Sunday, September 4, 2022

घोणस अळी किंवा डंख अळी (स्लज कॅटरपिलर) व्यवस्थापन

सध्या बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील शिराळा परिसरात डंख अळी किंवा घोणस अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळुण आले आहे. यासंदर्भात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कीटकशास्त्रज्ञ डॉ. विजय भामरे व डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी या अळी बाबत पुढील बाबी सांगितल्‍या आहेत.

या अळीस इंग्रजीमध्ये स्लज कॅटरपिलर असे संबोधतात. ही एक बहुभक्षी कीड असुन बांधावरील गवतावर, एरंडी, आंब्याच्या झाडावर यासारखे पिके व इतर फळपिकावर तुरळ ठिकाणी एखादी अळी दिसून येत असते. असे असले तरी एखाद्या परिसरामध्ये ही कीड जास्त प्रमाणात आल्यास अधाशाप्रमाणे पानावरील हिरवा भाग खाऊन फक्त शिरा शिल्लक ठेवल्याचे देखील उदाहरणे आहेत. शक्यतो पावसाळ्यात, पावसाच्या परतीला, उष्ण व आद्र हवामानात ही अळी दिसून येते. या अळीच्या अंगावर बारीक बारीक केस असतात, त्याखाली काही विष ग्रंथी असतात व या केसातून ते विशिष्ट रसायन किंवा विष त्यांच्या स्वसंरक्षणासाठी बाहेर टाकतात. हे रसायन त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेवर चट्टे पडून अग्नी दाह होतो. ही अळी माणसाच्या अंगावर किंवा माणसाच्या दिशेने येत नाही. ज्याप्रमाणे गांधींन माशी चा डंक लागल्यावर दाह होतो, केसाळ अळी किंवा घुले यांच्या संपर्कातून  एलर्जी होते, त्याचप्रमाणे या आळीच्या संपर्कात आपली त्वचा आल्यासच अग्नीदाह होत असतो, तो शक्यतो सौम्य असतो पण ज्या व्यक्तींना ऍलर्जी आहे किंवा दम्याचा त्रास आहे त्या व्यक्तीमध्ये मात्र तीव्र स्वरूपाची लक्षणे आपणास पहावयाला मिळू शकतात. या किडीचे नैसर्गिक नियंत्रण मोठ्या प्रमाणात निसर्गातील विविध मित्र किडी करत असतात. त्यामुळे घाबरून न जाता बांधावरील गवत काढत असताना किंवा शेतातील इतर कामे करतांना या किडीचे निरीक्षण करून ही कीड आपल्या त्वचेच्या संपर्कात येणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे काही अपवादात्मक परिस्थितीत आपल्या त्वचेशी या किडीचा किंवा तिच्या केसाचा संपर्क आल्यास आपण घरी वापरतो तो चिकट टेप हा दंश झाल्याच्या ठिकाणी हलक्या हाताने लावून काढून घ्यावा, यामुळे या अळीचे केस सहजपणे निघून जाऊन दाह कमी होण्यास मदत होते. ज्या ठिकाणी दंश झाला आहे त्या ठिकाणी बर्फ लावणे व काही प्रमाणात बेकिंग सोडा व पाण्याची पेस्ट करून लावणे हे देखील फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे. पण लक्षणे तीव्र असल्यास मात्र नजीकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्‍ला घेणे योग्य राहील. या किडीच्या नियंत्रणासाठी विशिष्ट अशा रसायनाची किंवा कीटकनाशकाची शिफारस नसली तरी नेहमीच्या वापरातील कीटकनाशक जसे की क्लोरोपायरीफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी), प्रोफेनोफोस (२० मिली प्रती १० लि. पाणी), क्वीनॉलफॉस (२५ मिली प्रती १० लि. पाणी), इमामेक्टिन बेंजोएट (४ ग्रॅम प्रती १० लि. पाणी ), ५ टक्के निमार्क हे उपयुक्त ठरतात.

सौजन्‍य : डॉ. व्ही. पी. सूर्यवशी, विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र ,आंबेजोगाई जिल्हा बीड

मौजे असोला येथे 'एक दिवस माझा बळीराजासाठी उपक्रम

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक १ सप्‍टेंबर रोजी मौजे असोला येथे माझा एक दिवस माझा बळीराजासाठी उपक्रम अंतर्गत विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. यावेळी शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. जी एम वाघमारे, कृषी विस्तार विभागाचे विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम, किटकशास्ञ विभागाचे प्रमुख डॉ पि. एस. नेहरकर, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सचिन मोरे, डॉ. रमेश पाटिल, सरपंच बाळासाहेब जावळे, उपसरपंच व्यंकटी जावळे, प्रल्हादआप्पा भरोसे, रमेशराव भरोसे, रामभाऊ जावळे, कंठीक आसोलेकर, नितीन कांबळे, ग्रामविकास अधिकारी अर्जुन वैरागर, आनंता रिक्षे, माधव पारडे आदींची उपस्थिती होती. 

मार्गदर्शनात शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखेल यांनी शेतकरी बांवधानी शेती सोबत शेती पुरक व्‍यवसायाची जोड देणे आवश्‍यक असल्‍याचे सांगितले तर डॉ जी एम वाघमारे यांनी फळबाग लागवडीवर मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्‍वीतेसाठी कृषी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी परिश्रम घेतले, कार्यक्रमास गावातील शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते. शासनाच्‍या सुचनेनुसार 'माझा दिवस माझा बळीराजासाठी' उपक्रम दि. १ सप्टेबर ते ३० नोव्हेंबर दरम्‍यान राबविण्यात येणार असुन विद्यापीठ शास्त्रज्ञांची पथक शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन करणार आहे.  

Friday, September 2, 2022

सोयाबीन पिकात शेंगा भरतांना येणा-या किड आणि रोगाचे व्यवस्थापन

वनामकृविच्‍या शास्‍त्रज्ञांचा सल्‍ला

तंबाखू वरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा)

सध्या सोयाबीन शेंगा लागण्याच्या अवस्थेत असून बऱ्याच ठिकाणी पापडी अवस्थेतील शेंगा भरत आहेत, अशा अवस्थेत सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात चक्री भुंगा, खोडमाशी या खोडकिडींचा तसेच उंटअळी, शेंगा पोखरणारी अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी (स्पोडोप्टेरा- लष्करी अळी) या पंतगवर्गीय किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर काही ठिकाणी केसाळ अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे. या किडींचे वेळीच व्यवस्थापन नाही केल्यास सोयाबीन उत्पन्नात मोठे नुकसान होऊ शकते. त्यासोबतच पावसाचा खंड पडल्याने पिकास पाण्याचा ताण बसत आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी सोयाबीन वर रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट या बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या रोगामध्ये प्रादुर्भाव झालेली पाने सुरुवातीला पाण्यात भिजल्या प्रमाणे दिसतात त्यानंतर लवकरच हिरवट-तपकिरी ते लालसर-तपकिरी होतात. संक्रमित भाग नंतर तपकिरी किंवा काळ्या रंगाचा होतो. जास्त पाऊस किंवा जास्त दमट परिस्थितीत, बुरशीच्या मायसेलियल वाढीप्रमाणे पानांवर जाळी तयार होते. पानांवर गडद तपकिरी स्क्लेरोशिया तयार होतात. रिमझिम पावसामध्ये या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात होऊन उत्पन्नात घट येऊ शकते त्यामुळे वेळीच उपायोजना करणे आवश्यक आहे.

मागिल काही वर्षांच्या अनुभवावरून असे लक्षात येते की येणाऱ्या काळात शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगांचा ही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्याकरिता पावसाचा अंदाज घेऊन पुढील प्रमाणे कीड व रोगांचे व्यवस्थापन करण्‍याचा सल्‍ला वनस्‍पती रोगशास्‍त्रज्ञ डॉ के टी आपेट, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्‍यवस्‍थापक डॉ जी डी गडदे, किटकशास्‍त्रज्ञ डॉ डी डी पटाईत आदींनी केले आहे.

किडींचे व्‍यवस्‍थापन 

क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ टक्के ६० मिली प्रती एकर किंवा थायमिथोक्झाम १२.६ टक्के अधिक लँम्बडा सायहँलोथ्रिन ९.५ टक्के हे पूर्वमिश्रित कीटकनाशक एकरी ५० मिली किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल ९.३ टक्के अधिक लँम्बडा सायहँलोथ्रिन ४.६ टक्के हे पूर्वमिश्रित कीटकनाशक एकरी ८० मिली किंवा टेट्रानिलीप्रोल १८.१८ टक्के हे एकरी १०० ते १२० मिली किंवा बिटा सायफ्ल्युथ्रीन ८.४९ टक्के अधिक इमिडाक्लोप्रीड १९.८१ टक्के हे पूर्वमिश्रित कीटकनाशक एकरी १४० मिली यापैकी कुठलेही एक कीटकनाशक फवारावे. सदरिल कीटकनाशक सर्व प्रकारच्या किडी (खोडकीडी आणि पाने खाणा-या अळ्या) करीता काम करतात. म्हणून किडीनुसार वेगळे-वेगळे कीटकनाशक फवारण्याची आवश्यकता नाही.

रोगांचे व्यवस्थापन

पानावरील ठिपके, रायझोक्टोनिया एरियल ब्लाईट, शेंगा करपा आणि इतर बुरशीजन्य रोगाकरीता टेब्युकोनॅझोल १० टक्के अधिक सल्फर ६५ टक्के हे पूर्वमिश्रित बुरशीनाशक एकरी ५०० ग्रॅम किंवा टेब्युकोनॅझोल २५.९ टक्के हे २५० मिली किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन २० टक्के हे १५० ते २०० ग्रॅम किंवा पायरोक्लोस्ट्रोबीन १३.३  टक्के अधिक पिक्साकोनाझोल ५ टक्के हे पूर्वमिश्रित बुरशीनाशक एकरी ३०० मिली प्रमाणे फवारावे. पिवळ्या मोझॅक रोगाकरिता प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून बांधावर न टाकता नष्ट करावीत आणि रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढरी माशी किडीचे व्यवस्थापन करावे

पिकास पाण्‍याचा ताण बसत असल्‍यास

पिकास पाण्याचा ताण बसत असल्यास संरक्षित पाणी द्यावे तसेच कोरडवाहू सोयाबीनला अवर्षणप्रवण परिस्थितीत तग धरून ठेवण्यासाठी १ टक्के पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच १३:००:४५ खताची १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फवारणी करतांना पाण्याची मात्रा शिफारसी प्रमाणेच वापरावे, कमी पाणी वापरल्यास फवारणीचे अपेक्षित परिणाम दिसून येत नाही. किडनाशके फवारणी करतांना योग्य ती संरक्षक विषयी काळजी घ्यावी. अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राशी ०२४५२ – २२९००० या दुरध्‍वनी क्रमांकावर संपर्क करावा.

संदर्भ : संदेश क्रमांक: ०७/२०२२  (०१ सप्टेंबर २०२२), कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रवसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी

केसाळ अळी


Thursday, September 1, 2022

देशाची सुरक्षा ही अन्‍न सुरक्षेवरच अवलंबुन असुन अन्‍न सुरक्षा ही शेतकरी बांधवाच्‍या हाती आहे ......... कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि

माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रमाची सुरुवात, एकाच दिवशी विद्यापीठ शास्‍त्रज्ञ मराठवाडयातील ६० गावात शेतकरी बांधवासोबत

महाराष्‍ट्र शासनाच्‍या सुचनेनुसार वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी च्या वतीने संपूर्ण  मराठवाड्यात १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान 'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' हा उपक्रम राबविण्यात येणार असुन दिनांक १ सप्‍टेंबर रोजी या उपक्रमाचे उद्घाटन कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते करण्‍यात आले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. देवराव देवसरकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ. दत्‍तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ. धिरजकुमार कदम, डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. उदय खोडके आदीसह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ व अधिकारी उपस्थित होते. उपक्रमांच्‍या विद्यापीठ शास्‍त्रज्ञांच्‍या पथकांच्‍या वाहनांना कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी हिरवा झेंडा दाखविला.

'माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी' उपक्रमांतर्गत संपूर्ण मराठवाड्यातील विद्यापीठ अंतर्गत असलेल्‍या कृषी विज्ञान केंद्रे, संशोधन केंद्रे, कृषी महाविद्यालये आदीं ठिकाणीचे विद्यापीठ शास्त्रज्ञ प्रत्यक्ष गावात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केेले. संपूर्ण मराठवाड्याकरिता विद्यापीठ शास्‍त्रज्ञांची २२ पथके तयार करण्यात आली होती, यात ८० पेक्षा जास्‍त शास्त्रज्ञांचा सहभाग होता. दिनांक १ सप्टेंबर रोजी साधारणता ६० पेक्षा जास्त गावांमध्ये शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करून शेतकरी बांधवांच्‍या शेती विषयी तांत्रिक समस्याचे समाधान करण्यात आले. संपूर्ण दिवस विद्यापीठ शास्त्रज्ञ कृषि विभागाच्‍या सहकार्यांने हे अभियान राबविण्यात आले. साधारण दोन हजार पेक्षा जास्‍त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. 

उपक्रमांतर्गत दिनांक १ सप्‍टेबर रोजी मानवत तालुक्‍यातील मौजे भोसा शेतकरी मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते, मेळाव्‍याच्‍या अध्‍यक्षस्‍थानी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि हे होते तर सरपंच श्री सुभाषराव जाधव, विस्‍तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, पाणी व्‍यवस्‍थापन संशोधन योजनेचे प्रमुख डॉ हरीश आवारी, कृषि हवामान तज्ञ डॉ कैलास डाखोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, कोणत्‍याही देशाची सुरक्षा ही अन्‍न सुरक्षेवरच अवलंबुन असुन देशातील अन्‍न सुरक्षा ही शेतकरी बांधवाच्‍या हाती आहे. त्‍यामुळे देशातील विकासाचा केंद्रबिंदु हा शेतकरीच असला पाहिजे. भारतीय समाजाची खरी संस्‍कृती ही खेडयातच दिसुन येते, देशातील खेडी समृध्‍द झाली पाहिजेत. ज्ञानामुळेच मानवाची प्रगती झाली, जास्‍तीत जास्‍त ज्ञान अवगत केले पाहिजे. शेतकरी बांधवांनी मुलांच्‍या जास्‍तीत जास्‍त शिक्षण देण्‍याकरिता आग्रही असले पाहिजे. प्रयोगशील शेती करीता कृषि तंत्रज्ञान अवगत असणे गरजेचे असुन परभणी कृषी विद्यापीठ गांवातील निवडक युवकांना विविध कृषि विषयाचे प्रशिक्षण देईल, हेच प्रशिक्षीत युवक विद्यापीठ दुतबनुन गांवातील इतर शेतक-यांपर्यंत तंत्रज्ञान पोहचविण्‍यास मदत करितील. माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी उपक्रम हा विद्यापीठ शास्‍त्रज्ञ आणि शेतकरी बांधव यांच्‍यातील नाते दृढ करण्‍याची संधी असल्‍याचे ते म्‍हणाले.

कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम यांनी मका पिकांवरील लष्‍करी अळी व्‍यवस्‍थापनाबाबत माहिती दिली. प्रास्‍ताविकात डॉ देवराव देवसरकर म्‍हणाले की, विद्यापीठ विकसित तुर, सोयाबीन, ज्‍वार, हरभरा आदी पिकांच्‍या अनेक वाण अत्‍यंत उपयुक्‍त आहेत. शेतीत आर्थिक स्‍थैर्यकरिता शेतकरी बांधवानी शेती पुरक धंद्याची जोड देणे आवश्‍यक असल्याचे म्हणाले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ हरिश आवारी यांनी केले तर आभार डॉ गजानन गडदे यांनी मानले. कार्यक्रमात शेतकरी बाबुराव जाधव, विश्‍वनाथ जाधव, अंशीराम जाधव आदींनी रबी पिकांचे वाण, पिकांवरील किड व खत व्‍यवस्‍थापन यावर प्रश्‍न विचारले, त्‍यास विद्यापीठ शास्‍त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते विद्यापीठ शास्‍त्रज्ञ लिखित विविध पुस्तिका गावातील ग्रंथालयास भेट दिली. गावातील जिल्‍हा परिषद विद्यालयास भेट देऊन शालेय विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला तर शेतकरी बांधव्‍याच्‍या सोयाबीन प्रक्षेत्रास भेट देऊन पाहणी केली. मेळाव्‍यास मौजे भोसा येथील शेतकरी बांधव मोठया संख्‍येने उपस्थित होते.




Monday, August 29, 2022

बौध्‍दीक संपदा अधिकार क्षेत्रात विद्यार्थ्‍यांना करिअरच्‍या अनेक संधी ....... डॉ भारत सुर्यवंशी

वनामकृविच्‍या वतीने बौध्दीक संपदा अधिकार आणि पेटेंट या विषयावर एक दिवसीय आभासी माध्यमाद्वारे कार्यशाळा संपन्न 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प आणि नागपुर येथील राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ ऑगस्ट रोजी बौध्‍दीक संपदा अधिकार आणि पेटेंट यावर एक दिवसीय कार्यशाळेचे आभासी माध्‍यमातुन आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्‍द्र मणी हे होते तर कार्यशाळेत प्रमुख वक्ते राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संस्थचे सहाय्यक नियंत्रक डॉ. भारत सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास नाहेप प्रकल्प मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे, कार्यक्रम समन्‍वयक डॉ गोदावरी पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मार्गदर्शनात डॉ. भारत सुर्यवंशी यांनी बौध्दीक संपदा अधिकार क्षेत्रात कृषिच्‍या विद्यार्थ्‍यांना करिअरच्‍या अनेक संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. विद्यार्थ्‍यांनी बौध्‍दीक संपदा अधिकार आणि पेटेंट विषयी अनेक अभ्‍यासक्रम आणि प्रशिक्षण आयोजित करण्‍यात येते. विद्यार्थ्‍यांनी याचे ज्ञान अवगत करावे. कोणत्याही उत्पादन विकास कंपनी, रुग्णालये, संशोधन लॅब, स्टार्ट-अपमध्ये आपण काम करू शकता किंवा तुमची स्वतःची बौध्‍दीक संपदा कंपनी सुरू करू शकता. वेगवेगळ्या उद्योगांमध्ये बौध्‍दीक संपदा एजंट म्हणून नोकरी करून शकता. कृषि क्षेत्रातील अनेक संशोधनात्‍मक बाबींचे बौध्‍दीक संपदा अधिकार प्राप्‍त करू शकतो. यावेळी त्‍यांनी बौध्दीक संपदा व अधिकार यांचा कृषी क्षेत्रातील वापर या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

अध्‍यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि म्‍हणाले की, कृषी क्षेत्रात वेगवेगळया विषयांवर संशोधन केले जाते. त्या संशोधनाला पेंटेट मध्ये रुपांतरीत करणे आवश्यक आहे. त्याचा फायदा शिक्षण, संशोधन व समाजातील सर्वस्तरातील घटकांना घेता येवु शकतो. यांचा फायदा विद्यापीठाचे मानांकन उंचविण्यासाठी होतो.

कार्यशाळेचे आयोजन शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्‍यात आले होते. प्रकल्प मुख्‍य अन्‍वेषक डॉ. गोपाळ शिंदे यांनी नाहेप प्रकल्पाबद्दल माहिती दिली तर कार्यक्रम समन्वयक डॉ. गोदावरी पवार यांनी कार्यक्रमाची पार्श्वभुमी सांगितली. प्रमुख वक्त्यांचा परिचय डॉ. मेघा जगताप यांनी करुन दिला. सुत्रसंचालन इंजी. अपुर्वा वाईकर यांनी केले तर आभार डॉ. हेमंत रोकडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  इंजी. रवीकुमार कल्लोजी, इंजी. श्रध्दा मुळे, डॉ. अनिकेत वाईकर, फारुखी अब्दुल बारी, डॉ. शिवराज शिंदे, इंजी. संजीवनी कानवटे, डॉ. श्वेता सोळंके, इंजी. शिवानंद शिवपुजे, इंजी पौर्णिमा राठोड,  श्री. रामदास शिंपले, श्री. गंगाधर जाधव, श्री. मारोती रनेर, श्री. जगदीश माने आदीं सहकार्य केले. कार्यशाळेत कृषि संशोधक, प्राध्‍यापक, पदवी व पदव्युत्तर ‍विद्यार्थी आदी सुमारे ३५० हून अधिक प्रशिक्षणार्थीनी नोंदणी केली.

Sunday, August 28, 2022

युध्‍द तंत्रज्ञानात भारताची आत्‍मनिर्भरतेच्‍या दिशेने वाटचाल ....... डीआरडीओचे माजी शास्‍त्रज्ञ मा श्री. काशिनाथ देवधर

परभणी अस्ट्रोनोमिकल सोसायटी व नाहेप प्रकल्‍प यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित व्‍याख्‍यान कार्यक्रमात प्रतिपादन

नौदल, भुदल आणि वायू दलाचे स्वदेशी तंत्रज्ञान निर्मिती करण्यात भारत अग्रेसर असुन याक्षेत्रात भारत आत्‍मनिर्भरतेच्‍या दिशेने वाटचाल करित आहे. युध्‍द तंत्रज्ञानात भारत समर्थ व सशक्त सक्षम आहे, हा संदेश जगात पोहोचत आहे, असे प्रतिपादन डीआरडीओचे माजी शास्त्रज्ञ मा श्री. काशिनाथ देवधर यांनी केले. परभणी अस्ट्रोनोमिकल सोसायटी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील नाहेप प्रकल्‍प यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २८ ऑगस्‍ट रोजी डीआरडीओचे माजी शास्त्रज्ञ मा श्री काशिनाथ देवधर यांच्‍या व्‍याख्‍यानाचे आयोजन करण्‍यात आले होते, यावेळी मार्गदर्शनात ते बोलत होते.

आभासी माध्‍यमातुन कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांची उपस्थिती होती तर व्‍यासपीठावर कुलसचिव डॉ धिरजकुमार कदमपुणे येथील सांस्‍कृतिक वार्तापत्राच्‍या व्‍यवस्‍थापिका श्रीमती सुनिता पेंढारकर, परभणी अॅस्‍ट्रोनॉमीकल सोसायटीचे अध्‍यक्ष डॉ रामेश्‍वर नाईकनाहेप प्रकल्‍प मुख्‍य अन्‍वेषक डॉ गोपाल शिंदे, सोसायटीचे उपाध्यक्ष पी आर पाटील, चिव सुधीर सोनूनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

मा श्री. काशिनाथ देवधर पुढे म्हणाले, जे खगोलीय ज्ञान जगाला अशात अवगत झाले, ते ज्ञान भारतात पुर्वजांना अनेक वर्षापासुनच मांडले आहे. भारताला भास्‍कराचार्य, आर्यभट सारख्‍या शास्‍त्रज्ञांची पार्श्‍वभुमी आहे. देशाला शस्‍त्र अस्‍त्र आयात करावी लागत होती, आज देश स्‍वयंपुर्णते वाटचाल करित आहे. देशाच्या संरक्षणासाठी शस्त्रास्त्र, अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र असलेला देश ताकदवान समजला जातो. ज्याकडे अशी ताकद असते, त्याच्या मागे जग उभे राहते. तत्‍वज्ञानाला शक्‍तीची जोड पाहिजे, तरच संपुर्ण जग तुमचा आवाज जग ऐकेल. जागतिक दर्जाची क्षेपणास्त्र भारताने विकसित केली. माननीय एपीजी अब्‍दुल कलाम यांच्‍या नेतृत्‍वाखाली देशाने स्‍वरक्षण क्षेत्रात मोठी प्रगती केली. पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर, आकाश हे जमिनीवरुन हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. नाग हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. अग्नी क्षेपणास्त्राद्वारे एका खंडातून दुसऱ्या खंडात मारा करता येतो. आज अग्नी-६ आपण विकसित करतो आहोत. ब्रह्योस हे क्षपणास्त्र भारताने रशियाच्या मदतीने विकसित केले. शत्रूपक्षाला मार्गदर्शन करणाऱ्या केंद्रावर मारा करून ते उडवून टाकण्याची ताकद रुद्रममध्ये आहे. पोखरणला अणू स्फोट करून माजी पंतप्रधान स्‍व. अटलबिहारी वाजपेयी यांनी जय जवान, जय किसन याबरोबरच जय विज्ञानचा नारा दिला.

कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि यांनी आभासी माध्‍यमातुन उपस्थितांशी संवाद साधला तर कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम यांनी विद्यापीठाच्‍या कार्याची माहिती दिली. मा. श्री. देवधर यांनी ध्वनी चित्रफिताद्वारे भारताच्या संरक्षण सिद्धतेविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री दिपक शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रसाद वाघमारे यांनी केले आभार डॉ कैलास डाखोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्‍वीतेकरिता डॉ रणजित लाड, श्री ओम तलरेजा, प्रा नितीन लाहोट, अशोक लाड, प्रसन्‍न भावसार, दिपक शिंदे, डॉ अनंत लाड, डॉ रवि शिंदे, डॉ विजयकिरण नरवाडे, वेदप्रकाश आर्य आदीसह नाहेप प्रकल्‍प आणि पास संस्‍थेच्‍या सदस्‍यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शहरातील शालेय विद्यार्थी मोठया संख्‍येने उपस्थित होते.


Wednesday, August 24, 2022

वनामकृवित बौध्दीक संपदा अधिकार आणि पेटेंट यावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेेेचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प व नागपूर येथील राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संस्था, मालमत्ता व्यवस्थापन (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ ऑगस्ट रोजी बौध्दीक संपदा अधिकार आणि पेटेंट” यावर एक दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्‍यात आले आहे. कार्यशाळेच्‍या उदघाटन कार्यक्रमाच्‍या अध्यक्षस्‍थानी कुलगुय मा डॉ. इन्‍द्र मणि राहणार आहे. राजीव गांधी राष्ट्रीय बौद्धिक संस्थेतील  पेटंटस आणि डिझाईन विभागाचे सहाय्यक नियंत्रक डॉ. भारत एन. सुर्यवंशी हे प्रमुख वक्ता म्हणुन मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेत कृषि विद्यापीठातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक आदी सहभाग घेवु शकतात. अधिक माहितीसाठी https://nahep.vnmkv.org.in या संकेतस्थळावर भेट द्यावी. नोंदणीकृत सहभागी यांना ई-प्रमाणपत्र कार्यक्रमा दरम्यान दिली जाईल. सदरील कार्यक्रम निशुल्क असल्यामुळे प्रशिक्षणार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचे आवाहन प्रमुख अन्वेषक डॉ. गोपाळ शिंदे व कार्यक्रम समन्‍वयक डॉ. गोदावरी पवार यांनी केले.

Link for registration

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdpVxZJEdTbwSF8KmUJ5FLZTiWlwynzh5wvj4_tCP6f92NhmA/formResponse?pli=1