Wednesday, December 4, 2024

वनामकृवित कृषी शिक्षण दिन उत्साहात साजरा

कृषी शिक्षणातून स्वयंरोजगारासह विपुल प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध... कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि

भारतीय कृषी संशोधन परिषदेने पहिले भारतीय केंद्रीय कृषी मंत्री आणि स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती, भारतरत्न, डॉ. राजेंद्र प्रसाद यांचा वाढदिवस (३ डिसेंबर) भारतात कृषी शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचे सूचित केले आहे. यानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात शिक्षण संचालनालयाच्या वतीने दिनांक ३ डिसेंबर रोजी कृषी शिक्षण दिन उत्साहात साजरा केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलुगुरू मा डॉ. इन्द्र मणि हे ऑनलाइन होते. तर व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. राजेश कदम, डॉ. प्रवीण वैद्य, डॉ. आर जी भाग्यवंत, उप कुलसचिव डॉ. गजानन भालेराव, कार्यालय प्रमुख डॉ. एम जी जाधव आदी उपस्थित होते.      

यावेळी कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, कृषी शिक्षणातूनच हरित क्रांती झाली आणि लोकसंख्येची वाढ होऊन देखील भारत देश शेती उत्पादनामध्ये सक्षम झाला तसेच निर्यात देखील करू लागला. कृषी शिक्षणातून संशोधक आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची निर्मिती होत आहे. कृषी शिक्षणास मजबूती करण्यासाठी शासकीय पातळीवर विविध योजना राबविल्या जात आहेत तसेच कृषी आणि संलग्न शाखेतील महाविद्यालय सुरू केली जात आहेत. कृषी शिक्षणातून युवकांना स्वयंरोजगारासह शासकीय आणि खाजगी क्षेत्रात विपुल प्रमाणात नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, यासाठी कठोर मेहनतीची जोड असणे आवश्यक आहे असे नमूद केले. याबरोबरच त्यांनी भारत देश कृषिप्रधान असल्यामुळे युवकांनी कृषी शिक्षणाकडे अधिकाधिक वळावे असे आवाहन केले.

कुलसचिव संतोष वेणीकर म्हणाले की, कृषी शिक्षणातील युवकांनी सकारात्मक दृष्टीने पुढे जाऊन शेतकरी कल्याणसाठी सतत कार्यरत राहावे. तसेच संधीच्या शोधात राहून त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा असे प्रतिपादन केले

कृषी शिक्षण दिनानिमित्त भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या कृषी शिक्षण विभागाने उपमहासंचालक (शिक्षण) मा. डॉ. आर. सी. अग्रवाल यांचे ऑनलाईन मार्गदर्शन आयोजित केले होते. यामध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या मुख्यालयातील तसेच कार्यक्षेत्रातील सर्व महाविद्यालयाने सहभाग नोंदवला. यामध्ये महाविद्यालयाचे अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी तसेच संबंधित महाविद्यालयाच्या परिसरातील माध्यमिक विद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.