Thursday, June 23, 2022

परभणी कृषि महाविद्यालयाच्या छात्रसैनिकांचे नांदेड येथील एनसीसी शिबिरामध्ये आयोजित विविध स्‍पर्धेत यश


नांदेड येथील स्वामी रामानंद तिर्थ विद्यापीठात ५२ महाराष्ट्र बटालियन, एनसीसी नांदेड यांच्या वतीने दिनांक १२ ते २१ जून दरम्यान राष्ट्रीय छात्रसैनिकांकरिता वार्षिक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले  होते. यात विविध महावि़द्यालयातील ४५० छात्रसैनिक सहभागी झाले होते. या शिबिरामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयाच्‍या ६१ छात्रसैनिक सहभागी झाले होते. शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या छात्र सैनिंकांनी विविध स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन केले. यामध्ये ड्रिल, शस्त्र कवायत, फायरिंग, फ्लॅग एरिया, पारंपरिक वेशभूषा, बेस्ट कॅडेट, बेस्ट हार्डवर्कर, हॅन्डरायटिंग, टेबल ड्रिल आदीमध्‍ये प्राविण्य मिळविले. शिबिरामध्ये महाविद्यालयाच्या छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख यांनी अल्फा कंपनी कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळली. सिनियर अंडर ऑफिसर अक्षय गुट्टे, प्रकाश पाचनकर, धनराज ठाकूर, वृषभ रणवीर, आदित्य बेहाडे, सौरभ, शशिकांत, आशिष, पवन, गजानन, प्रसन्न, श्रीकृष्ण, सुशांत, निवृत्ती, प्रकाश, लक्ष्मण आदींनी पारितोषके पटकावली. कमांडिंग ऑफिसर कर्नल एम रंगराव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यशाबाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ. प्रमोद येवले, संचालक शिक्षण डॉ धर्मराज गोखले, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. संजीव बंटेवाड आदींनी छात्रसैनिकांचे अभिनंदन केले.