Saturday, November 7, 2026

वनामकृवितर्फे ‘खेत बचाओ अभियान-२०२६’ अंतर्गत १२३ व्या ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवादाचे आयोजन

 दुष्काळसदृश्य परिस्थितीत हळद पीक वाचविण्यासाठी शास्त्रीय उपाययोजनांवर मार्गदर्शन


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या विस्तार शिक्षण संचालनालयांतर्गत विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र तथा कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, परभणी आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘खेत बचाओ अभियान-२०२६’ अंतर्गत ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमाच्या १२३ व्या भागाचे आयोजन शुक्रवार, दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता करण्यात आले.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे आणि मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात ‘हळद पीक व्यवस्थापन : दुष्काळसदृश्य परिस्थितीत पीक वाचविण्यासाठी करावयाच्या उपाययोजना’ या विषयावर महाराष्ट्र कृषि प्रक्रिया व साठवणूक संस्था, पदव्युत्तर संस्था, काढणीपश्चात तंत्रज्ञान, रोहा, जिल्हा रायगड येथील प्राध्यापक तथा प्रभारी अधिकारी आणि हळद पीक व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. जितेंद्रकुमार कदम यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. कदम यांनी दुष्काळसदृश्य परिस्थितीत हळद पिकाचे शास्त्रीय व्यवस्थापन, जमिनीतील उपलब्ध ओलाव्याचा कार्यक्षम वापर, पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाण्याचे नियोजन, आच्छादनाचा वापर करून जमिनीतील ओलावा टिकविणे तसेच सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली. पाण्याची कमतरता असताना पिकाला आवश्यकतेनुसार पाणी देणे, तण नियंत्रण करणे, जमिनीतील ओलावा कमी होऊ न देणे आणि पिकाच्या वाढीवर नियमित लक्ष ठेवणे या उपाययोजनांमुळे प्रतिकूल परिस्थितीत पिकाचे नुकसान कमी करण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच हळद पिकाच्या कंदवाढीच्या महत्त्वपूर्ण अवस्थेत पाण्याचे योग्य नियोजन करणे, अनावश्यक पाण्याचा अपव्यय टाळणे आणि उपलब्ध साधनसामग्रीचा प्रभावी वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी परिस्थितीनुरूप पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

मराठवाड्यातील हळद उत्पादक १७० हून अधिक शेतकऱ्यांनी या ऑनलाइन कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी शेतकऱ्यांनी हळद पिकाच्या व्यवस्थापनासंदर्भातील विविध शंकांचे निरसन करून घेतले व तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाचा लाभ घेतला. प्रतिकूल हवामान परिस्थितीतही हळद पिकाचे उत्पादन आणि गुणवत्ता टिकविण्यासाठी शास्त्रीय पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम उपयुक्त ठरला.