वातावरणातील बदलामुळे सध्याच्या परिस्थितीत हरभ-यावर घाटेअळी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता खालील प्रमाणे किडीचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ.डी.डी.पटाईत, डॉ.जी.डी.गडदे व श्री.एम.बी.मांडगे यांनी केले आहे.
घाटेअळी करीता शेतामध्ये इंग्रजी " T " आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत. घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत. तसेच हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना ५% निंबोळी अर्काची किंवा ३०० पीपीएम अझाडीरेकटीन ५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. अळी अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही ५०० एल.ई. विषाणूची १० मिली प्रति १० लिटर पाणी (२०० मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी.
किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर इमामेक्टिन बेंझोएट ५ % - ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ८८ ग्रॅम) किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % - ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ६० मिली) किंवा फ्लुबेंडामाईड २० % - ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर १२५ ग्रॅम) फवारावे.
अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचा दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा व्हाटस्अप हेल्पलाईन क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा.
वनामकृवि संदेश क्रमांक: ०९/२०२४ ( १८ डिसेंबर २०२४)