Wednesday, June 22, 2022

एकात्मिक शेती पध्दतीचा अवलंब केल्‍यास आर्थिक स्‍थैर्य प्राप्‍त होईल .... डॉ. दत्तप्रसाद वासकर

मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथील दत्‍तक शेतकरी बांधवा विद्यापीठ विकसित वाणाच्‍या बियाण्‍याचे वाटप

विद्यापीठ विकसित पिकाचे वाण तसेच विविध पीक पध्दती, शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान शिफारसींचा अवलंब करून पीक पध्दतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवानी एकात्मिक शेती पध्‍दतीचा अवलंब करण्‍यास उत्‍पादनात वाढ होईल आर्थिक स्‍थैर्यही प्राप्‍त होईल, असे प्रतिपादन संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांनी केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्‍पांतर्गत “कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धती” योजनेच्‍या वतीने देशाचा आझादी का अमृत महोत्सवाचे औचित्‍य साधुन दिनांक १० जुन रोजी खरीप पूर्व हंगाम नियोजन बैठक व कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले होते, त्‍याप्रसंगी अध्‍यक्षीय भाषणात ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहूणे सरपंच (आडगाव) श्री. बालासाहेब ढोले, उपसरपंच श्री रमाकांत पौडशेट्टे हे उपस्थित होते तर मुख्यशास्त्रज्ञ डॉ. वासुदेव नारखेडे, श्री. रावसाहेब राऊत, डॉ. मदन पेंडके आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमा सरपंच श्री. बालासाहेब ढोले, उपसरपंच श्री. रमाकांत पौडशेट्टे, श्री. मोतीराम ब्याळे आदींनी गावात राबविण्यात येत असलेल्या योजनेबद्दल आपले अनुभव सांगितले. 

निवडक शेतकऱ्यांना खरीप पिकांचे विद्यापीठ विकसित वाण सोयाबीन (एमएयुएस-१५८), तुर (बीडीएन-७११, ७१६), मुग (बीएम-२००३-०२) खरीप ज्वारी (पीकेव्‍ही-१००९) आदींचे वाटप करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले तसेच आभार श्रीमती आम्रपाली गुंजकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बालासाहेब घोलप, विनायक रिठे, संतोष धनवे, मोरेश्वर राठोड, सुमित सुर्यवंशी, दिपक भुमरे आदींनी परिश्रम घेतले.  

मौजे आडगाव (ता. पालम जि. परभणी) येथे २०१८-१९ पासून हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्‍थे आणि विद्यापीठातील अखिल भारतीय कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने “कोरडवाहू एकात्मिक शेती पद्धती” ही योजना राबविण्यात येत आहे. योजनेअंतर्गत गावातील २८ शेतकऱ्यांची निवड करण्यात आलेली आहे. निवडक शेतकऱ्यांना खरीप पिकांचे विद्यापीठ विकसित वाण सोयाबीन (एमएयुएस-१५८), तुर (बीडीएन-७११, ७१६), मुग (बीएम-२००३-०२) खरीप ज्वारी (पीकेव्‍ही-१००९) आदींचे वाटप करण्यात आले आहे. कोरडवाहू हवामान बदलानुरुप परिस्थितीत कोरडवाहू शेतीचे व्यवस्थापन ही पुस्तिका गावातील शेतकरी बंधुंना वाटप करण्यात आली. योजनेअंतर्गत शेतीशी जोडधंदा म्हणून शेळीपालन व कुक्कुटपालन यासंबंधीत शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आले. एकात्मिक शेती पध्‍दतीचा प्रचार व प्रसार करण्‍यात येतो. याचबरोबर पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या दृष्टीने विहीर तसेच कुपनलिका पुनर्भरण, बांबुच्या लागवडीविषयी मार्गदर्शन केले. मृदाशास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे यांनी पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या शेतावरील मातीचे नमुणे पृथ्थकरणासाठी घेतले.