Saturday, December 14, 2024

किफायतशीर शेतीसाठी उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक – कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत आयोजित शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवादाच्या २४व्या भागात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी उत्पादन खर्चाची भूमिका अधोरेखित केली. हा ऑनलाईन कार्यक्रम १३ डिसेंबर रोजी संपन्न झाला.

अध्यक्षीय भाषणात  कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवाद हा शेतकऱ्यांसाठी विशेष उपक्रम असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी विद्यापीठाने संशोधन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले. किफायतशीर शेतीसाठी उत्पादन खर्च कमी करणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी गोदावरी वाणाच्या तुरीच्या यशोगाथेचा उल्लेख केला. सोलापूरच्या करमाळा तालुक्यात ४० शेतकरी गटांच्या माध्यमातून ४०० हेक्टरवर गोदावरी वाणाची लागवड केली गेली. यासाठी विद्यापीठाच्या बदनापूर येथील कृषी संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली कमी बियाण्याचा वापर करून टोकन पद्धत, ठिबक सिंचन व जैविक घटकांचा वापर या तंत्रज्ञानाचा उपयोग करून १५ ते २० क्विंटल प्रती हेक्टरपर्यंत उत्पादन  घेत आहेत. या प्रकल्पासाठी पाणी फाउंडेशनचा महत्त्वाचा सहभाग असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शेतकऱ्यांना खरेदी बाजार व्यवस्थे ऐवजी विक्री बाजार व्यवस्थेचा उपयोग करता आला तर त्यांच्या शेतमालाचा भाव ठरविता येईल, याकरिता गट शेती लाभदायक ठरते म्हणून गटाने शेती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रस्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यापीठ एकजुटीने कार्यरत असल्याचे सांगून शेतकऱ्यांचा सहभाग अधिक वाढविण्याचे आवाहन केले. यावेळी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध विषयांवरील त्यांच्या प्रश्नांना विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. गिरधारी वाघमारे, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. संजय पाटील, डॉ. अनंत लाड,  डॉ. गजानन गडदे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी केले.