Wednesday, August 5, 2026

'स्वच्छता पंधरवडा' आणि 'नशामुक्ती अभियान' निमित्त लिहाखेडी कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; स्वच्छता, निर्व्यसनता व वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

 कृषि शिक्षणासोबत आदर्श गुणांची जोपासना करा : शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे

कृषि शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आदर्श गुण, सामाजिक बांधिलकी आणि मूल्याधिष्ठित जीवनाची जोपासना करावी. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेची सवय अंगीकारून पूर्णतः निर्व्यसनी जीवन जगावे, तसेच किमान पाच झाडे लावून त्यांचे कुटुंबातील सदस्यांप्रमाणे संगोपन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. ते दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील लिहाखेडी कृषि महाविद्यालयात 'स्वच्छता पंधरवडा' आणि 'नशामुक्ती अभियान' अंतर्गत आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

पुढे ते म्हणाले की, आज देशात आणि राज्यात व्यसनाधीनतेमुळे अनेकांची जीवने उद्ध्वस्त होत असल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. व्यसन ही समाजाला लागलेली घातक कीड असून तिचे समूळ उच्चाटन करणे आवश्यक आहे. नशा ही शेवटी व्यक्ती, कुटुंब आणि समाजाचे नुकसान करते. त्यामुळे विद्यार्थी जीवनात कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याबरोबरच मित्रपरिवारातील एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेली असेल, तर तिला त्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

याबरोबरच ते म्हणाले की, विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन आणि विस्तार ही तीन प्रमुख कार्ये असली तरी आदर्श कृषि पदवीधर घडविणे हेच विद्यापीठाचे अंतिम ध्येय आहे. विद्यार्थ्यांमध्ये चांगला माणूस, जबाबदार नागरिक आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित कृषि व्यावसायिक घडविण्यासाठी विद्यापीठातील शिक्षक व अधिकारी सातत्याने प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक उत्तरदायित्वही जोपासावे, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करत युवा पिढीने व्यसनमुक्त, निरोगी आणि सुदृढ जीवनशैली स्वीकारून समाजासाठी आदर्श निर्माण करावा, असे आवाहन केले.

विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे यांनी आपल्या मनोगतात छत्रपती संभाजीनगर येथे विद्यापीठाचे कृषि महाविद्यालय स्थापन करण्यामागील विद्यापीठ व शासनाची भूमिका स्पष्ट केली. या प्रक्रियेत प्राचार्य डॉ. सूर्यकांत पवार यांनी प्रशासकीय स्तरावर मोलाचे सहकार्य केल्यामुळेच महाविद्यालयाच्या उभारणीचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सूर्यकांत पवार यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. सचिन मोरे, डॉ. दीप्ती पाटगावकर, डॉ. कलालबंडी, डॉ. दत्ता मुळे यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष बागडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष ढगे यांनी केले.

कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे, डॉ. सुरेखा कदम, डॉ. संतोष ढगे तसेच कृषि विज्ञान केंद्रातील डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ. संजुला भावर, डॉ. बसवराज पिसुरे यांच्यासह उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.





वनामकृविच्या छत्रपती संभाजीनगर येथील लिहाखेडी कृषी महाविद्यालयाच्या स्वच्छता पंधरवडा उपक्रमात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; व्यसनमुक्त जीवनाचा दिला संदेश

 


विद्यार्थी जीवनात प्रत्येकाने दोन महत्त्वाच्या बाबींना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. पहिली म्हणजे स्वतःच्या आरोग्याची आणि परिसराच्या स्वच्छतेची जबाबदारी, तर दुसरी म्हणजे पूर्णतः निर्व्यसनी जीवनशैलीचा स्वीकार. स्वच्छ, निरोगी आणि व्यसनमुक्त विद्यार्थीच भविष्यात सुदृढ, सुसंस्कृत आणि प्रगत समाज घडविण्यात प्रभावी योगदान देऊ शकतो, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.ते

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील लिहाखेडी कृषी महाविद्यालयाद्वारे आयोजित स्वच्छता पंधरवडा उपक्रमानिमित्त राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प (NARP) येथे दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजित कार्यक्रमादरम्यान ते कृषी पदवी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

पुढे त्यांनी सांगितले की, स्वच्छता ही केवळ अभियान नसून जीवनशैली आहे, तर निर्व्यसनता ही व्यक्ती, कुटुंब आणि समाजाच्या प्रगतीची भक्कम पायाभरणी आहे. युवकांनी व्यसनांपासून दूर राहून सकारात्मक विचार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची मूल्ये जोपासली, तर विकसित भारताच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान राहील. विद्यार्थ्यांनी ज्ञानासोबतच सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून आदर्श नागरिक बनण्याचा संकल्प करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी माननीय कुलगुरूंनी पंजाब नॅशनल बँक आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात येत असलेल्या शेतकरी प्रशिक्षण केंद्राच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. हे प्रशिक्षण केंद्र मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी कौशल्याधारित प्रशिक्षण, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, मूल्यवर्धन, कृषी उद्योजकता, प्रकल्प अहवाल तयार करणे, बँक कर्ज प्रस्ताव, तसेच कृषी उद्योग उभारणीसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून देणारे महत्त्वपूर्ण केंद्र ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यानंतर माननीय कुलगुरूंनी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध संशोधन उपक्रमांचा आढावा घेतला. बीजोत्पादन कार्यक्रम, जैविक कीडनियंत्रणासाठी विकसित करण्यात आलेली जैविक औषधे, जैवखते, ट्रायकोकार्ड निर्मिती, तसेच शाश्वत शेतीसाठी सुरू असलेल्या विविध संशोधन व प्रात्यक्षिक उपक्रमांची माहिती त्यांनी जाणून घेतली. संशोधनातून विकसित होणारे तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी संशोधकांनी समन्वयाने कार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावेळी कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. दीप्ती पाटगावकर, प्रा. दत्तात्रय मुळे, डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे, डॉ. आशिष बागडे, डॉ. सुरेखा कदम, डॉ. संतोष ढगे, डॉ. रामेश्वर ठोंबरे तसेच अधिकारी, वैज्ञानिक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





विकसित भारत २०४७ : ‘नशामुक्त युवा’ जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

 वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथे विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथे दिनांक ५ ऑगस्ट २०२६ रोजी  विकसित भारत २०४७ – नशामुक्त युवा’ अभियानांतर्गत नशामुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, आखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (कृषिरत महिला), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता तथा केंद्र समन्वयिका डॉ. नीता गायकवाड या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रभा अंतवाल, तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या बी.के. सीमा बहेनजी आणि बी.के. नेहा बहेनजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. नीता गायकवाड यांनी सकारात्मक विचारसरणी, आत्मसंयम आणि निरोगी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. ध्यानधारणा ही मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढविण्याचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी सांगितले. नशेच्या आहारी गेलेली व्यक्ती नकारात्मक प्रवृत्तींकडे आकर्षित होत असल्याने प्रत्येकाने योग्य आहार-विहार, भारतीय संस्कृतीची जपणूक आणि जीवनमूल्यांचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. मोबाईल आणि डिजिटल साधनांचा अतिरेकी वापर टाळून बौद्धिक स्वातंत्र्य जपण्याचाही त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला.

मुख्य मार्गदर्शक बी.के. सीमा बहेनजी यांनी युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून निरोगी, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेच्या पूर्ततेसाठी व्यसनमुक्त युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही वस्तूचा किंवा सवयीचा अतिरेक हा व्यसनाचे रूप धारण करतो आणि त्याचे गंभीर परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतात, असे त्यांनी स्पष्ट केले. आजच्या काळात तंबाखूजन्य पदार्थांबरोबरच मोबाईल, संगणक आणि इतर डिजिटल गॅजेट्सच्या अतिवापराचे व्यसनही चिंताजनक स्वरूप धारण करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मित्रपरिवाराचा प्रभाव, ताणतणाव आणि चुकीच्या सवयी यांमुळे युवक व्यसनाच्या आहारी जात असल्याचे सांगून त्यांनी कुटुंब, शिक्षक आणि समाजाने संयुक्तपणे जनजागृतीचे कार्य करण्याची आवश्यकता व्यक्त केली. ध्यानधारणेद्वारे व्यक्ती स्वतःची क्षमता ओळखून आत्मनियंत्रण विकसित करू शकते, असे सांगत त्यांनी उपस्थितांकडून ध्यानधारणेचे प्रात्यक्षिकही करून घेतले.

प्रास्ताविकात डॉ. प्रभा अंतवाल यांनी तंबाखू, मद्य किंवा अमली पदार्थांप्रमाणेच मोबाईल, लॅपटॉप व इतर डिजिटल साधनांच्या अतिवापराचे व्यसनही समाजासमोर मोठे आव्हान बनत असल्याचे सांगितले. अशा व्यसनांवर मात करण्यासाठी सकारात्मक विचार, आत्मनियंत्रण आणि ध्यानधारणेचा अवलंब आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांना नशामुक्त भारत’ घडविण्याची सामूहिक शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विभागप्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन श्री. कैलास जोंधळे (यंग प्रोफेशनल) यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सुनीलदत्त जक्कावाड, श्री. शेख सादेक, श्री. चंद्रप्रकाश लहाडे, श्री. विकास शिक्रे आणि सौ. सादिया यासमीन (यंग प्रोफेशनल) यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.







Tuesday, August 4, 2026

वनामकृविच्या परभणी येथील कृषी महाविद्यालयातील ६० विद्यार्थ्यांची नेटाफिम इरिगेशन प्रा. लि. मध्ये औद्योगिक प्रशिक्षणासाठी निवड

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषी महाविद्यालयातील कृषी अभियांत्रिकी विभागामार्फत सातव्या सत्रात शिक्षण घेत असलेल्या कृषी पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) व औद्योगिक संलग्नता–२०२६ कार्यक्रमांतर्गत नेटाफिम इरिगेशन प्रायव्हेट लिमिटेड या नामांकित कंपनीमध्ये औद्योगिक प्रशिक्षण (Industrial Training) देण्यासाठी निवड कार्यक्रमाचे दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणासाठी कृषी महाविद्यालयातील ६० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य तसेच RAWE समन्वयक डॉ. राजेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

यावेळी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षणाचे महत्त्व, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची आवश्यकता आणि उद्योगक्षेत्रातील उपलब्ध करिअर संधी याविषयी मार्गदर्शन केले. तसेच डॉ. राजेश कदम यांनी प्रशिक्षणादरम्यान शिस्त, गुणवत्ता, वेळेचे नियोजन आणि कौशल्य विकासाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी नेटाफिम इरिगेशन प्रा. लि. चे व्यवस्थापक श्री. अमित वाघमारे आणि प्रशिक्षण अधिकारी डॉ. सागर खोडके यांच्या उपस्थितीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यात आली.

सदर औद्योगिक प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड AIA प्रशिक्षण प्रमुख तथा कृषी अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. आर. जी. भाग्यवंत यांच्या पुढाकाराने करण्यात आली.

यावेळी श्री. अमित वाघमारे आणि डॉ. सागर खोडके यांनी कंपनीची कार्यपद्धती, ठिबक सिंचन तंत्रज्ञानातील आधुनिक घडामोडी, प्रशिक्षणाची रचना तसेच उद्योगक्षेत्रातील रोजगाराच्या संधी याविषयी विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. आर. जी. भाग्यवंत यांनी प्रास्ताविकातून औद्योगिक प्रशिक्षणाचा उद्देश, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या व्यावहारिक अनुभवाचे महत्त्व आणि उद्योग-शैक्षणिक समन्वयाची आवश्यकता विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मकरंद भोगावकर यांनी केले.

या औद्योगिक प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवड झालेल्या सर्व ६० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून, या प्रशिक्षणामुळे त्यांना आधुनिक सिंचन तंत्रज्ञान, उद्योग व्यवस्थापन आणि प्रत्यक्ष कार्यानुभवाची मौल्यवान संधी उपलब्ध होणार आहे.





Monday, August 3, 2026

क्रांतीसिंह नाना पाटील यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात अभिवादन

 

महाराष्ट्रातील स्वातंत्र्य चळवळीतील थोर स्वातंत्र्यसैनिक, शेतकरी नेते आणि प्रतिसरकार चळवळीचे जनक क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे सोमवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. त्यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच कुलसचिव श्री. पुरभा काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जीवनकार्याचा अल्प परिचय करून दिला. त्यांनी सांगितले की, क्रांतीसिंह नाना पाटील यांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध निर्भीडपणे लढा देत प्रतिसरकार या ऐतिहासिक लोकशाही व्यवस्थेची स्थापना केली. सामाजिक न्याय, शेतकरी कल्याण, स्वातंत्र्य, समता आणि जनसामान्यांच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे कार्य आजही राष्ट्रप्रेम, लोकशाही मूल्ये आणि समाजसेवेची प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले व त्यांच्या राष्ट्रसेवा, त्याग आणि स्वातंत्र्यलढ्यातील अमूल्य योगदानाचे स्मरण केले. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मका उत्कृष्टता केंद्र स्थापनेबाबत महत्त्वपूर्ण बैठक

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प (National Agricultural Research Project – NARP) येथे आंतरराष्ट्रीय मका व गहू सुधारणा केंद्र (International Maize and Wheat Improvement Center – CIMMYT) यांच्या सहकार्याने "मका उत्कृष्टता केंद्र (Centre of Excellence for Maize)" स्थापन करण्याबाबत महत्त्वपूर्ण बैठक सोमवार, दिनांक ३ ऑगस्ट २०२६ रोजी व्हिलेज अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (Village and Social Transformation Foundation – VSTF) च्या मुंबई येथील कार्यालयात  संपन्न झाली.

या बैठकीचे आयोजन व्हिलेज अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (Village and Social Transformation Foundation – VSTF) तसेच इंडो-मका आणि भरडधान्य विकास संघटना (Indo-Maize and Millets Development Association -IMMDA) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय मका व गहू सुधारणा केंद्र (CIMMYT) चे मुख्यालय मेक्सिको येथे असून, ही संस्था CGIAR या जागतिक कृषि संशोधन समूहाचा महत्त्वाचा घटक आहे. जगभरातील मका व गहू पिकांच्या संशोधन, सुधारित वाणांच्या विकास आणि शाश्वत कृषि तंत्रज्ञानाच्या प्रसारामध्ये या संस्थेचे उल्लेखनीय योगदान आहे.

या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे आभासी माध्यमाद्वारे सहभागी झाले. त्यांनी मका संशोधनाला बळकटी देण्यासाठी आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, शाश्वत उत्पादनवाढ, हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती आणि शेतकरी-केंद्रित संशोधनाला प्राधान्य देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. तसेच कृषि विद्यापीठे, आंतरराष्ट्रीय संशोधन संस्था, शासन यंत्रणा आणि इतर भागधारक यांच्या प्रभावी समन्वयातून मका पिकाची उत्पादकता, गुणवत्ता आणि स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी संशोधन, नवतंत्रज्ञान विकास आणि त्याचा प्रभावी प्रसार अधिक वेगाने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रस्तावित मका उत्कृष्टता केंद्राच्या माध्यमातून मराठवाड्यासह राज्यातील मका उत्पादक शेतकऱ्यांना उच्च उत्पादक सुधारित वाण, अत्याधुनिक संशोधन सुविधा, आधुनिक कृषि तंत्रज्ञान, कौशल्य विकास प्रशिक्षण आणि नवोन्मेषी तांत्रिक उपायांचा थेट लाभ मिळून मका उत्पादन अधिक सक्षम व स्पर्धात्मक होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बैठकीस व्हिलेज अँड सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाउंडेशन (VSTF) चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. उमाकांत दांगट, नोडल अधिकारी श्री चंद्रकांत माळी, समन्वयक श्री सुशांत पवार, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. सूर्यकांत पवार, आंतरराष्ट्रीय मका व गहू सुधारणा केंद्र (CIMMYT) यांचे भारतातील कंट्री रिप्रेझेंटेटिव्ह व लीड डॉ. महेश गथाला, CIMMYT चे प्रमुख शास्त्रज्ञ तथा दक्षिण आशिया समन्वयक डॉ. परवेझ झैदी, इंडो-मका आणि भरडधान्य विकास संघटनेचे अध्यक्ष ॲड सूर्यकांत  पाटील, ग्रँट थॉर्न्टनच्या तांत्रिक सेवा प्रदाता (Technical Service provider) श्रीमती शुभ्रा देशपांडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच विविध राष्ट्रीय संशोधन संस्था आणि संबंधित विभागांतील मान्यवर शास्त्रज्ञ व तज्ज्ञ उपस्थित होते.


Sunday, August 2, 2026

वनामकृवित ‘विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत ‘नशामुक्त युवा’ अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद

 व्यसनमुक्त युवकच सक्षम भारताचे भविष्य : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


विकसित भारत संकल्प अभियान’ अंतर्गत नशामुक्त युवा’ या विशेष अभियानाची सुरुवात देशाचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते झाली. या निमित्ताने दिनांक २ ऑगस्ट २०२६ रोजी माननीय पंतप्रधानांनी देशभरातील युवकांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधत नशामुक्तीचे महत्त्व अधोरेखित केले व युवकांना व्यसनमुक्त जीवनाचा संदेश दिला.

या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे आयोजित करण्यात आले. या थेट प्रक्षेपणाचा लाभ विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने घेतला. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) आणि मुख्यालयातील सर्व महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

यावेळी सर्वांनी नशामुक्तीची शपथ घेतली तसेच विद्यापीठाच्या सलग्न आणि मान्यताप्राप्त महाविद्यालयातील ६०१२ विद्यार्थ्यांनी माय भारत (My Bharat) पोर्टलवर नोंदणी करून ‘विकसित भारतासाठी नशामुक्त युवा’ ची प्रतिज्ञा घेवून प्रमाणपत्र प्राप्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे ऑनलाईन उपस्थित होते. मार्गदर्शनात त्यांनी युवकशक्ती ही विकसित भारताच्या निर्मितीची सर्वात मोठी ताकद असल्याचे अधोरेखित केले. व्यसनाधीनता ही केवळ व्यक्तीचे आरोग्यच नव्हे, तर कुटुंब, समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीलाही बाधा आणणारी गंभीर सामाजिक समस्या असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी व्यसनाच्या कोणत्याही प्रकारापासून दूर राहून निरोगी जीवनशैली, सकारात्मक विचार, चारित्र्यसंपन्नता, शिस्त आणि सामाजिक जबाबदारी यांचा स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच शिक्षणासोबतच नैतिक मूल्ये, आत्मसंयम आणि राष्ट्रसेवेची भावना जोपासून व्यसनमुक्त, सुदृढ आणि सक्षम भारताच्या उभारणीत प्रत्येक युवकाने सक्रिय योगदान द्यावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

प्रमुख पाहुणे तथा विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी आपल्या मार्गदर्शनात ‘नशामुक्त भारत’, शिस्त, वक्तशीरपणा आणि जबाबदार नागरिकत्व या विषयांवर सखोल विचार मांडले. युवा पिढीने व्यसनाधीनतेपासून दूर राहून सुदृढ व निरोगी समाजाच्या निर्मितीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या प्रसंगी राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री. सय्यद रहेमान हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या प्रदीर्घ अनुभवातून विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी, सुसंस्कृत जीवनशैली आणि चारित्र्यनिर्मितीचे महत्त्व पटवून दिले. उत्तम संस्कारांचा अंगीकार करून देशाचे आदर्श नागरिक बनावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.

कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी ‘नशामुक्त भारत’ या विषयावर मार्गदर्शन करताना सांगितले की, विकसित आणि सशक्त भारताच्या निर्मितीसाठी तरुणाईचे निरोगी, सुदृढ आणि व्यसनमुक्त राहणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रारंभी विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाची पार्श्वभूमी, उद्दिष्टे तसेच युवकांना व्यसनाधीनतेपासून दूर ठेवण्यासाठी अशा जनजागृतीपर अभियानांचे महत्त्व स्पष्ट केले. विद्यार्थ्यांनी वाईट सवयींचे नव्हे, तर चांगल्या विचारांचे, ज्ञानाचे आणि समाजोपयोगी कार्याचे व्यसन जडवावे, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी दिला.

कार्यक्रमास अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, उद्यानविद्या महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

ऑनलाईन थेट प्रक्षेपण डॉ. संतोष फुलारी यांनी यशस्वीरीत्या हाताळले. सूत्रसंचालन तसेच उपस्थितांचे आभार प्रदर्शन डॉ. संघर्ष शृंगारे यांनी मानले.

या अभियानाला विद्यापीठातील विविध महाविद्यालयांतील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कृषी महाविद्यालय, उद्यानविद्या महाविद्यालय, अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय तसेच सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे, डॉ. प्रविण घाडगे, डॉ. शंकर पुरी, डॉ. बी. एम. कलालबंडी, डॉ. धीरज पाथ्रीकर आणि डॉ. खंडागळे, तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालय व कृषी महाविद्यालय, परभणी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.