Saturday, June 25, 2022

जिल्‍हा मासिक चर्चासत्रांतर्गत हिंगोली जिल्‍हयातील शेतकरी बांधवाच्‍या शेतावर प्रत्‍यक्ष भेट देऊन मार्गदर्शन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि कृषि विभाग यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने दिनांक २३ जुन रोजी जिल्हा मासिक चर्चासत्रा अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मधील मौजे गोरेगाव, जामठी आणि चौंढी या ठिकाणी शेतक-यांच्या शेतावर प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमास हिंगोली मतदार संघाचे आमदार मा. श्री. तानाजीराव मुटकुळे, विस्‍तार कृषि विद्यावेत्‍ता डॉ गजानन गडदे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शिवराज घोरपडे, उपविभागीय कृषि अधिकारी श्री. लाडके, कृषि विज्ञान केंद्राचे तज्ञ श्री. राजेश भालेराव, तालुका कृषि अधिकारी श्री.वळकुंडे, मंडळ कृषि अधिकारी श्री.विनायक पायघन आदींची प्रमुख उपस्थिती होती.

आमदार मा श्री तानाजीराव मुटकुळे मार्गदर्शनात म्‍हणाले की, शेतकरी बांधवांनी फळपिकांमध्‍ये कमी पाण्‍यात चांगले उत्‍पादन देणा-या सिताफळ पिकांची लागवड करण्‍याचा सल्‍ला दिला तर बीबीएफ तंत्रज्ञानाचा अधिकाधिक शेतक-यांनी वापर करण्‍याचे आवाहन केले.  

बीबीएफ तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करतांना डॉ. गजानन गडदे  म्‍हणाले की, बीबीएफ पद्धतीने सोयाबीनची पेरणी केल्‍यास जास्त पाऊस पडल्यास बीबीएफच्या सऱ्याद्वारे हे पाणी वाहून जाते तर कमी पाऊस पडल्यास ते सऱ्यामध्ये जागच्या जागी मुरते, आणि पावसाचा खंड पडल्‍यास हेच पाणी पिकांना उपलब्‍ध होते. तसेच पिकामध्ये हवा खेळती राहत असल्यामुळे पारंपारीक पद्धतीपेक्षा २० टक्के अधिकचे उत्पादन मिळते. कार्यक्रमास कृषि विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.