Tuesday, December 24, 2024

राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त “शेतकरी देवो भव:” या भावनेतून शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान

 अन्नदाता हाच जीवनदाता .... कुलगुरु मा.डॉ. इन्द्र मणि

२३ डिसेंबर, हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान स्व. चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शेतकरी दिन (National Farmers' Day) म्हणून साजरा केला जातो. चौधरी चरण सिंह यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक धोरणे राबवली आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. या दिवशी अन्न सुरक्षा व ग्रामीण अर्थव्यवस्थेतील शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान आणि त्यांच्या कष्टांचे कौतुक केले जाते. या निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय, सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “शेतकरी देवो भव:” हा शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी ऑनलाईन कार्यक्रम दिनांक २३ डिसेंबर रोजी आयोजित केला. अध्यक्ष व प्रमुख वक्ते कुलगुरु मा.डॉ. इन्द्र मणि हे होते. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. जी. एम. वाघमारे यांची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा.डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, भारताचे माजी पंतप्रधान स्व. चौधरी चरण सिंह यांचा जन्मदिन राष्ट्रीय शेतकरी दिन म्हणून साजरा केला जात आहे. या दिवशी विद्यापीठाने अवलंबलेले ब्रीद “शेतकरी देवो भव:” नुसार शेतकऱ्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचाप्रती आदर व्यक्त करत आहोत. विद्यापीठ शेतकऱ्यांचे कल्याणासाठी सतत कार्यरत आहे. शेतीमध्ये नेमके काय करायला पाहिजे हे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांनी त्यावेळीच विचार केला होता. त्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी कार्य केले. ते खूप तत्त्वज्ञानी होते. त्यांना भारतरत्न दिला त्यावेळीच शेतकऱ्यांचा खरा सन्मान झाला. त्यांचे व्यक्तिमत्व अतिउच्च होते, यामुळे त्यांचा संपूर्ण देशात आदर्श घेतला जातो. ते म्हणत असत की, शेतकरी असणे हेच गर्व असायला पाहिजे. असे गौरवद्गार माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्याप्रती कुलगुरु मा.डॉ. इन्द्र मणि यांनी केले. ते पुढे म्हणाले की, शेतकरी हा  अन्नदाता आहे, म्हणून तोच खरा जीवनदाता आहे. विद्यापीठ “शेतकरी देवो भव:” या भावनेने कार्य करत आहे. विद्यापीठाचे अस्तित्वच शेतकऱ्यांच्या हितावर अवलंबून आहे. विद्यापीठाच्या प्रत्येक कार्यक्रमात शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण समजून त्यांचा सहभाग वाढवते आणि सन्मान करते. केंद्र सरकारने देखील कृषी मंत्रालयाचे नाव बदलून केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय असे ठेवले आहे, यातूनच शेतकऱ्यांचे कल्याण महत्त्वपूर्ण मानले जात आहे असे नमूद केले. कुलगुरु मा.डॉ. इन्द्र मणि यांना चौधरी चरण सिंह यांच्या गावात कार्य करण्याचे भाग्य लाभले. त्यांना शेतकऱ्यांचा मुलगा असल्याचा गर्व आहे आणि तो सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना असावा अशी इच्छा व्यक्त केली. सर्वांनी कार्य करत असताना आपण कर्तव्यनिष्ठ, स्वच्छ विचारांनी, धैर्यानी, मेहनतीने, चिकाटीने आणि हिमतीने कार्य करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी विद्यापीठाद्वारे शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक वाण आणि तंत्रज्ञान विकसित केले असल्याचे सांगितले. या वाणाची लागवड  मराठवाड्यासह महाराष्ट्रात केली जाते. विद्यापीठाच्या तुरीचा गोदावरी हा वाण पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास १५,५०० हेक्टर वर लागवड केली आहे. या वाणाद्वारे शेतकऱ्यांना साधारणपणे एक लाखापर्यंत उत्पन्न मिळत असल्याच्या प्रतिक्रिया विद्यापीठात प्राप्त होत आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संचालक, उप संचालक यांनी देखील गोदावरी वाणाचा उल्लेख पुसा येथून विकसित राष्ट्रीय पातळीवर  बासमतीच्या ११२१ हा जसा देश पातळीवर गाजला होता त्याची जागा घेण्याची शक्यता वर्तवलेली आहे.

सोयाबीनच्या राष्ट्रीय पातळीवरील बैठकीमध्ये परभणी कृषि विद्यापीठाने सोयाबीनचे वाण विकसित करून त्याचे पुरेसे बियाणे उपलब्ध करून दिल्याबद्दल सोयाबीनच्या बियाणाचा प्रश्न सुटल्यामुळे समाधान व्यक्त केले होते. याबरोबरच बायोमिक्स सारखे उत्पादन देखील शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावण्यासाठी मराठवाड्यासह महाराष्ट्रात क्रांती करत आहे.

बीजोत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने विद्यापीठाची मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील अनेक वर्षापासून पडीत असलेल्या जमिनीपैकी ८०० हेक्टर जमीन लागवडीखाली आणलेली आहे. नुकतीच जमीन लागवडीखाली आली असल्याकारणाने या जमिनीची उत्पादन क्षमता पहिल्या वर्षी कमी राहिली. याशिवाय बीजोत्पादनामध्ये गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने भेसळयुक्त आणि रोगग्रस्त झाडांची काढणे करावी लागते. यामुळे सर्वसाधारणपणे येणाऱ्या उत्पादना एवढे बीजोत्पादनाचे उत्पादन होत नसते. परंतु या बीजोत्पादनातून शेतकऱ्यांना गुणवत्ता युक्त बियाणे उपलब्ध करून विद्यापीठ शेतकऱ्यांचा सन्मान करत आहे. दोन वर्षापूर्वी विद्यापीठ शेतकऱ्यांची बियाणाची मागणी पूर्ण करू शकत नव्हते, परंतु मागील वर्षी महाबीजला पुरवठा करून जवळपास १५०० क्विंटल बियाणे शिल्लक राहिले ते शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले.  विद्यापीठ यावर्षी १०० हेक्टर क्षेत्रावर फळबागेची नवीन लागवड करून, विविध फळांवर संशोधन करणार आहे. यातून निर्यातक्षम लागवड करणे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शक्य होईल. विद्यापीठाने मुख्यमंत्री फंडातून संशोधन केंद्र सुरू केले आहेत.  हे विद्यापीठ ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करणारे देशातील पहिले विद्यापीठ आहे. शिवाय या विद्यापीठातून ड्रोनचे कस्टम हायरिंग सेंटर देखील चालवले जाते. याचा मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे. विद्यापीठाने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या बरोबर सामंजस्य करार केलेले आहेत. यातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी लाभ मिळून भवितव्य नक्कीच उत्कृष्ट होईल. विद्यापीठ सध्या कमी मनुष्यबळावर कार्य करत आहे. याच मनुष्यबळात यावर्षीपासून चार नवीन महाविद्यालयाची पूर्ण क्षमतेने यशस्वी सुरुवात केलेली आहे. या महाविद्यालयातून स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना  त्यांच्या जवळच्या महाविद्यालयात प्रवेश घेवून कृषी शिक्षणाची संधी उपलब्ध झाली. विद्यापीठ शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जेचे विस्तार कार्यक्रम राबवत आहे. यातून शेतकऱ्यांना राष्ट्रीय पातळीवरील आधुनिक तंत्रज्ञान पाहावयास मिळत आहे. शेतकऱ्यांचा सन्मान राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाने सन्मानित केलेल्या सर्व शेतकऱ्यांचा विद्यापीठाच्या वतीने ही नुकताच यथोचित सन्मान करण्यात आला.

२३ डिसेंबर, हा दिवस शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त करण्याचा दिवस असून प्रत्येक शेतकरी हा एक रत्न समजून विद्यापीठ कार्य करत आहे. विद्यापीठाच्या कार्यात शेतकऱ्यांचा सहभाग आणि सहयोग महत्त्वाचा आहे. विद्यापीठाची कार्य करण्याची खरी ताकद शेतकरी यांचा सहभाग हाच आहे. असे त्यांनी शेवटी प्रतिपादन केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक विस्तार शिक्षण संचालक डॉ जी. एम. वाघमारे यांनी केले. कार्यक्रमात मराठवाड्यातील सुरज जयपाल जाधव, जनार्दन आवरगंड, रत्नाकर पाटील ढगे यांच्यासह अटलांटा अमेरिकेतून संगीता तोडमल यांनी शेतकऱ्यांप्रती आदर व्यक्त केला आणि विद्यापीठ तंत्रज्ञान आम्हा शेतकऱ्यापर्यंत पोहोचवते म्हणून आम्ही घडत आहोत असे गौरवोद्गार काढले. शेतीमधील समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ प्रमुख भूमिका बजावते यातून आमच्यासारखे अनेक शेतकरी यशस्वी होत असून राज्य पातळीवरील पुरस्कार मिळवू शकलो आहेत अश्या भवना व्यक्त केल्या. 

कार्यक्रमाचे आयोजनासाठी  डॉ आनंद गोरे यांनी पुढाकार घेतला. सूत्रसंचालन डॉ मीनाक्षी पाटील यांनी तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ प्रशांत देशमुख यांनी मानले.