दिवाळीनिमित्त तीन गरजू व्यक्तींना आर्थिक मदतीचे वितरण
भाजीपाला
उत्पादक ग्रुप, तालुका परभणी यांच्या
वतीने सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी सणाच्या निमित्ताने तीन गरजू व्यक्तींना आर्थिक
मदत देण्याचा स्तुत्य उपक्रम दिनांक ७ नोव्हेंबर २०२६ रोजी राबविण्यात आला. या
उपक्रमांतर्गत ग्रुपच्या सदस्यांनी एकत्रितपणे जमा केलेल्या निधीचे तीन गरजू
लाभार्थ्यांना वितरण करण्यात आले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे आयोजित कार्यक्रमात विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. भूषण काळे, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव, अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. रावसाहेब भाग्यवंत, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे तसेच विद्यापीठातील इतर अधिकारी आणि भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या सदस्यांच्या उपस्थितीत लाभार्थ्यांना आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले.
यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांनी भाजीपाला उत्पादक ग्रुपच्या सामाजिक उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले
की, शेती व्यवसायाशी
संबंधित असलेल्या व्यक्तींनी केवळ आर्थिक उत्पादनापुरते मर्यादित न राहता समाजातील
गरजू घटकांच्या मदतीसाठी पुढाकार घेणे ही अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. भाजीपाला
उत्पादक ग्रुप हा सामाजिक कार्याचा दीपस्तंभ असून, त्यांच्या
या उपक्रमातून सामाजिक संवेदनशीलता, एकोपा आणि माणुसकीचे
दर्शन घडते. समाजातील गरजू व्यक्तींची दिवाळी आनंददायी व्हावी, या भावनेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम निश्चितच अनुकरणीय आहे.
भाजीपाला
उत्पादक ग्रुपच्या सदस्यांनी दरवर्षी दिवाळीच्या सणानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत
गरजू व्यक्तींना मदत करण्याचा संकल्प केला आहे. यंदा ग्रुपच्या सदस्यांनी
एकत्रितपणे ३० हजार रुपयांचा निधी जमा करून त्याचे तीन गरजू लाभार्थ्यांमध्ये वाटप
केले. यापुढील वर्षी अधिक निधी संकलित करून जास्तीत जास्त गरजू व्यक्तींपर्यंत मदत
पोहोचविण्याचा मानस ग्रुपच्या सदस्यांनी व्यक्त केला.
या उपक्रमासाठी आर्थिक योगदान देणाऱ्या सर्व सदस्यांचे आभार व्यक्त करण्यात आले. समाजातील गरजू व्यक्तींच्या जीवनात आनंद निर्माण करण्याच्या उद्देशाने भाजीपाला उत्पादक ग्रुप राबवित असलेला हा उपक्रम सामाजिक एकात्मता आणि सहकार्याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.


.jpeg)