Thursday, June 16, 2022

वनाममकृवितील कोरडवाहू शेती संशोधन केंद्रास अतिशय कार्यतत्पर केंद्राचा विशेष पुरस्कार प्रदान

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन केंद्रास राष्ट्रीय स्तरावरील अतिशय कार्यतत्पर संशोधन केंद्र हा विशेष पुरस्कार देवून गौरविण्यात आले. हैद्राबाद येथील केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्‍थेत ते ४ जून दरम्यान अखिल भारतीय समन्वयीत कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाच्या विविध केंद्राची व्दिवार्षिक कार्यशाळा आयोजीत करण्यात आली होती. सदरिल कार्यशाळेच्‍या उदघाटन प्रसंगी मान्‍यवरांच्या हस्ते पुरस्‍कार डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. मदन पेंडके, प्रा. रावसाहेब राऊत, डॉ. पपीता गौरखेडे आदींनी स्विकारला.

कार्यशाळेत देशभरातील एकूण ३२ कोरडवाहू शेती संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी हैद्राबाद येथील प्रोफेसर जयशंकर तेलंगणा राज्‍य कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. प्रविणराव, केंद्रीय कोरडवाहू संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. व्ही. के. सिंग, मोदीपुरम येथील एकात्मिक शेती पध्दती संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. ए. एस. पनवार भोपाळ येथील केंद्रीय कृषि अभियांत्रिकी संस्‍थेचे डॉ. सी. आर. मेहता, नागपुर येथील केंद्रीय कापूस संशोधन संस्‍थेचे संचालक डॉ. वाय. जी. प्रसाद, प्रकल्प समन्वयक डॉ. जी. रविंद्र चारी आदींची प्रमुख उपस्थिती होती.

सदरिल संशोधन केंद्राच्‍या वतीने कोरडवाहू आधारीत शेतातील पिकांच्या उत्पादन वाढीसाठी विविध संशोधन प्रयोग घेण्यात येवून शेतकरी बंधूंना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येते. तसेच या संशोधन केंद्रामार्फत मागील १० वर्षापासून हवामान बदलानुरुप राष्ट्रीय कृषि उपक्रम शेतकऱ्यांच्या शेतावर राबविण्यात येत आहे. मागील तीन वर्षापासून कोरडवाहू एकात्मिक शेती पध्दती ही योजना देखील राबविण्यात येत असून शेतकऱ्यांना कोरडवाहू शेतीवर आधारीत पिकांच्या उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन करण्यात येते. या कार्याची दखल घेऊन स‍दरिल पुरस्‍काराकरिता केंद्राची निवड करण्‍यात आली. पुरस्काराबद्दल संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम आदींनी प्रकल्पाच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन करण्यात आले.