Wednesday, December 25, 2024

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात हरभरा पिकातील कीड व्यवस्थापनासाठी ऑनलाईन मार्गदर्शन

 हरभऱ्याच्या परभणी चना – १६ वाणाची प्रशंसा... कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, सेंद्रीय व नैसर्गिक शेती प्रशिक्षण व संवाद मालिकेत हरभरा पिकातील कीड व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन आयोजीत करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक २४ डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, विद्यापीठाने हरभऱ्याचा परभणी चना – १६ (बीडीएनजी २०१८-१६) हा वाण विद्यापीठाच्या बदनापुर येथील कृषि संशोधन केंद्राद्वारे विकसित केलेला असुन हा वाण महाराष्ट्र राज्यासाठी प्रसारीत करण्यासाठी मान्यता मिळालेली आहे. हा वाण सरासरी पेक्षा अधिक उत्पादन देणारा वाण असून ११० ते ११५ दिवसात परिपक्व होतो. मर रोगास प्रतिबंधक असून दाणे टपोरे आहेत. १०० दाण्याचे वजन ३८ ग्राम भरते. या वाणावर किडींचा प्रादुर्भाव तुल्यबळ वाणापेक्षा कमी होतो. या वाणाचे विशेष गुणधर्म म्हणजे जमिनीपासून जवळपास ३० सेंटीमीटर उंचीवर घाटे लागतात यामुळे मशीनद्वारे काढणी करण्यासाठी सोपा आणि उपयुक्त आहे. म्हणून या वाणाची प्रशंसा होत आहे. हरभऱ्याचे उत्कृष्ट उत्पादन येण्याच्या दृष्टीने याची लागवड पद्धतीचे मानके (एसओपी) देणे महत्त्वाचे आहे. विद्यापीठाच्या तुरीचा गोदावरी वाण हा अनेक भागात टोकन पद्धतीने ठिबक सिंचनावर लावण्यात येत आहे. याद्वारे शेतकरी उत्कृष्ट उत्पादन घेत असून मराठवाड्यासह महाराष्ट्रात मोठया प्रमाणात गाजत आहे.  २३ डिसेंबर रोजी पुणे येथे झालेल्या राष्ट्रीय कृषी दिनानिमित्त प्रदर्शनात केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण मंत्री माननीय ना. श्री. शिवराज सिंह चौहानजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भेट देऊन पाहणी केली, यावेळी त्यांना शेतकऱ्यांनी गोदावरी वाणापासून एकरी १४ क्विंटल पर्यंत उतार घेतल्याचे सांगितले. शेतकरी विद्यापीठाच्या तुरीच्या गोदावरी वाणाद्वारे ऊसाला पर्यायी पीक म्हणून पाहत आहेत. याप्रमाणेच हरभऱ्याचा परभणी चना – १६ देखील लागवडीच्या मानकांचा अवलंबून शेतकऱ्यांना रब्बी हंगामात उत्कृष्ट उत्पादन देईल. या वाणाचे बियाणे शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी सहज मिळावे म्हणून विद्यापीठाने बियाणाची एक किलोची बॅग करून २५० शेतकरी आणि २५० शेतकरी बीजोत्पादक गटांना बीजोत्पादनासाठी पुरविलेले आहे. याद्वारे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना या उत्कृष्ट वाणाचे बियाणे उपलब्ध होईल. तसेच हरभरा पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक घटकांचा वापर कमी करून अधिकाधिक जैविक आणि यांत्रिक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे नमूद केले. ते पुढे म्हणाले की, संवादामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अधिकाधिक भर देऊन शेतकरीभिमुख कार्यक्रम ठेवावा. शेतकरी प्रथम केंद्रित धरून “शेतकरी देवो भव:” या भावनेतून कार्य करावे, असेही यावेळी शास्त्रज्ञांना मा. कुलगुरू यांनी सुचित केले. 

तांत्रिक सत्रात सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. बस्वराज भेदे यांनी हरभरा पिकातील प्रमुख किडी, त्यांची ओळख व प्रकार त्यांचे जीवनक्रम, पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार नुकसान करण्याच्या पद्धती, किडीची आर्थिक नुकसान पातळी आणि नियंत्रण, किडींचे एकात्मिक व्यवस्थापन, जैविक उपाय योजना याविषयी माहिती दिली. डॉ. भेदे यांनी सांगितले की, घाटे अळी ही हरभरा पिकावरील सर्वात महत्त्वाची कीड आहे. या किडीच्या सर्वेक्षणासाठी २ कामगंध सापळे लावावेत. पिकावरील मोठया आळया वेचून त्यांचा नाश करावा. पिकापेक्षा १ ते १.५ फुट अधिक उंचीचे इंग्रजी ‘टी’ अक्षराच्या आकाराचे २० पक्षी थांबे प्रति एकरी शेतात लावावेत. पिकास फुले येत असताना सुरुवातीच्या काळात ५ टक्के निंबोळी अर्काची / अझाडीराक्टीन ३०० पीपीएम १००० मिली प्रति एकरी फवारणी करावी. घाटेअळी लहान अवस्थेत असताना एच.ए.एन.पी.व्ही. २०० मि.ली. प्रति एकरी वापरावे, त्यामध्ये २०० मि.ली. चिकट द्रव (स्टिकर) आणि राणीपाल (नीळ) ८० ग्रॅम  टाकावा. गरज पडल्यास इमामेक्टीन बेंझोएट ५% एसजी ८८ ग्रॅम किंवा क्लोरॅनट्रानीलीप्रोल १८.५% एससी ५० मि.ली. २०० लिटर पाण्यात मिसळून एकरी फवारणी करावी.
 कार्यक्रमात मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. गजानन गडदे, डॉ. बस्वराज भेदे, डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ. आनंद गोरे यांनी केले.सूत्रसंचालन आणि आभार डॉ. श्रद्धा धूरगुडे यांनी मानले.