Sunday, July 2, 2023

मौजे पोखर्णी येथे आद्यरेषीय पिक प्रात्‍यक्षिके अंतर्गत बियाणाचे वाटप व मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय समन्वयीत संशोधन कृषीरत महिला प्रकल्प, ज्वार संशोधन केन्द्र आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विघमाने दिनांक २ जुलै रोजी मौजे पोखर्णी येथे भरडधान्य उत्पादन आणि त्यांच्या दैनंदिन आहारातील वापर वाढविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांसाठी आधरेषीय पीक प्रात्यक्षिके अंतर्गत ज्वारी आणि बाजरी पिकांच्‍या विद्यापीठ विकसित बियाणाचे वाटप करण्‍यात आले. विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी पिक लागवडीबाबत मार्गदर्शन केले. आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष २०२३ अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या श्री अन्नग्राम कार्यक्रमासाठी अखिल भारतीय समन्वयीत संशोधन कृषीरत महिला प्रकल्पाने पोखर्णी (ता. जि. परभणी) हे गाव दत्तक घेतले आहे.

कार्यक्रमास अभाससंप्र-कृषीरत महिला केंद्र समन्वयक डॉ. सुनीता काळे यांनी भरडधान्याचे महत्त्व, त्यांचे फायदे आणि भरडधान्यावर प्रकीया, त्यावर आधारित अन्नपदार्थ यावर मार्गदर्शन केले. ज्वार संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ लक्ष्मण जावळे यांनी भरडधान्याचे विविध वाण, ज्वारीच्या सुधारित वाणांची वैशिष्ट्ये आणि उत्पादन क्षमता यावर मार्गदर्शन केले. डॉ. प्रीतम भुतडा यांनी भरडधान्य लागवडीचे तंत्रज्ञान, बीजप्रक्रीया आणि खताचे नियोजन यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात गावातील शेतकरी आणि महिला मोठया संख्‍येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता प्रकल्पाचे प्रसाद देशमुख आणि ज्वार संशोधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



Saturday, July 1, 2023

वनामकृवि आणि महिको यांच्‍यात सामंजस्‍य करार

जालना : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी आणि महिको प्रा लि यांच्‍या दिनांक २६ जुन रोजी सामंजस्‍य करार संपन्‍न झाला. करारावर कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि व महिकोचे अध्‍यक्ष श्री राजेंद्र बारवाले यांच्‍या प्रमुख उपस्थितीत स्‍वाक्षरी करण्‍यात आली, यावेळी संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, श्रीमती जयश्री इन्‍द्रमणि मिश्रा, डॉ चंद्रशेखर चापोरकर, डॉ भारत चार, डॉ खिचर बेग, डॉ गजेंद्र लोंढे, डॉ मदन पेंडके, डॉ माधवी, श्री सोमेंद्र मिश्रा आदीची उपस्थिती होती. सामंजस्‍य कराराच्‍या माध्‍यमातुन पिकांचे विविध वाण, भाजीपाला, फळपिके व इतर कृषि संशोधनाकरिता एकत्रितरित्‍या कार्य करण्‍यात येणार आहे. विशेषत: तुर, सुर्यफुल, कापुस, बाजरी, आंबा, मोंसबी आदी मध्‍ये सहकायाने संशोधन करण्‍यात येणार असुन प्रशिक्षण व प्रात्‍यक्षिकेही घेण्‍यात येणार आहे.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, परभणी कृषि विद्यापीठास शंभर वर्षाचा इतिहास आहे. कृषि विकासाकरिता शासन, कृषि विद्यापीठ आणि कृषि उद्योग यांनी एकत्रित कार्य करण्‍याची गरज आहे. कृषि उद्योगास लागणारे मनुष्‍यबळ कृषि विद्यापीठात निर्माण होते, त्‍यामुळे कृषि उद्योग क्षेत्रास कशा प्रकारच्‍या कुशल मनुष्‍यबळाची गरज लक्षात घेऊन विद्यार्थीदशेतच त्‍यांना प्रशिक्षत करता येईल, त्‍या दृष्‍टीने हा सामंजस्‍य करार महत्‍वाचा आहे. फळबाग पिकांत संशोधनास सुरूवात करण्‍यात येईल. 

महिकोचे अध्‍यक्ष श्री राजेंद्र बारवाले म्‍हणाले की, महीको कंपनीने राज्‍यातील माजी मुख्‍यमंत्री स्‍व. वसंतरावजी नाईक यांच्‍या काळात दुष्‍काळ परिस्थितीत संकरीत ज्‍वारीच्‍या वाणाचे बीजोत्‍पादन करून ज्‍वारीच्‍या उत्‍पादन वाढीत आपले योगदान दिले आहे. परभणी कृषि विद्यापीठ कृषि उद्योजकांना सोबत घेऊन कार्य करित आहे, ही एक चांगली बाब असुन शेतकरी बांधवाच्‍या शेतीचे उत्‍पादन वाढीकरिता एकत्रित कार्य करू.

संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर म्‍हणाले की, जनुकीय परावर्तीत पिकांचे वाणांचे प्रयोग महीको कंपनीच्‍या माध्‍यमातुन घेतले असुन परभणी कृषी विद्यापीठ नवनवीन तंत्रज्ञान विकसित करण्‍याकरिता पुढाकार घेतला आहे.

डॉ भारत चार म्‍हणाले की, आज तंत्रज्ञानाचे युग असुन कृषि उद्योगास ज्‍या कुशल मनुष्‍यबळाची गरज आहे, ती कौशल्‍य कृषि पदवीधरांना आत्‍मसाद करण्‍याकरिता हा सामंजस्‍य करार उपयुक्‍त ठरेल. बैठकीचे प्रास्‍ताविक डॉ चंद्रशेखर चापोरकर यांनी केले.

हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व: वसंतराव नाईक यांच्‍या स्‍मृतीस विनम्र अभिवादन

वनामकृवित स्‍व. वसंतराव नाईक यांची जयंती साजरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात महाराष्‍ट्राचे माजी मुख्‍यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्‍व. वसंतराव नाईक यांची जयंती दिनांक १ जुलै रोजी कृषिदिन म्‍हणुन साजरी करण्‍यात आली. विद्यापीठातील स्‍व. वसंतराव नाईक यांच्‍या स्‍मारकाचे कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते पुजन करून विनम्र अभिवादन करण्‍यात आले.

यावेळी मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, राज्‍यातील कृषि व ग्राम विकासात स्‍व. वसंतराव नाईक यांचे मोठे योगदान असुन राज्‍यात आधुनिक कृषिची मुहूर्तमेढ त्‍यांच्‍याच काळात झाली. राज्‍यातील चार कृषि विद्यापीठाची निर्मिती करून देशातील एकाच राज्‍यात चार कृषि विद्यापीठ असलेले महाराष्‍ट्र पहिले राज्‍य ठरले, हे महान कार्य त्‍यांनी केले. त्‍यांच्‍या कार्यकाळात राज्‍याला दुष्‍काळाला सामोरे जावे लागेल, त्‍यांनी अवलंबलेल्‍या कृषि धोरणामुळे राज्‍य अन्‍नधान्‍यात स्‍वयंपुर्ण झाले असुन आज कृषि क्षेत्रात प्रगतीपथावर आहे.

कार्यक्रमास कुलसचिव डॉ धीरजकुमार कदम, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, प्राचार्य डॉ सय्यद ईस्‍माईल, प्राचार्या डॉ जया बंगाळे, प्राचार्य डॉ. राजेश क्षीरसागर सहयोगी अधिष्‍ठाता (निम्‍न शिक्षण) डॉ गजेंद्र लोंढे, प्रभारी प्राचार्य डॉ राहुल रामटेके आदींसह विविध विभागाचे विभाग प्रमुख, विद्यापीठातील अधिकारी, आणि कर्मचारी मोठया संख्‍येने  उपस्थित होते. याप्रसंगी भारतीय मृद विज्ञान संस्‍था, नवी दिल्‍ली शाखा परभणी आणि राष्‍ट्रीय सेवा योजना यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने मृद विज्ञान आणि रसायनशास्‍त्र विभाग परिसरात माननीय कुलगुरू यांच्‍या हस्‍ते वृक्षलागवड करण्‍यात आली.




Thursday, June 29, 2023

कृ‍षी क्षेत्रात फोटोव्‍होल्‍टेइक तंत्रज्ञानाच्‍या वापराकरिता वनामकृविचा जर्मनीच्‍या जीआयझेड कंपनीशी सामंजस्‍य करार

अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन सौर उर्जेतुन वीज निर्मिती सोबत पिकांची लागवड असे दुहेरी उत्‍पादन शक्‍य ...... कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि

अॅग्रोपीव्‍ही तंत्रज्ञान विकास व संशोधन करिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी,  जर्मन एजन्सी जीआयझेड (GIZ) आणि सनसीड प्रायव्‍हेट लिमिटेड यांच्‍यात दिनांक २४ जुन रोजी नवी दिल्‍ली येथील भारतीय राष्‍ट्रीय विज्ञान अकादमी सभागृहात सामंजस्‍य करार झाला. यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि जीआयझेडच्‍या इंडो-जर्मन एनर्जी फोरमचे संचालक टोपियास विंटर, सनसीड एपीव्ही प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. विवेक सराफ, जीपी पंत कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.पी.एल. गौतम, आणि वायव्‍हीके राहुल हे उपस्थित होते.

अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाबाबत माहिती देतांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, अॅग्रीपीव्‍ही - अॅग्रीफोटोव्‍होल्‍टेइक (AgriPV) तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन शेतात सौर उर्जेतुन वीज निर्मिती आणि विविध पिकांचे लागवड दोन्‍ही कार्य करणे शक्‍य होते. सौर ऊर्जा निर्मितीचे जे पॅनल असतात ते शेतात उभे करून त्‍याखालील जागेत विविध पिकांची लागवड केली जाते. हे तंत्रज्ञान पर्यावरण पुरक असुन कोणतेही प्रदुषण होत नाही. या तंत्रज्ञानाचा जर्मनी, जपान व इटली देशामध्‍ये वापर होत असुन भारतातही तंत्रज्ञानास वाव आहे. सौर ऊर्जाच्‍या पॅनल करिता मोठया प्रमाणात जमिन क्षेत्रफळाची आवश्‍यकता लागते, त्‍यामुळे अॅग्रीपीव्‍ही तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन सौर ऊर्जेतुन वीज निर्मितीसोबत विविध पिकांची लागवड केल्‍यास शेतकरी बांधवाना दुहेरी उत्‍पन्‍न मिळण्‍याचे साधन प्राप्‍त होऊ शकते. हे तंत्रज्ञान भारताकरिता नवीन असुन या तंत्रज्ञानाची मराठवाडयातील पिक पध्‍दतीत कितपत उपयुक्‍त ठरू शकते, याकरिता संशोधनाची गरज असुन परभणी कृषि विद्यापीठाने जीआयझेड सामजंस्‍य करार केला आहे.

जीआयझेड हा जर्मन फेडरल सरकारच्या मालकीचा आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे, जो १३० हून अधिक देशांमध्ये अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. सदर करारांतर्गत संशोधन प्रकल्‍पाचा उद्दिष्ट विविध ऍग्रिव्होल्टेइक संरचना अंतर्गत योग्य पीक लागवडीची धोरणे तयार करणे आहे, तसेच भारतातील हवामानात विशेषतः मराठवाडा विभागात अॅग्रीपीव्ही तंत्रज्ञानास अनूकुल पिक पध्‍दती तयार करणे हा असुन विद्यापीठाच्‍या पदव्‍युत्‍तर विद्यार्थ्‍यांनाही संशोधनास मदत होणार आहे. यासोबतच कराराच्‍या माध्‍यमातुन सेंद्रीय शेती, काटेकोर शेती, नैसर्गिक संसाधन व्‍यवस्‍थापन आणि इतर तत्‍सम क्षेत्रात जीआयझेड सोबत सहकार्याने संशोधन करण्‍यात येणार आहे.




Tuesday, June 27, 2023

कृषि व ग्राम विकासात महिलांचे मोठे योगदान …… कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

मौजे मांडाखळी येथे आयोजित माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी उपक्रमात प्रतिपादनड्रो

न फवारणीचे दाखविण्‍यात आले प्रात्‍यक्षिक 

महिला व युवकांचा मोठा सहभाग 

कृषि व ग्राम विकासात महिलांचे मोठे योगदान असुन समाजात महिलांचा योग्‍य सन्‍मान झाला पाहिजे. प्रत्‍येक क्षेत्रात महिला आघाडीवर असुन शेतीतील अनेक काम महिला चांगल्‍या पध्‍दतीने करतात. कृषि क्षेत्रात डिजिटल तंत्रज्ञान वापराबाबत परभणी कृषि विद्यापीठाने पुढाकार घेतला असुन शेतकरी बांधवामध्‍ये ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार करिता विविध उपक्रम राबविण्‍यात येत आहेत. राष्‍ट्रीय पातळीवर शेतीत ड्रोन वापराबाबत कार्यपध्‍दती व मार्गदर्शक तत्‍वे निश्चित झाले आहे. ड्रोनचा वापर केल्‍यास कमी वेळात कार्यक्षमरीत्‍या किटकनाशकांची फवारणी होते. सेंन्‍सर व्‍दारे ड्रोनच्‍या माध्‍यमातुन पिकांतील किड व रोगाचा प्रादुर्भाव ओळखुन इच्छित ठिकाणीची किटकनाशकांची फवारणी करता येणार आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी केले. महाराष्‍ट्र शासनाच्‍या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात दिनांक २७ जुन रोजी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम राबविण्यात आला, या उपक्रमांतर्गत परभणी तालुक्‍यातील मौजे मांडाखळी येथे परभणी कृषी विज्ञान केंद्र व विस्‍तार शिक्षण संचालनालय यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते, तर विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, सरपंच श्री नागेश सिराळ, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम बी पाटील, कृषि विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्‍वयक डॉ प्रशांत भोसले, नाहेप प्रकल्‍प अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे आदीसह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते. 

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, विद्यापीठाने नुकतेच ग्राफ्टींग रोबोट खरेदी केले असुन ही सुविधा शेतकरी बांधवा उपलब्‍ध करण्‍यात येईल. डिजिटल तंत्रज्ञानाबाबत ग्रामीण युवकांचे कौशल्‍य विकास केल्‍यास मोठा रोजगार ही उपलब्‍ध होईल. विद्यापीठ शेतकरी,  महिला व युवकांमध्‍ये उद्योजकता विकासाकरिता प्रयत्‍नशील आहे. नवीन राष्‍ट्रीय शिक्षण धोरणात निरंतर शिक्षणाची संधी सर्वांना मिळणार आहे. या वर्षी विद्यापीठाने १२५० एकर अतिरिक्‍त जमीन वहती खोली आणली असुन यामुळे विद्यापीठाचे बीजोत्‍पादन दुप्‍पट होण्‍यास मदत होणार आहे.         

डॉ देवराव देवसरकर म्‍हणाले की, शेतकरी बांधव सोयाबीन, तुर, ज्‍वारी, मुग आदींची पिकांचे स्‍वतांचे बियाणे वापरू शकतो. पेरणीपुर्वी बीजप्रक्रिया केल्‍यास उत्‍पादनात वाढ होते. ज्‍या शेतकरी बांधवांना शक्‍य आहे, त्‍यांनी सोयाबीन पिकांकरिता बीबीएफ पध्‍दतीचा अवलंब करण्‍याचे आवाहन केले. डॉ एम बी पाटील यांनी संत्रा फळबागेचे व्‍यवस्‍थापनावर तर डॉ गोपाल शिंदे यांनी ड्रोनचा वापराबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमात शेतकरी रमेश राऊत, महिला शेतकरी अर्जना सिराळ यांनी मनोगत व्‍यक्‍त केले. यावेळी शेतकरी बांधवाच्‍या शेतात ड्रोन फवारणीचे प्रात्‍याक्षिक दाखविण्‍यात आले.  कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक डॉ प्रशांत भोसले यांनी केले तर सुत्रसंचालन श्रीधर पवार यांनी केले. कार्यक्रमास गावातील शेतकरी बांधव, महिला शेतकरी व युवक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

महाराष्‍ट्र शासनाच्‍या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या वतीने संपूर्ण मराठवाड्यात दिनांक २७ जुन रोजी 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आदीं ठिकाणीचे विद्यापीठ शास्त्रज्ञ प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसचे त्‍यांच्‍या शेती विषयी तांत्रिक समस्याचे समाधान करण्यात आले.



Saturday, June 24, 2023

वनामकृवित बाल्‍य रेशीम किटक संगोपनावर दहा दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील रेशीम संशोधन योजनेच्‍या वतीने “बाल्य रेशीम किटक संगोपन” या विषयावर युवक, शेतकरी व महीलांसाठी दिनांक ४ ते १३ जुलै दरम्‍यान १० दिवसीय रेशीम उद्योग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर प्रशिक्षण सशुल्क असून मराठवाडयातील सर्व जिल्हयातुन ३० रेशीम उद्योजक शेतक-यांची निवड करण्यात येईल. प्रशिक्षणा दरम्यान राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे, तरी इच्छुक शेतक­यांनी नाव नोंदणी करिता वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. धनंजय मोहोड (मो.न. 9403392119) यांच्या कडे संपर्क करावा, अशी माहिती रेशीम संशोधन योजनेचे प्रभारी अधिकारी डॉ सी बी लटपटे यांनी दिली आहे.

Friday, June 23, 2023

कृषी व कृषी संलग्‍न शिक्षण व्‍यावसायिक पदवी अभ्‍यासक्रमांच्‍या केंद्रिभुत प्रवेश प्रक्रियेस सुरूवात


महाराष्‍ट्रातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, महात्‍मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला या चारही कृषि विद्यापीठातील पदवी अभ्‍यासक्रमाच्‍या प्रवेशास सुरूवात करण्‍यात आली आहे. राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी कृषी शिक्षण विभागांतर्गत असलेल्‍या कृषी शिक्षण व्‍यावसायिक पदवी अभ्‍यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी केंद्रिभुत प्रवेश प्रक्रिया शनिवार दिनांक २४ जुन पासुन सुरू करण्‍यात आली आहे. कृषी व कृषी संलग्‍न व्‍यावसायिक पदवी अभ्‍यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी २०२३ सामाईक प्रवेश परीक्षा तसेच संबंधित अभ्‍यासक्रमाशी निगडीत इतर राष्‍ट्रीय प्रवेश परीक्षा दिलेल्‍या आहेत, अशा पात्र उमेदवारांनी शनिवार दिनांक २४ जुन पासुन ते रविवार दिनांक ९ जुलै पर्यंत राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्‍या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्‍थळावरील लिंकवर क्लिक करून प्रवेशासाठी नोंदणी (Registration) करून ऑनलाईन पध्‍दतीने अर्ज स्‍वीकृती संगणक प्रणालीव्‍दारे (Online Application System) योग्‍य कागदपत्र तसेच प्रमाणपत्र स्‍कॅन (Scan) करून अपलोड करावीत. सविस्‍तर वेळापत्रक राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्‍या अधिकृत संकेतस्‍थळाावर प्रसिध्‍द करण्‍यात येईल, अशी माहिती आयुक्‍त, राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष महाराष्‍ट्र राज्‍य मुंबई जाहिर सुचनेव्‍दारे दिली आहे.