Monday, December 16, 2024

भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या द्विवार्षिक कार्यशाळेत वनामकृविच्या शास्त्रज्ञांचा गौरव

 

नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषद द्वारा संचलित मोदीपुरम येथील भारतीय एकात्मिक शेती पद्धती संशोधन संस्थाच्या, वतीने पंजाब कृषी विद्यापीठ, लुधियाना, पंजाब येथे द्विवार्षिक कार्यशाळेचे २ ते ५ डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत देशभरातील विविध संशोधन केंद्रांमधील १२५ शास्त्रज्ञांनी सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे उद्घाघाटन भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे उपसंचालक (नैसर्गिक साधन संपत्ती) डॉ. एस. के. चौधरी यांच्या हस्ते झाले, तर पंजाब कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतबीर सिंघ गोसल अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेदरम्यान, देशभरातील संशोधन केंद्रांवरील शास्त्रज्ञांनी आपापल्या केंद्रातर्फे करण्यात आलेल्या संशोधन व विस्तार कार्याचा अहवाल सादरीकरणातून मांडला.

कार्यशाळेदरम्यान केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. यामध्ये परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची विशेष दखल घेण्यात आली तसेच शास्त्रज्ञांनी एकात्मिक शेती पद्धतीसंदर्भात केलेल्या महत्वपूर्ण संशोधनासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे सहाय्यक संचालक डॉ. ए.वेलूमूरुगन , एकात्मिक शेती पद्धती संशोधन संस्था मोदीपूरमचे संचालक डॉ.सुनिल कुमार, प्रकल्प समन्वयक डॉ.  एन.रविशंकर यांच्या हस्ते डॉ. आनंद गोरे आणि डॉ. सुदाम शिराळे यांना विशेष प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.  याबरोबरच वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रभारी अधिकारी डॉ. वासुदेव नारखेडे, डॉ. आनंद कारले, कृषी विद्यावेत्ता डॉ. आनंद गोरे, डॉ. अरविंद पांडागळे, मृदा विज्ञान शास्त्रज्ञ, डॉ. सुदाम शिराळे आणि प्रा. शरद चेनलवाड यांनी विविध पीक पद्धतींवर आधारित प्रारूप विकसित केले. या प्रारूपाला राष्ट्रीय कृषी विकास बँक (नाबार्ड) ने मान्यता दिली असून शेतकऱ्यांना यासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा शेतकरी बंधू भगिनी यांना एकात्मिक शेती मधील विविध घटक जसे दुग्धपालन, शेळीपालन, शेती पिके यांचा समावेश व उभारणी करता येईल. ही कार्यशाळा शास्त्रज्ञांच्या संशोधनाला प्रोत्साहन देत एकात्मिक शेती पद्धतीला चालना देण्यासाठी महत्त्वाची ठरली आहे.