील वाण असणारा एमएयुएस १५८, बदलत्या हवामानात तग धरणारा एमएयुएस ६१२ वाण विकसित करण्‍यात त्‍यांचा मोलाचा वाटा आहे. देशी कापूस पिकाचे ८ व अमेरिकन कपाशीचे ४ वाण विकसित करण्यात त्‍यांचा महत्वाचा सहभाग असुन देशी कपाशीची गुणवत्ता - धाग्याची लांबी देशामध्ये सर्वात जास्त असणारा पीए ८१२ हा वाण विकसित करण्यात आला आहे. महाबीजच्या सहकार्याद्वारे एनएचएच ४४ (बीजी २) हा सार्वजनिक क्षेत्रातील पहिला बीटी कापूस संकरित वाण विकासात त्‍यांचे योगदान आहे. कापूस व सोयाबीन पिकातील उत्पादन व संरक्षण तंत्रज्ञानाच्या १२ शिफारशी देण्यात त्यांचा सहभाग आहे. विविध नियतकालिकांमध्ये त्यांचे ५२ शास्त्रीय लेख, परिसंवादामध्ये ६१ सारांश लेख, कृषि विस्ताराची ६ पुस्तके व १०० पेक्षा अधिक लेख त्यांनी लिहिले आहेत. विविध ७ संशोधन प्रकल्पामध्ये त्यांचा सहभाग असुन १० पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना मुख्य मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले आहे. यापूर्वी राज्यस्तरीय वसंतराव नाईक पुरस्कार, राधाकिशन शांती मल्होत्रा पुरस्कार, राष्ट्रीय स्तरावरील प्रोफेशनल एक्सलेन्स अवार्ड आदी सहा पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सद्या विद्यापीठाच्‍या सहयोगी संचालक (बियाणे) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळत असून या काळात १५० पेक्षा जास्त शेतकरी उत्पादक संस्था यांच्याशी बियाणे उत्पादनाचे करार केले आहेत. कपाशीवरील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी विशेष जनजागृती मोहीम, विद्यापीठ बीजोत्पादन व महसूलात वाढ ही त्यांचे विशेष उल्लेखनीय कार्य आहेत.