Wednesday, December 21, 2022

राणीसावरगांव येथे आयोजित शेतकरी पशुपालक मेळाव्‍यास मोठा प्रतिसाद

शेतकरी कल्‍याणा‍करिता सर्वांनी एकत्रित कार्य करण्‍याची आवश्‍यकता ....... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

विद्यापीठातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेचे कार्य कौतुकास्‍पद ........ जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल

विद्यापीठातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर संशोधन गोपालकांना पुरक ..... मा श्री गोपालभाई सुतारीया


कृषि क्षेत्रात कार्य करणा-या विविध विभाग व संस्‍था यांनी शेतकरी कल्‍याणाकरिता एकत्रित कार्य करण्‍याची आवश्‍यकता आहे. जिल्‍हा प्रशासन, कृषि विभाग, राज्‍य शासनाचे विविध विभाग, कृषि विद्यापीठ, शेती क्षेत्रात कार्य करणा-यां अशासकीय संस्था, खासगी संस्‍था, केंद्रीय संशोधन संस्‍था आदी संस्‍था कृषि विकासाकरिता कार्य करित आहेत, सर्वांनी एकत्रित कार्य केल्‍यास शेतकरी बांधवाचा विकास प्रभावीपणे करणे शक्‍य असल्‍याचे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केली. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प पशुशक्‍तीचा योग्य वापर योजना आणि राणी सावरगांव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा यांचे संयुक्त विद्यामाने राणीसावरगांव (ता. गंगाखेड जि. परभणी) येथ दिनांक २० डिसेंबर रोजी आयोजित विद्यापीठ विकसित बैलचलित अवजारांचा समावेश असलेले भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्राचे (कस्टम हायरिंग सेंटर) उदघाटन व शेतकरी पशुपालक मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानावरून ते बोलत होते.

कार्यक्रमास उदघाटक म्‍हणुन परभणी जिल्हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल या उपस्थिती होत्‍या तर प्रमुख अतिथी म्‍हणुन अहमदाबाद येथील बंसी गिर गोशाळाचे अध्यक्ष मा. गोपालभाई सुतारीया उपस्थित होते. व्‍यासपीठावर मुंबई येथील ग्लोबल विकास ट्रस्टचे मुख्यसंचालक मा. श्री मयंक गांधी, भारतीय जीव पशु कल्याण व राष्‍ट्रीय पंचगव्य अनुसंधान समितीचे सदस्य श्री. सुनिल मानसिंहका, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, कृषि सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर, प्राचार्य डॉ उदय खोडके, विभाग प्रमुख डॉ गजेंद्र लोंढे, जिल्‍हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री विजय लोखंडे,  उपजिल्‍हाधिकारी श्री सुधीर पाटील,  आयोजक संशोधन अभियंता डॉ स्मिता सोलंकी, गोशाळाचे संचालक श्री शिवप्रसाद कोरे, डॉ राहुल रामटेके आदीची प्रमुख उपस्थिती होती.

कुलगुरू मा डॉ इन्‍्रद मणि पुढे म्‍हणाले की, जागतिक स्‍तरावर आणि देशात पाणी, मृदा, ऊर्जा आदीसह नैसर्गिक साधनसंपत्‍तीचे मोठा -हास होत आहे. शाश्‍वत शेती करिता नैसर्गिक साधनसपत्‍तीचे संवर्धन करण्‍याची जबाबदारी प्रत्‍येकाची आहे. शेतीला शेती पुरक व्‍यवसायाची जोड देण्‍याची गरज आहे. मृदाचे आरोग्‍य सुधारण्‍याकरिता शेणखताचा वापर वाढविणे गरजे, यात शेतीतील पशुधनाची महत्‍वाची भुमिका आहे. परभणी कृषि विद्यापीठातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या माध्‍यमातुन अनेक उपयुक्‍त कृषि अवजारे नि‍र्माण केली असुन त्‍याच्‍या प्रसार संपुर्ण राज्‍यात करण्‍याचा मोठा प्रयत्‍न केला जात आहे. राज्‍यातील आदिवासी शेतकरी बांधवापर्यंत ही अवजारे पोहचिण्‍याचे चांगले कार्य होत असल्‍याचे ते म्‍हणाले.   

मार्गदर्शनात जिल्‍हाधिकारी मा श्रीमती आंचल गोयल म्‍हणाल्‍या की, शेतीत नवनवीन तंत्रज्ञानामुळे उत्‍पादन व उपन्‍न वाढ होत आहे. शेतकरी बांधवा स्‍वय: अध्‍यायन  करून शेती केली पाहिजे. परभणी कृषि विद्यापीठाच्‍या पशुशक्‍तीच्‍या योग्‍य वापर योजनेचे कार्य अत्‍यंत कौतुकास्‍पद असुन या योजनेत विकसित केलेले विविध कृषि अवजारांना शासकीय अनुदान देण्‍याकरिता प्रयत्‍न केला जाईल, यास जिल्‍हा निधीतही तरतुद केली जाईल. बदलत्‍या हवामानास अनुकुल शेती पध्‍दतीचा अवलंब करावा लागेल, सोयाबीन व कापुस ही एकच एक पिक पध्‍दतीतुन बाहेर पडले पाहिजे. परभणी जिल्‍हयातील फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढीकरिता जिल्‍हा प्रशासन प्रयत्‍न करित असुन याचे दृश्‍य परिणाम येणा-या दिवसात दिसतील. कृषी विद्यापीठाच्‍या माध्‍यमातुन जिल्‍हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्‍या योजने अंतर्गत रेशीम उद्योग, मधुमक्षिका पालन, अन्‍न प्रक्रिया आदीवर आधारित विविध कौशल्‍य विकास कोर्सेस सुरू करण्‍यात येत असुन जास्‍तीत जास्‍त युवकांनी याचा लाभ घेण्‍याचे त्‍यांनी आवाहन केले. 

मा श्री गोपालभाई सुतारिया म्‍हणाले की, भारतीय संस्‍कृतीत गायीस माता म्‍हटले असुन शेतीत गायीस मोठे महत्‍व आहे. केवळ दुध उत्‍पादनाकरिता गायीचे संगोपन नसुन गायीचे शेण व मलमुत्र यांच्‍या वापरामुळे मातीतील कर्बाचे प्रमाणात वाढी मोठी मदत होते. यापासुन निर्माण केलेले गोअमृत यामुळे किड, रोग व्‍यवस्‍थापन, उत्‍पादन वाढ शक्‍य आहे. परभणी कृषि विद्यापीठाच्‍या पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजनेच्‍या माध्‍यमातुन बैलचलित अवजारे निर्मिती व संशोधन हे गोपालक व गोशाळा वयवस्‍थापकांना पुरक असल्‍याचे सांगुन त्यांनी बंसी गिर गोशाळा करित असलेल्‍या विविध कार्याची माहितीचे सादरिकरण केले.

यावेळी मनोगतात श्री सुनिल मानसिंहका यांनी भारतीय गोवंशाचे संगोपन व संवर्धन करण्‍याची गरज असल्‍याचे सांगितले तर श्री मयंक गांधी यांनी वृक्ष लागवड करतांना फळबागे लागवडीवर भर देण्‍याचा सल्‍ला दिला. संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठातील पशुशक्‍तीचा योग्‍य वापर योजना ही राज्‍यातील एकमेव प्रकल्‍प बैलचलित अवजार निर्मितीकरिता कार्य करित असल्‍याचे सांगितले तर लातुर विभागीय कृषी सहसंचालक श्री साहेबराव दिवेकर यांनी विविध कृषि विषयक योजनेचा लाभ घेण्‍याचे आवाहन शेतकरी बांधवांना केले.

कार्यक्रमाच्‍या प्रास्‍ताविकात आयोजक डॉ स्मिता सोळंकी म्‍हणाल्‍या की, राणी सावरगांव येथे उभारण्‍यात आलेल्‍या भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्रात विद्यापीठ विकसित बैलचलित अवजारे परिसरातील शेतकरी बांधवांना भाडेतत्‍वावर वापराकरिता राणीसावरगांव येथील श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा येथे उपलब्ध करून देण्यात आली असुन या अवजारांचे प्रात्यक्षिके प्रत्यक्ष शेतावर दाखवण्यात येणार असल्‍याचे सांगितले.  तर श्री शिवप्रसाद कोरे यांनी सदर अवजारांचा लाभ जास्‍तीत जास्‍त शेतकरी बांवधांनी होण्‍याकरिता श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा प्रयत्‍नशील राहील, असे आश्‍वासन दिले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री संदेश देशमुख यांनी केले तर आभार शिवसांब कोरे यांनी मानले. कार्यक्रमास राणी सावरगांव व परिसरातील एक हजार पेक्षा जास्‍त शेतकरी बांधव, व शेतकरी महिला उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि राणी सावरगांव येथील गावक-यांनी परिश्रम घेतले.

राणी सावरगांव येथे उभारण्‍यात आलेल्‍या भाडेतत्वावर कृषि अवजारे सेवा केंद्रात विद्यापीठ विकसित बहुविध पेरणी यंत्र, धसकटे गोळा करणे अवजार, तिहेरी कोळपे, बैलचलित सरी पाडणे यंत्र, ऊसाला माती लावणे अवजार, हळदीला माती लावणे अवजार, हळद काढणी अवजार, एक बैलाची अवजारे, कापसातील कोळपणी व खत देणे अवजार, बैलचलित सोलार तणनाशक व किटकनाशक फवारणी यंत्र, आजारी पशुधन उभा करणे यंत्र इत्यादी विविध अवजारे उपलब्‍ध करण्‍यात आली आहेत.