वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथे विद्यार्थ्यांनी घेतली नशामुक्तीची शपथ
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी येथे दिनांक
५ ऑगस्ट २०२६ रोजी ‘विकसित
भारत २०४७ – नशामुक्त युवा’ अभियानांतर्गत नशामुक्ती जनजागृती कार्यक्रम उत्साहपूर्ण
वातावरणात संपन्न झाला. महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, आखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (कृषिरत
महिला), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय
विश्व विद्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात
विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग
नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता तथा केंद्र समन्वयिका
डॉ. नीता गायकवाड या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रभा अंतवाल, तसेच प्रजापिता ब्रह्माकुमारी
संस्थेच्या बी.के. सीमा बहेनजी आणि बी.के. नेहा बहेनजी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय भाषणात डॉ. नीता गायकवाड यांनी सकारात्मक विचारसरणी, आत्मसंयम आणि निरोगी
जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले. ध्यानधारणा ही मानसिक स्थैर्य, एकाग्रता आणि आत्मविश्वास वाढविण्याचे प्रभावी साधन असल्याचे त्यांनी सांगितले.
नशेच्या आहारी गेलेली व्यक्ती नकारात्मक प्रवृत्तींकडे आकर्षित होत असल्याने प्रत्येकाने
योग्य आहार-विहार, भारतीय संस्कृतीची जपणूक आणि जीवनमूल्यांचा
स्वीकार करावा, असे आवाहन त्यांनी केले. मोबाईल आणि डिजिटल साधनांचा
अतिरेकी वापर टाळून बौद्धिक स्वातंत्र्य जपण्याचाही त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश
दिला.
मुख्य मार्गदर्शक बी.के. सीमा बहेनजी यांनी युवकांनी व्यसनमुक्त जीवनशैलीचा
स्वीकार करून निरोगी, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. विकसित भारत २०४७ च्या
संकल्पनेच्या पूर्ततेसाठी व्यसनमुक्त युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी
सांगितले. कोणत्याही वस्तूचा किंवा सवयीचा अतिरेक हा व्यसनाचे रूप धारण करतो आणि त्याचे
गंभीर परिणाम शारीरिक व मानसिक आरोग्यावर होतात, असे त्यांनी
स्पष्ट केले. आजच्या काळात तंबाखूजन्य पदार्थांबरोबरच मोबाईल, संगणक आणि इतर डिजिटल गॅजेट्सच्या अतिवापराचे व्यसनही चिंताजनक स्वरूप धारण
करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मित्रपरिवाराचा प्रभाव, ताणतणाव आणि चुकीच्या सवयी यांमुळे युवक व्यसनाच्या आहारी जात
असल्याचे सांगून त्यांनी कुटुंब, शिक्षक आणि समाजाने संयुक्तपणे
जनजागृतीचे कार्य करण्याची आवश्यकता व्यक्त केली. ध्यानधारणेद्वारे व्यक्ती स्वतःची
क्षमता ओळखून आत्मनियंत्रण विकसित करू शकते, असे सांगत त्यांनी
उपस्थितांकडून ध्यानधारणेचे प्रात्यक्षिकही करून घेतले.
प्रास्ताविकात डॉ. प्रभा अंतवाल यांनी तंबाखू, मद्य किंवा अमली पदार्थांप्रमाणेच
मोबाईल, लॅपटॉप व इतर डिजिटल साधनांच्या अतिवापराचे व्यसनही समाजासमोर
मोठे आव्हान बनत असल्याचे सांगितले. अशा व्यसनांवर मात करण्यासाठी सकारात्मक विचार,
आत्मनियंत्रण आणि ध्यानधारणेचा अवलंब आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी उपस्थित विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी
व कर्मचाऱ्यांना ‘नशामुक्त भारत’ घडविण्याची सामूहिक शपथ देण्यात
आली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी विभागप्रमुख डॉ. शंकर पुरी यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापक,
कर्मचारी, विद्यार्थी व सहकार्य करणाऱ्या सर्वांचे
आभार मानले. सूत्रसंचालन श्री. कैलास जोंधळे (यंग प्रोफेशनल) यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.सुनीलदत्त जक्कावाड, श्री. शेख सादेक, श्री. चंद्रप्रकाश लहाडे, श्री. विकास शिक्रे आणि सौ. सादिया यासमीन (यंग प्रोफेशनल) यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) स्वयंसेवक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
.jpeg)

.jpeg)




.jpeg)