शेतकऱ्यांनी पाल्याला उद्योगभिमुख कृषीचे शिक्षण घेण्याकडे वळवावे... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून व संचालक विस्तार शिक्षण डॉ. गिरधारी वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारे 'माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत' हा उपक्रम विविध गावांमध्ये राबविण्यात येतो. यामध्ये प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके, शेतकरी मेळाव्याद्वारे विद्यापीठातील विविध विषयातील शास्त्रज्ञांद्वारे संवाद साधून मार्गदर्शन केले जाते. यावेळी एकूण १२ चमूमधिल ३३ शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जवळपास ५०० शेतकऱ्यांना भेट दिली व त्यांच्या शेतीविषयक समस्या जाणून घेवून त्यास समाधानकारक उत्तरे देवून विविध विषयावर मार्गदर्शन केले.
या उपक्रमांतर्गत परभणी येथील विस्तार शिक्षण संचालनालयातील कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र यांच्यातर्फे परभणी तालुक्यातील लोहगाव येथे शास्त्रज्ञानी भेट दिली. कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे या कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. यावेळी बोलताना माननीय कुलगुरू म्हणाले की, विद्यापीठ शेतकऱ्यांना कृषी तंत्रज्ञानाविषयी माहिती तर देतेच परंतु त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या प्रगतीसाठी सुद्धा सदैव तत्पर असते. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या एकातरी पाल्याला कृषीचे शिक्षण द्यावे जेणेकरून भविष्यात अशा विद्यार्थ्यातून प्रगतशील शेतकरी, कृषी उद्योजक व कार्यक्षम अधिकारी तयार होतील. त्यामुळे आपल्या कुटुंबाची, गावाची व पर्यायाने महाराष्ट्राची आणि शेतीची सुद्धा प्रगती होईल. तसेच विद्यापीठाद्वारे चालू असलेले विविध शेतकरीभिमुख कार्यक्रमाविषयी त्यांनी शेतकऱ्यांना अवगत केले. माननीय कुलगुरू यांनी कु रेणुका सिताराम देशमुख हिच्याशी ऑनलाईन पद्धतीने संवाद साधून ती गांडूळ खत निर्मिती प्रकल्पात वडिलांना करीत असलेल्या मदतीसाठी तिचे खूप कौतुक करून तिला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमात मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी शेतकऱ्यांना समाज माध्यमांचा वापर करून कृषी उत्पादनांचे विक्रीव्यवस्थापन करण्याचा सल्ला दिला. विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ.गजानन गडदे यांनी हळद लागवड करताना हळदीचे खत व्यवस्थापन आणि उत्पादनात वाढ करण्यासाठी सल्ला दिला. सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ.दिगंबर पटाईत यांनी यावेळी हळदी मधील कंदमाशी व करपा रोगाच्या व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. तर श्री. मधुकर मांडगे यांनी विद्यापीठाच्या व्हाट्सअप हेल्पलाइन बद्दल माहिती दिली. यावेळी श्री. सिताराम देशमुख यांच्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पास व अंजीर बागेस तसेच श्री. दिनकर देशमुख यांच्या हळद प्रक्षेत्रास शास्त्रज्ञांनी भेट दिली. यावेळी कार्यक्रमास लोहगाव, शिंगणापूर व सायाळा येथील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
या उपक्रमात विद्यापीठाचे सर्व कृषि विज्ञान केंद्रे, विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे, महविद्यालये, संशोधन केंद्रे यांच्या शास्त्रज्ञानी आणि कर्मचारी यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात विविध ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावर जावून भेटी दिल्या आणि उपस्थित शेतकऱ्यांना तूर, गुलाबी बोंडअळीमुळे कपाशीची पराठी काढनेबाबत तसेच रबी हंगामातील पिकाबाबत, पशुधनाची योग्य काळजी बाबत मार्गदर्शन केले.
यामध्ये प्रामुख्याने लातूर
येथील कृषि महाविद्यालय व विलासराव देशमुख कृषि जैवतंत्रज्ञान महाविद्यालयाने
मौजे बोरवटी व महापूर येथे उपक्रम राबविला. याठिकाणी सहयोगी अधिष्ठाता डॉ.बाबासाहेब ठोंबरे,
शास्त्रज्ञ डॉ. विजय भामरे,डॉ. अच्युत भरोसे आणि
डॉ. ज्ञानेश्वर सुरडकर यांनी
मार्गदर्शन केले. विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्राचे
कृषि विस्तार विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी (अंबाजोगाई) यांनी मौजे पट्टीवडगाव शेतावर भेटी
देवून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती आणि रबी हंगामातील पिकाविषयी मार्गदर्शन केले. विस्तार कृषि विद्यावेत्ता प्रा अरुण गुट्टे
यांनी उदगीर तालुक्यातील मोघा, लोहारा, कवूळखेड, हिप्परगा आणि शेल्हाळ गावात प्रक्षेत्र
भेटीच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक परिस्थितीची पाहणी केली व आवश्यकतेनुसार
शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात केले. तसेच राज्यस्तरीय पिक स्पर्धा अंतर्गत मोघा
या गावी ६ एकर क्षेत्रावर तूर पिकातील गोदावरी या वाणाचा फ्लॉट विकसीत केला आहे.
या क्षेत्रावर परिसरातील शेतकऱ्यासाठी शेतीदिनाचे आयोजन करून गोदावरी या वानाचे
महत्व शेतकऱ्यांना सांगण्यात आले. या प्रक्षेत्र भेटीमध्ये विद्यापिठातील शास्रज्ञासह लातूर जिल्ह्यातील जिल्हा अधिक्षक
कृषि अधिकारी, उपविभागीय कृषि अधिकारी, सर्व तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि
अधिकारी यांनी सहभाग नोंदवला .
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे हातमाळी येथे कापूस
प्रक्षेत्र दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी उपसंचालक डॉ.
सूर्यकांत पवार, छत्रपती संभाजीनगरचे तालुका कृषी अधिकारी श्री.श्याम गुळवे, मंडळ कृषी अधिकारी श्री.राठोड, कार्यक्रम समन्वयक
इंजि. गीता यादव, विषय विशेषज्ञ डॉ.बस्वराज पिसुरे, डॉ.संजूला भावर तसेच सरपंच श्री. हिरालाल लक्ष्मण भगुरे, उपसरपंच श्री.सोमीनाथ घायट, श्रीमती प्रभावतीताई पडूळ यांच्यासह गावातील शेतकरी व
महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.