Friday, December 13, 2024

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधकांना राष्ट्रीय सन्मान

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या संशोधक आणि विद्यार्थ्यांनी मुंबई येथे डॉ. होमी भाभा स्टेट यूनिवर्सिटीमध्ये संपन्न झालेल्या "नॅशनल कॉन्फरन्स ऑन डेटा सायन्स फॉर क्लायमेट रेसिलेन्स" या राष्ट्रीय परिषदेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परिषदेत सादर केलेल्या संशोधन निबंधासाठी विद्यापीठाला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे. कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, प्राचार्य डॉ. राहुल रामटेके, तसेच कृषी यंत्र शक्ति विभाग प्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश साध्य झाले आहे. या परिषदेतील कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालयातील श्री. विशाल दशरथराव काळबांडे यांनी सादर केलेल्या शोध प्रबंधाला प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले. तसेच तनुजा वाघ, किंजल मोरे, सुजय किंगे, नयन लोनगाडगे, प्रियंका बोरसे, सक्षम पंडितकर, आणि काजल कुमारी या विद्यार्थ्यांनीही उच्च दर्जाचे संशोधन निबंध सादर केले आहेत. या सर्व विध्यार्थ्यांचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांचा शुभहस्ते महाविद्यालाच्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला. या संशोधन निबंधांना स्कोपस इंडेक्स असलेल्या जागतिक स्तरावरील जर्नलमध्ये प्रसिद्धी दिली जाणार आहे. संशोधन प्रक्रियेत महाविद्यालयाच्या श्रीमती सुधा सालगोडे यांनी समन्वयक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यात भास्कराचार्य प्रतिष्ठानचे संचालक डॉ. अजय देशमुख, यूनिवर्सिटी ऑफ फ्लोरिडाचे प्रा. डॉ. श्रीकांत जगताप, आणि डॉ. होमी भाभा स्टेट यूनिवर्सिटीचे कुलगुरू डॉ. रजनीश कामत यांनी डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजेंस, आणि मशीन लर्निंग यावर मार्गदर्शन केले. परिषदेत विद्यार्थ्यांना मशीन लर्निंग टूल किटचा वापर करून माहिती गोळा करण्याचे तिचे विश्लेषण करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या प्रात्यक्षिकांमुळे संशोधनाची नवीन दिशा निश्चित करण्यात मदत होणार आहे.

विद्यापीठाच्या संशोधकांनी मिळवलेल्या या राष्ट्रीय सन्मानामुळे मराठवाड्याचे नाव देशभरात उंचावले आहे.