परभणी अस्ट्रोनोमिकल सोसायटी व नाहेप प्रकल्प यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित व्याख्यान कार्यक्रमात प्रतिपादन
नौदल, भुदल आणि वायू
दलाचे स्वदेशी तंत्रज्ञान निर्मिती करण्यात भारत अग्रेसर असुन याक्षेत्रात भारत आत्मनिर्भरतेच्या
दिशेने वाटचाल करित आहे. युध्द तंत्रज्ञानात भारत समर्थ व सशक्त सक्षम आहे, हा संदेश जगात पोहोचत आहे, असे प्रतिपादन डीआरडीओचे
माजी शास्त्रज्ञ मा श्री. काशिनाथ देवधर यांनी केले. परभणी अस्ट्रोनोमिकल सोसायटी आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि
विद्यापीठातील नाहेप प्रकल्प
यांचे संयुक्त विद्यमाने दिनांक २८ ऑगस्ट रोजी डीआरडीओचे माजी शास्त्रज्ञ मा श्री काशिनाथ देवधर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी मार्गदर्शनात
ते बोलत होते.
आभासी माध्यमातुन कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांची उपस्थिती होती तर व्यासपीठावर कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम, पुणे येथील सांस्कृतिक वार्तापत्राच्या व्यवस्थापिका श्रीमती सुनिता पेंढारकर, परभणी अॅस्ट्रोनॉमीकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक, नाहेप प्रकल्प मुख्य अन्वेषक डॉ गोपाल शिंदे, सोसायटीचे उपाध्यक्ष पी आर पाटील, सचिव सुधीर सोनूनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
मा श्री. काशिनाथ देवधर पुढे म्हणाले, जे खगोलीय ज्ञान जगाला अशात अवगत झाले, ते ज्ञान भारतात पुर्वजांना अनेक वर्षापासुनच मांडले आहे. भारताला भास्कराचार्य, आर्यभट सारख्या शास्त्रज्ञांची पार्श्वभुमी आहे. देशाला शस्त्र अस्त्र आयात करावी लागत होती, आज देश स्वयंपुर्णते वाटचाल करित आहे. देशाच्या संरक्षणासाठी शस्त्रास्त्र, अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र असलेला देश ताकदवान समजला जातो. ज्याकडे अशी ताकद असते, त्याच्या मागे जग उभे राहते. तत्वज्ञानाला शक्तीची जोड पाहिजे, तरच संपुर्ण जग तुमचा आवाज जग ऐकेल. जागतिक दर्जाची क्षेपणास्त्र भारताने विकसित केली. माननीय एपीजी अब्दुल कलाम यांच्या नेतृत्वाखाली देशाने स्वरक्षण क्षेत्रात मोठी प्रगती केली. पृथ्वी हे जमिनीवरून जमिनीवर, आकाश हे जमिनीवरुन हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे. नाग हे रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे. अग्नी क्षेपणास्त्राद्वारे एका खंडातून दुसऱ्या खंडात मारा करता येतो. आज अग्नी-६ आपण विकसित करतो आहोत. ब्रह्योस हे क्षपणास्त्र भारताने रशियाच्या मदतीने विकसित केले. शत्रूपक्षाला मार्गदर्शन करणाऱ्या केंद्रावर मारा करून ते उडवून टाकण्याची ताकद रुद्रममध्ये आहे. पोखरणला अणू स्फोट करून माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी जय जवान, जय किसन याबरोबरच जय विज्ञानचा नारा दिला.
कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी आभासी माध्यमातुन उपस्थितांशी संवाद साधला तर कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम यांनी विद्यापीठाच्या कार्याची माहिती दिली. मा. श्री. देवधर यांनी ध्वनी चित्रफिताद्वारे भारताच्या संरक्षण सिद्धतेविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्तविक श्री दिपक शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रसाद वाघमारे यांनी केले आभार डॉ कैलास डाखोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता डॉ रणजित लाड, श्री ओम तलरेजा, प्रा नितीन लाहोट, अशोक लाड, प्रसन्न भावसार, दिपक शिंदे, डॉ अनंत लाड, डॉ रवि शिंदे, डॉ विजयकिरण नरवाडे, वेदप्रकाश आर्य आदीसह नाहेप प्रकल्प आणि पास संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास शहरातील शालेय विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.