Friday, December 2, 2022

कृषि यांत्रिकीकरणामध्‍ये सुधारीत बैलचलित अवजारांचा वापराची आवश्‍यकता ...... संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर

पशुशक्‍तीचा योग्य वापर योजनेच्‍या वतीने बैलचलित कृषी अवजारे सेवा केंद्र उभारणीसाठी भाडेतत्‍वावर अवजारांचे हस्‍तांतरण

वसंतराव नाईक मराठवाडा कृष‍ि विद्यापीठ अंतर्गत अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प, पशुशक्‍तीचा योग्य वापर योजने अंतर्गत भाडे तत्वावर बैलचलित कृषि अवजारे सेवा केंद्र ऊभारणीसाठी श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा, राणीसावरगाव ता.गंगाखेड यांना हस्तांतरीत करण्यात आले. सदर उपक्रम कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि व संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्‍यात येत आहे.

योजने अंतर्गत विकसित औजारांचा संच संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांचे प्रमुख उपस्थितीत श्री. छत्रपती शिवाजी महाराज गोशाळाचे संचालक श्री. शिवप्रसाद कोरे यांना दिनांक १ डिसेंबर रोजी हस्तांतरीत करण्यात आला. यावेळी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्‍ठाता डॉ. उदय खोडके, विभाग प्रमुख (अपारंपारीक ऊर्जा स्त्रोत) डॉ. राहूल रामटेके, आयोजक पशुशक्‍तीचा योग्य वापर योजनेच्या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोळंकी, डॉ मदन पेंडके यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. दत्तप्रसाद वासकर म्हणाले की, मराठवाडया मध्ये शेतीकामात ओढशक्तीसाठी देवणी व लालकंधारी जातीचे पशुधन मोठया प्रमाणावर आहे. पशुधनाचे वार्षिक कामाचे तास वाढवणे आणि टॅªक्टर चलित अवजारांचे यांत्रिकीकरणा बरोबरच बैलचलित सुधारीत अवजारांचा वापर कार्यक्षमपणे करणे ही काळाची गरज आहे. लहान व मध्यम शेतकरी बांधवानां ट्रॅक्‍टरद्वारे शेती खर्चिक होत असून उपलब्ध पशुधनाद्वारे सुधारीत बैलचलित अवजारांचा वापर केल्यास श्रमात बचत होईल, कृषि निविष्‍ठांचा खर्च कमी होईल व पशुधनाचा वापर सेंद्रिय शेती मध्‍ये शक्‍य होईल, असे सांगुन परभणी कृषि विद्यापीठ विकसित सुधारित बैलचलित अवजारे पशुशक्‍तीचा योग्य वापर योजनेद्वारे प्रत्यक्ष शेतक-यांच्‍या शेतीवर पोहचवण्याच्या तसेच सातत्‍यांने त्‍यांना तांत्रिक मार्गदर्शन उपक्रमाची त्‍यांनी प्रशंसा केली.

डॉ. उदय खोडके यांनी वाटप केलेल्‍या अवजारांचे संचामध्ये पेरणी पुर्व तयारी पासून ते काढणी पर्यंत ची बैलचलित विकसित अवजारे आहेत याचा फायदा शेतकरी बांधवानी घ्यावा असे आवाहन केले. प्रास्‍ताविकात आयोजिका डॉ. स्मिता सोळंकी म्हणाल्या की, या अवजार संचामध्ये बहुविद्य पेरणी यंत्र, बैलचलित सौर फवारणी यंत्र, हळदीला माती लावणे यंत्र, तिहेरी कोळपे, धसकटे गोळा करणी यंत्र, हळद काढणी यंत्र, आजारी पशुधन उचलणी यंत्र आदी बहुविध २० ते २२ अवजारांचा समावेश आहे. ही बैलचलित सुधारीत अवजारे मराठवाडा विभागातील पशुधनाची कार्यक्षमता, मनुष्‍यबळ कमी करणारे तसेच श्रम कमी करणे, कृषि निविष्‍ठांची बचत होऊन उत्पादन वाढीसाठी फायदेशीर आहेत.

यावेळी योजनेचे शास्त्रज्ञ (पशुविज्ञान)  डॉ. संदेश देशमुख आणि इंजि. अजय वाघमारे यांनी अवजार वापरणे व हाताळणे याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता योजनेचे श्री. डि.बी.यंदे, रूपेश काकडे, सरस्वती पवार, श्री. महेंद्र किर्तने आदींनी परीश्रम घेतले.