Friday, October 3, 2025

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात "स्वच्छता ही सेवा अभियान २०२५" उत्साहात साजरे

 स्वच्छतेची शपथ घेऊन परिसर कचरामुक्त ठेवण्याची सर्वांनी जबाबदारी स्वीकारली



वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात भारत सरकारच्या "स्वच्छता ही सेवा अभियान २०२५" अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले. याच पार्श्वभूमीवर २4 सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या माजी सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे उपस्थित होत्या. त्यांनी पर्यावरण संरक्षण व संवर्धनात राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली. यावेळी प्लास्टिक निर्मूलन, कागदाचा अपव्यय टाळणे, तसेच परिसर स्वच्छ ठेवण्याच्या विषयावर विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. कार्यक्रमात विभागप्रमुख डॉ. नीता गायकवाड यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर गणपत पुरी यांनी सर्वांनी स्वच्छतेची शपथ घेऊन परिसर कचरामुक्त ठेवण्यासह पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले.

यानंतर २ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी केले. त्यांनी २ ऑक्टोबर दिवसाचे थोर व्यक्तिमत्वांच्या जयंती सोबतच दसरा व धम्म परिवर्तन दिन म्हणूनही महत्त्व असल्याचे सांगितले. महात्मा गांधींच्या स्वच्छतेचा संदेश अवलंबण्यासह परिसरासह मनही स्वच्छ ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात विद्यार्थिनी श्रद्धा अंभोरे यांनी महात्मा गांधींच्या कार्याचे वाचन केले, तर रेणुका लोखंडे यांनी लाल बहादूर शास्त्रीजी यांच्या कार्याचे वाचन सादर केले. यानिमित्त महाविद्यालय परिसर स्वच्छ करण्यात आला आणि "स्वच्छता ही सेवा अभियान २०२५" अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले.

कार्यक्रमात महाविद्यालयाचे कक्ष अधिकारी श्रीमती सारिका हवालदार, नर्सरी मदतनीस श्री रमेश शिंदे, कार्यालयीन कर्मचारी श्री माणिक गिरी व श्री रामेश शिंदे यांच्यासह ४५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय डॉ. शंकर गणपत पुरी यांनी केले.

महाविद्यालय प्रशासनाने या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव वाढविण्याचा उद्देश ठेवला असून, स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाच्या संदेशाचे प्रभावी पद्धतीने पालन करण्यास प्रोत्साहन दिले.















वनामकृविच्या उद्यानविद्या महाविद्यालयात दीक्षारंभ कार्यक्रम: विद्यार्थ्यांना करिअर व संशोधनाच्या संधींवर मार्गदर्शन

उद्यानविद्या पदवी ही करिअर घडविणारी आणि समाज विकासाला दिशा देणारी – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीतच्या उद्यानविद्या महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी दीक्षारंभ कार्यक्रम व पालक मेळावा दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५, रोजी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे उपस्थित होते. प्रमुख अथिती शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, प्रमुख मार्गदर्शक परभणी येथील पोलिस निरीक्षक श्री. दीपक दंतुलवार हे होते तर, प्राध्यापक व प्रभारी अधिकारी डॉ. विश्वनाथ खंदारे, शिक्षण प्रभारी अधिकारी डॉ. आनंद दौंडे, व प्रभारी अधिकारी डॉ. डी. डी. टेकाळे आदींची मंचावर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उद्यानविद्या पदवी ही केवळ एक शैक्षणिक पदवी नसून उत्कृष्ट करिअर घडविणारी आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाला दिशा देणारी पदवी असल्याचे स्पष्ट केले. या पदवीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देश-विदेशात संशोधन, उद्योगधंदे, व्यवसाय व स्टार्टअप्स अशा विविध क्षेत्रांत अपार संधी उपलब्ध होतात, असे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांना मोठ्या उत्साहाने प्रोत्साहन दिले. त्यांनी पुढे बोलताना सध्याच्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या दुःखात विद्यापीठ पूर्ण मनापासून सामील असल्याचे नमूद केले. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी विद्यापीठाची ताकद आहे” असे सांगून, विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तांत्रिक मार्गदर्शन करत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांना प्रेरणा देताना त्यांनी म्हटले की – आजच्या परिस्थितीत तुम्हीच उद्याचे तज्ज्ञ, संशोधक आणि शेतकऱ्यांचे मार्गदर्शक होणार आहात. त्यामुळे आपल्या पालकांना धीर द्या, अनावश्यक खर्च टाळा, अभ्यासावर लक्ष केंद्रित करा आणि आपल्या सह पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहा.” शेवटी, विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञान संपादन न करता ते प्रत्यक्षात उतरवून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी, समाजाच्या उन्नतीसाठी आणि राष्ट्रनिर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन करत त्यांनी आपले विचार प्रभावी शब्दांत मांडले.

यावेळी डॉ. भगवान आसेवार यांनी उद्यानविद्या पदवीचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, या शाखेतून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी त्यांना मोठ्या संधी उपलब्ध असून उज्ज्वल भविष्य त्यांच्या वाट्याला येईल. त्यांनी विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले.

प्रास्ताविकात डॉ. व्ही. एस. खंदारे यांनी उद्यानविद्या महाविद्यालयाच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. प्रमुख मार्गदर्शक श्री. दीपक दंतुलवार यांनी उद्यानविद्या क्षेत्रातील नोकरी व व्यवसायाच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले.

डॉ. आनंद दौंडे यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, अभ्यासक्रमाची रचना व शैक्षणिक नियमावली यांचे सविस्तर विवेचन केले. डॉ. सुबोध खंडागळे यांनी दीक्षारंभ कार्यक्रमांतर्गत पुढील दोन आठवड्यांचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. पालक प्रतिनिधी म्हणून श्री. माणिकराव रासवे यांनी प्रतिक्रिया दिल्या.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. वैशाली भगत, डॉ. सचिन पव्हणे, डॉ. सुबोध खंडागळे, डॉ. पुरुषोत्तम देशमुख, सौ. शमा पठाण, सौ. लोंढे, श्री. एजाज शेख, श्री. अभिजीत देशमुख, श्री. सतीश पुंड, श्री. दत्ता मुकाडे यांचे विशेष सहकार्य लाभले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशा सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अंशुल लोहकरे यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.













वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा २०२५ पंघरवाडा उत्साहात साजरा

भारत सरकारच्या "स्वच्छता ही सेवा" अभियान २०२५ अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले. दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. राहूल रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक व सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी केले. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचा उद्देश, कार्यपद्धती तसेच समाजसेवेत विद्यार्थ्यांचा सहभाग याबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात एन.एस.एस. गीताने झाली. प्रा. विवेकानंद भोसले यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. विद्यार्थ्यांनी देशाची प्रगती साधण्याची, स्वच्छतेची जबाबदारी पाळण्याची, अन्याय व भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याची तसेच पर्यावरण संवर्धन करण्याची शपथ घेतली.

दिनांक ३० सप्टेंबर रोजी करिअरचा मार्ग विकसित भारतात तरुणांची भूमिका २०४७ या विषयावर डॉ. महेश पाटील यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले. यावेळी विद्यार्थी कल्याण अधिकारी व रा.से.यो समन्वयक डॉ. राजेश कदम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती दिनांक ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. राहूल रामटेके होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना गांधीजींच्या सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेवरील माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की स्वच्छता ही फक्त घर किंवा परिसराची नाही, तर मनाची, शिक्षणाची आणि समाजाचीही असावी, तसेच माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जय जवान, जय किसान ही घोषणा विद्यार्थ्यांसमोर ठेवून त्यांनी देशसेवा, कष्ट आणि निष्ठेचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी डॉ. संदीप पायाळ तसेच विद्यार्थी यशराज जाधव, वैभव दळवी, कमलकीशोर राजमोद, गणेश बोरडे, आरती शिंदे, आर्या चोपडे व मृदिता इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता केली.

कार्यक्रमास डॉ. मदन पेंडके, डॉ. मधुकर मोरे, डॉ. रवींद्र शिंदे, इंजी. लक्ष्मीकांत राऊतमारे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैष्णवी गोरे व शिवाणी डोईजड या विद्यार्थिनींनी केले. आभारप्रदर्शन डॉ. रवींद्र शिंदे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच मंचक डोबे, प्रमोद राठोड आदींनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जबाबदारी, समाजसेवेची जाणीव आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व वृद्धिंगत झाले.











Thursday, October 2, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि जैन इरिगेशनमध्ये सामंजस्य करार — सूक्ष्म सिंचन व कृषि संशोधनाला नवी दिशा

कृषि क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी आणि ज्ञान यांचा समन्वय अत्यावश्यक — माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेड, जळगाव यांच्यात दिनांक ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी कृषि संशोधन, कृषि विस्तार आणि शिक्षण क्षेत्रातील सहकार्याकरिता सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. हा करार माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.

या करारावर विद्यापीठाचे संचालक संशोधन डॉ. खिजर बेग आणि जैन इरिगेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अनिल ढाके यांनी स्वाक्षरी केली.

या प्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, जैन इरिगेशन उद्योग समूहाने देशभरात सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यास महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सामाजिक बांधिलकी जपत या समूहाने कृषि संशोधन व विस्तार क्षेत्रातही उल्लेखनीय कार्य केले आहे. कृषि क्षेत्राचा विकास पाणी आणि ज्ञान या दोन्हींच्या समन्वयानेच शक्य आहे, असे त्यांनी नमूद केले. या करारामुळे विद्यापीठातील विद्यार्थी आणि संशोधक यांच्यातील देवाण-घेवाण वाढून कृषि तंत्रज्ञानाच्या संशोधनास चालना मिळेल. दोन्ही संस्थांच्या सहकार्याने सूक्ष्म सिंचन, ऊती संवर्धन, नर्सरी विकास, बीजोत्पादन इत्यादी क्षेत्रांमध्ये नाविन्यपूर्ण संशोधन करता येईल. तसेच जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या सहकार्याने विद्यापीठ नाविन्यपूर्ण संशोधन प्रकल्प सुरू करणार असल्याचे प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले. याशिवाय दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने शेतीतील तंत्रज्ञान प्रसार व प्रचारासाठी विविध विस्तार शिक्षण कार्यक्रम राबविण्याचे प्रतिपादनही त्यांनी केले.

यावेळी डॉ. अनिल ढाके यांनी सांगितले की, विद्यापीठाच्या सहकार्याने केळी व ऊस या पिकांच्या नवीन जाती विकसित करण्याबरोबरच ठिबक सिंचन पद्धतीबाबत संशोधन करून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, जैन इरिगेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. बालकृष्ण, पाणी व्यवस्थापन योजनेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी, संशोधन संपादक डॉ. मदन पेंडके, विभाग प्रमुख डॉ. सुमंत जाधव, डॉ. विशाल इंगळे, श्री. ऋषिकेश औंढेकर आणि श्री. भास्कर सुरनर आदी उपस्थित होते.

तदनंतर जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या प्रतिनिधींनी विद्यापीठातील बायोमिक्स युनिट, ऊती संवर्धन प्रकल्प, सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय येथे भेटी देऊन विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची पाहणी केली व चालू उपक्रमांविषयी समाधान व्यक्त केले.





Wednesday, October 1, 2025

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वनामकृविच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन : धानोरा (काळे), पूर्णा येथे प्रक्षेत्र भेट

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाची विशेष मोहीम


सप्टेंबर महिन्यात मराठवाडा विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर सध्याच्या पीक परिस्थितीत शेतकऱ्यांनी अवलंबावयाच्या व्यवस्थापनाच्या उपाययोजना तसेच येणाऱ्या रब्बी हंगामाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी, अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या शेतांवर भेटी देण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत विद्यापीठातील विविध संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे आणि कृषी महाविद्यालयांच्या मार्फत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येत आहे.

त्यानुसार आज दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी पूर्णा तालुक्यातील गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या धानोरा काळे येथील शेतकऱ्यांच्या शेतावर विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ.राकेश अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली केळी संशोधन केंद्र, नांदेडचे प्रभारी अधिकारी तथा उद्यानविद्या तज्ज्ञ  डॉ. शिवाजी शिंदे, बायोमिक्स उत्पादन केंद्राचे प्रभारी अधिकारी तथा वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर, सहाय्यक किटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांच्या चमूने भेट दिली.

यावेळी परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीनच्या शेतावर भेट दिली असता डॉ. राकेश अहिरे यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, येणाऱ्या रब्बी हंगामाकरिता पेरणीस घाई न करता, शेतातील पाण्याचा पूर्ण निचरा झाल्यानंतर आणि शेत वाफसा स्थितीत आल्यावर एक कोळपणी करावी. त्यानंतर बियाण्याची बीज प्रक्रिया करूनच हरभऱ्यासारख्या पिकांची पेरणी करावी, जेणेकरून पीक चांगले उभे राहील व खरीपातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई काही प्रमाणात रब्बी पिकाद्वारे होऊ शकेल.त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना धीर देत सांगितले की विद्यापीठ या कठीण परिस्थितीत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. तसेच शेतीच्या प्रत्येक बाबतीत व येणाऱ्या रब्बी हंगामाकरिता विद्यापीठ तांत्रिक सहाय्य देईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

उद्यानविद्या तज्ज्ञ  डॉ. शिवाजी शिंदे यांनी सांगितले की, सध्याच्या अतिवृष्टीमुळे हळदीसारख्या पिकांमध्ये पिवळेपणा दिसून येत आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सर्वप्रथम जमिनीतील पाण्याचा त्वरित निचरा करावा. त्यानंतर प्रति एकर 25 किलो युरिया आणि 10 किलो मॅग्नेशियम सल्फेट जमिनीतून द्यावे, ज्यामुळे पिकाचा पिवळेपणा कमी होईल, वाढ सुधारेल आणि उत्पादनात वाढ होईल. फळबागेमध्येही जर पाणी साठलेले असेल तर ते लवकरात लवकर बाहेर काढावे. तसेच योग्य बुरशीनाशकाची फवारणी करून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले. याशिवाय, हळदीच्या पिकात वाफसा आल्यावर माती चढवून वेळेत भरणी करून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, तुरीसारख्या पिकामध्ये फायटोप्थेरा या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास तुरीमध्ये ट्रायकोडर्माची आळवणी करावी. तसेच हळदी पिकामध्ये पानावरील ठिपके, करपा व कंदकुज या बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने योग्य वेळी नियंत्रणाच्या उपाययोजना कराव्यात. पानावरील ठिपके व करपा नियंत्रणासाठी एजोक्सिस्ट्रोबीन 18.2% + डायफेनोकोनॅझोल 11.4% (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) 10 मिली प्रति 10 लिटर पाणी यामध्ये स्टिकर मिसळून फवारणी करावी. तसेच हळदीमधील कंदकुज व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून प्रति एकरी 2 ते 2.5 किलो ट्रायकोडर्मा शेणखतामध्ये मिसळून जमिनीतून द्यावे. जास्त पावसामुळे शेतात साचलेल्या अतिरिक्त पाण्याचा वेळोवेळी निचरा करावा, जेणेकरून कंदकुज होण्यास कारणीभूत असलेल्या बुरशीचा प्रसार कमी करता येईल.

कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी हळदीवरील कंदमाशीचा प्रौढ कीटक ज्या ठिकाणी कंद उघडे पडतात त्या ठिकाणी अंडी घालतो. या अंड्यांतून निघालेली अळी कंद पोखरायला सुरुवात करते, ज्यामुळे कंदकुजसारख्या रोगांचा प्रादुर्भाव होऊन झाडे पिवळी पडतात. त्यामुळे उघडे पडलेले कंद वेळोवेळी मातीने झाकून ठेवावेत. कंदमाशीच्या नियंत्रणासाठी क्लोरोपायरीफॉस 50% हे कीटकनाशक महिन्यातून एकदा 500 मिली प्रति एकर या प्रमाणात आळवणी करावी. तसेच क्विनालफॉस 25% किंवा डायमिथोएट 30% या कीटकनाशकांची आलटून-पालटून दर 15 दिवसांनी स्टिकर मिसळून फवारणी करावी. या प्रक्षेत्र भेटीत धानोरा शिवारातील 20 ते 25 शेतकऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.






मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा पुढाकार : पिक संरक्षण व रब्बी हंगाम नियोजनासाठी विशेष मोहीम

दैनंदिन गरजेनुसार पिकानिहाय पुढील तीन ते चार दिवसांसाठी सल्ला द्यावा.....माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

सततच्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील फार मोठा भाग प्रभावित झाला आहे. खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले असून मातीचा सुपीक थर वाहून गेला आहे. अनेक कुटुंबांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने घरगुती वस्तूंसह जनावरांची हानी झाल्याचे जाणवत आहे. सध्या खरीप पिके धोक्यात असताना रब्बी हंगामही जवळ आला आहे. अशा परिस्थितीत तग धरून राहिलेल्या पिकांचे संरक्षण आणि रब्बी हंगामाचे नियोजनाची आवश्यकता आहे.

यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि  विद्यापीठाद्वारे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यापीठाचे तीनही संचालक, सर्व सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि अधिकारी यांची ऑनलाइन बैठक दिनांक २७ सप्टेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आली. या बैठकीत मराठवाड्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत त्यांचे तग धरून असलेल्या पिकांची काळजी घेण्यासाठी आणि रब्बी पिकांचे नियोजानासाठी तांत्रिक सल्ला, मार्गदर्शनासह उपलब्ध साधन सामुग्री, शेती अवजारे पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले. यामध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या शेतावर जावून मार्गदर्शन करणार आहेत.

यासोबतच माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांना कडक सूचना देत सुट्टीचा विचार न करता २४ तास मुख्यालयात उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे आदेश दिले. या सर्व कार्याचा आढावा ते नियमितपणे ऑनलाइन माध्यमातून घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पुढे, शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन त्यांच्या दैनंदिन गरजेनुसार पिकानिहाय पुढील तीन ते चार दिवसांसाठी मार्गदर्शक सूचना देणे तसेच सद्यस्थितीत आकस्मिक पीक आराखडा तयार करून उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी निर्देशित केले.

यावेळी बोलताना संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी खरीप पिकांची योग्य काळजी घेण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यात विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला देणे, तसेच मातीची झालेली झीज भरून काढण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे, असे सांगितले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी नमूद केले की सध्या शेतजमिनीवरील साचलेले पाणी बाहेर काढणे किंवा निचरा करणे हा मोठा प्रश्न आहे. यामुळे पिकांमध्ये कोणतीही मशागत करणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत तग धरून राहिलेल्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी बचावात्मक उपाययोजना करण्यासाठी शास्त्रज्ञांचा सल्ला अवलंबवावा असे आवाहन केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, विद्यापीठाची कृषि  विस्तार यंत्रणा राज्य शासनाच्या कृषि  विभागाबरोबरच विविध अशासकीय व सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठाने ठरविलेले कार्य प्रभावीपणे पोहोचविण्याचे नियोजन केले आहे.

याबरोबरच माननीय कृषिमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, माननीय कुलगुरू यांच्या पुढाकाराने विद्यापीठातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संमतीने एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा निर्णय घेतला. या बैठकीस विद्यापीठाचे नियंत्रक श्री. अनंत कदम, सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, अधिकारी तसेच शास्त्रज्ञ उपस्थित होते. बैठकीचे नियोजन मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी करून आभार मानले.  

वनामकृवितील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न

डॉ. जया बंगाळे यांच्या कार्याचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्याकडून गौरव – सेवाभाव, संयम व सकारात्मक दृष्टिकोन अनुकरणीय

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांनी विद्यापीठातील ३८ वर्षांची प्रदीर्घ सेवा पूर्ण करून नियत वयोमानानुसार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सेवानिवृत्ती झाल्या . त्यांच्या सेवापूर्ती निमित्त विद्यापीठात आयोजित गौरव सोहळ्यात त्यांना सन्मानपत्र प्रदान करून भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला.

या समारंभाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे तसेच त्यांचे पती श्री. रवींद्र बंगाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी डॉ. जया बंगाळे यांच्या कार्याची विशेष प्रशंसा केली . त्यांनी आजवर विद्यापीठाच्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे व कटिबद्धतेने पार पाडल्या असून, त्यांचा निर्धार सदैव ठाम राहिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन महाविद्यालयास त्यांची उणीव भासू देऊ नये, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. डॉ. बंगाळे यांनी आपले कार्य नेहमी आदरयुक्त व सकारात्मक दृष्टिकोनातून केले. त्यांचा हसरा व प्रफुल्लित मोठा परिवार दिसून येतो. निवृत्तीनंतर त्या निश्चितच या परिवारात व्यस्त राहतील, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक कर्मचाऱ्याच्या रुजू होतानाच त्याचा निवृत्ती दिनांक ठरतो, परंतु दरम्यानच्या काळात केलेल्या कार्याला महत्त्व असते. आपल्या कार्यामुळे कार्यालयासह कुटुंबातही शांती व समाधान निर्माण झाले पाहिजे. आपण भाग्यवान आहात की दोन्ही ठिकाणी आपल्याला प्रेम लाभले. याचे श्रेय आपल्या तपस्या, कार्यभाव , शांत व संयमी स्वभावाला जाते. समाजातील कोणत्याही नकारात्मक बाबीचा परिणाम त्यांनी आपल्या कार्यावर होऊ दिला नाही, हे गुण सर्वांनी आत्मसात करण्यासारखे आहेत, असे ते म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्रातील एकमेव सामुदायिक विज्ञान महाविद्यालय हेच आहे. समाजाचे आनंदी, उत्साही व उत्कृष्ट जीवनमान घडवणे हे या महाविद्यालयाचे ध्येय आहे. महाविद्यालयाच्या प्रायोगिक प्राथमिक शाळेचे कार्य राष्ट्रीय पातळीवर सतत गौरवले जाते. हे सर्व कार्य डॉ. बंगाळे यांच्या निवृत्तीनंतरही उर्वरित अधिकारी व कर्मचारी यांनी जबाबदारीने पुढे न्यावेत, असे त्यांनी सांगितले.अशा कर्तबगार व्यक्तिमत्वास पुढील आयुष्यासाठी आरोग्य, यश, मित्रपरिवार व आनंद लाभो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या. शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या रूपाने सदैव जिवंत राहतो. म्हणूनच विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे अनुकरण करावे, असे त्यांनी नमूद केले. तसेच ते म्हणाले कीसदैव कार्यमग्न राहिलेल्या व्यक्तींना निवृत्ती नंतरचा काळ हा कठीण जातो .मात्र, डॉ. बंगाळे यांना लेखन, काव्य , कला, संगीत व सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यातून समाजाला व परिवाराला नक्कीच लाभ होईल. जीवनात आनंद हाच सर्वश्रेष्ठ असल्याने प्रत्येकाने आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा असे त्यांनी यावेळी आवाहन केले.

डॉ. जया बंगाळे यांनी सत्काराला उत्तर देताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी या महाविद्यालयास नेहमीच महत्व दिल्याचे सांगितले. त्यांची प्रेरणा आणि संदेश प्रशासकीय कार्य करण्यासाठी लाभदायक ठरले असे सांगून त्यांचे आणि विद्यापीठ प्रशासनाचे त्यांनी आभार मानले. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, इतर महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्यासह माजी कुलगुरू महोदय डॉ. अशोक ढवण, माजी संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, डॉ. धर्मराज गोखले यांचेही त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबाबत व सहकार्याबाबत विशेष आभार मानले.

पुढे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात  जुन्या आठवणींना उजाळा देत वरिष्ठ प्राध्यापक, अधिकारी यांच्या प्रति आदर व्यक्त करत त्यांच्यासोबतच्या गोड आठवणी सांगितल्या . त्यांचेच अनुकरण करून उच्च शिक्षण प्राप्त केले, व हे सर्वजण माझ्यासाठी खरे रोल मॉडेल होते असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन, विस्तार आणि प्रशासकीय कार्यासह पूर्व प्रायोगिक प्राथमिक शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ, राष्ट्रीय आणि समाज कार्यात रस घेऊन कार्य केले. 

गृह विज्ञान आणि सामुदायिक विज्ञान एकच पदवी असल्याबाबतचा शासन निर्णय मिळवण्यास महत्त्वपूर्ण योगदान देण्याचे भाग्य लाभले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि अधिकारी कर्मचारी यांचे सहकार्य मिळाले. याबद्दल प्रत्येकाची नाव घेऊन त्यांनी दिलेल्या सहकार्याची पावती त्यांनी यावेळी दिली आणि सर्वांचे आभार मानले. या प्रसंगी विद्यापीठातील डॉ. गोदावरी पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त करत डॉ. बंगाळे यांच्या कार्याची प्रशंसा केली.

कार्यक्रमास महाविद्यालयाच्या डॉ. विजया पवार, डॉ. वीणा भालेराव, डॉ. शंकर पुरी, पूर्व प्रायोगिक प्राथमिक शाळेच्या शिक्षिका श्रीमती श्रुती आंबेकर, रेणुका म्हस्के, विद्यार्थिनी अपूर्वा लांडगे तसेच डॉ  बंगाळे यांच्या परिवारातील सदस्यांनी आपल्या आपल्या भावना व्यक्त केल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी करून आभार मानले. कार्यक्रमास महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक अधिकारी आणि विद्यार्थी हे बहुसंख्येने सहभागी झाले.