शेतकऱ्यांच्या सेवेसाठी विद्यापीठ कटिबद्ध... कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय
आणि महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कीटक शास्त्र
विभाग व कृषि विभागाच्या क्रॉपसॅप प्रकल्पांतर्गत ऑनलाइन शेतकरी -
शास्त्रज्ञ कृषि संवाद कार्यक्रमाचा तेविसावा भाग कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ६ डिसेंबर रोजी संपन्न झाला.
यावेळी बोलताना कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे विद्यापीठाच्या वतीने अभिनंदन केले व येणाऱ्या काळात विद्यापीठात शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यास बळकटी मिळेल असे नमूद केले. विद्यापीठाचा विस्तार शिक्षण संचालकाचा पदभार उद्यानविद्या विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जी एम वाघमारे यांना मिळाल्यामुळे मराठवाड्यातील उद्यानविद्या विकासास गती मिळेल. मराठवाड्यामध्ये मागील काही दिवसात हवामानामध्ये झालेल्या बदलामुळे काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला तर थंडीमध्ये वाढ देखील जाणवली आणि नंतर अचानक कमी झाली. यामुळे पिकावर किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव होत आहे तसेच शेतीविषयक विविध समस्या जाणवत आहेत. शेतकऱ्यांच्या सेवेसाठी विद्यापीठ कटिबद्ध असून यावर समाधान मिळण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने विशेष शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवादातून केवळ शंका समाधानावरच भर देण्यात येणार आहे. याचा शेतकऱ्यांना समस्या सोडवण्यासाठी लाभ मिळेल अशी आशा व्यक्त केली.
प्रस्ताविकात विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी एम वाघमारे म्हणाले की, शेतकरी
दररोज स्वतःच्या शेतीमध्ये जातो व शेतीमधील अडचणी जाणून त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न
करतो, यामुळे शेतकरी हा खरा शास्त्रज्ञ आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या
जाणवलेल्या समस्या विद्यापीठास कळवाव्यात. विद्यापीठ त्याचे समाधान करण्यासाठी
तत्पर आहे असे प्रतिपादन केले.
यावेळी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यतील शेतकऱ्यांचा सहभाग होता.
सहभागी शेतकरी रत्नाकर ढगे पाटील, पांडुरंग डोंगरे, सुषमा देव, गणेश, योगेश लबडे, यांच्यासह अनेक
शेतकऱ्यांनी विविध पिकावर जाणवणाऱ्या समस्या नमूद केल्या. यामध्ये प्रामुख्याने
तूर आणि हरभरा पिकावरील अळीचा प्रादुर्भाव, गहू उगवणी झाल्यानंतर रिमझिम पावसामुळे
होणारे परिणाम व त्याचे उपाय, सूर्यफूल लागवड, कापूस पिकाचे फरदड व्यवस्थापन, विविध
पिकातील मर रोग, फळबागेचे व्यवस्थापन, सिताफळातील किडीचे नियंत्रण, मोसंबीचा बाहर नियोजन, तूर व आंबा पिकाच्या
काळजी आणि सध्या स्थितीत उपयुक्त पिकांच्या लागवड पद्धती याबद्दल शेतकऱ्यांनी
समस्या उपस्थित केल्या. त्यास विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ.
पुरुषोत्तम मेहकर, प्रा. अरुणगुट्टे, डॉ. अनंत लाड, डॉ. विजय जाधव, डॉ. संजय पाटील
डॉ. झगडे, डॉ. मीनाक्षी पाटील, यांनी समाधानकारक उत्तरे देऊन शेतकऱ्यांचे समाधान
केले.
विद्यापीठातीच्या शास्त्रज्ञांद्वारे तत्परतेने शंका-समाधानामुळे शेतकरी शास्त्रज्ञ कृषी संवाद हा कार्यक्रम दिवसेंदिवस शेतकरीभिमुख होत असून त्यांच्यामध्ये आवड निर्माण करत आहे. यामुळे कार्यक्रमाचा अधिकाधिक शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे विद्यापीठाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी केले तर आभार विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी मानले.