शेतकऱ्यांनी मिळालेले सल्ले आपल्या परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि कीटक शास्त्र विभागाद्वारा ऑनलाइन शेतकरी - शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा सव्वीसावा भाग कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २७ डिसेंबर रोजी संपन्न झाला.
यावेळी बोलताना कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, सध्या हवामान बदल झाल्यामुळे
पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन शेती सल्ला द्यावा. पिकावर नेमके कोणते लक्षण जाणवतील आणि
त्यावर नियंत्रण करावयासाठीचे उपाय सुचवावेत. तूर, हरभरा या पिकावर किडींचा
प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे त्यावर अधिकाधिक चर्चा करावी. याबरोबरच
पशुधन आणि फळ पिकावर देखील परिणाम होऊ शकतो याविषयी मार्गदर्शन करावे असे नमूद
करून शेतकऱ्यांना मिळालेले सल्ले त्यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे
असे आवाहन केले. यामुळे पिकांचे आणि पशुधनाचे संरक्षण होऊन योग्य उत्पादन मिळण्यास
मदत होईल असे प्रतिपादन केले.
प्रास्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एम. वाघमारे यांनी ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिला शेतकरी मेळावा खामगाव (ता. गेवराई) येथील कृषी विज्ञान केंद्र केंद्रामध्ये आयोजित केला असल्याचे नमूद करून महिला शेतकऱ्यांनी अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन केले. याबरोबरच विद्यापीठाद्वारे ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवादाचे दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी सात वाजता नियमितपणे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमांमध्ये अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी लाभ घेतला आहे. याकरिताही शेतकऱ्यांनी उत्साही प्रतिसाद देऊन सहभागी होण्याची आवाहन केले.