Friday, December 6, 2024

वनामकृविमध्ये जागतिक मृदा दिन साजरा

 शेत जमिनीचा वापर प्रामुख्याने शेती उत्पादनासाठीच व्हावा... कुलगुरू मा. डॉ इन्द्र मणि

जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधून भारतीय मृदविज्ञान संस्था नवी दिल्ली शाखा परभणी व मृद विज्ञान विभाग कृषी महाविद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मृदा दिन दिनांक ५ डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण संचालक डॉ.विलास पाटील आणि माजी शिक्षण संचालक डॉ. एस.  डि. मोरे हे होते. व्यासपीठावर संचालक शिक्षण डॉ.भगवान आसेवार, संचालक विस्तार शिक्षण डॉ. जी एम वाघमारे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विभाग प्रमुख डॉ.प्रवीण वैद्य आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ इन्द्र मणि यांनी यावर्षीचे युनोस्कोच्या मार्गदर्शक सूचनानुसार मातीची काळजी : मोजणी, निरीक्षण आणि व्यवस्थापन करणे यावर सविस्तर विवेचन केले. तसेच नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन शाश्वत शेतीसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांनी भविष्यातील आपले प्रकल्प मातीच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचे ठरवावेत. यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि शाश्वत शेतीसाठी स्मार्ट तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असे प्रतिपादन केले. याबरोबरच शेत जमिनीचा वापर प्रामुख्याने शेती उत्पादनासाठीच व्हावा अशी आशा व्यक्त करून शेतजमिनीचा वापर योग्य पद्धतीने होणे आणि नियंत्रण ठेवणे गरजेचे असल्याचे नमूद केले.

याप्रसंगी विभागाने तयार केलेल्या जालना आणि हिंगोली जिल्ह्यांचे तसेच विद्यापीठाच्या प्रक्षेत्राच्या भौगोलिक माहिती प्रणाली द्वारे तयार केलेल्या नकाशांचे विमोचन करण्यात आले. तसेच परभणी तालुक्यातील ईटलापूर येथील विभागाने मातीचे नमुने घेवून तयार केलेल्या चाळीस आरोग्य पत्रिकेचे शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते वाटप केले. याबरोबरच जागतिक मृदा दिनानिमित्त आयोजित भित्तिपत्रक स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले.

कार्यक्रमात डॉ. विलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे संशोधन होणे गरजेचे आहे असे नमूद केले. विभाग प्रमुख डॉ. प्रवीण वैद्य जागतिक मृदा दिनाचे महत्त्व आणि विभातील उपक्रमाची माहिती प्रास्ताविक दिली. प्रगतशील शेतकरी श्री जनार्धन आवरगंड आणि श्री पंडित थोरात यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

सूत्रसंचालन आणि आभार डॉ. पपीता गोरखेडे  यांनी मानले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापक आणि पद्युत्तर विद्यार्थी, यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी   डॉ रामप्रसाद खंडारे, डॉ. महेश देशमुख, डॉ. सुरेश वाईकर, डॉ. भाग्यरेषा गजभिये, डॉ स्वाती झाडे, डॉ.चिक्षे डॉ. पिल्लेवाड, डॉ. सिलेवंत, श्री भानुदास इंगोले श्री मदन रणेर आणि विभागातील विद्यार्थी यांनी पुढाकार घेतला.