देशी वाणांचे जनुक संवर्धक शेतकरी हे समाजाचे, देशाचे खरे मित्र – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
मराठवाड्यात देशी बीज संवर्धनासाठी व्यापक जनजागृतीची गरज - माजी कृषी आयुक्त
माननीय डॉ. उमाकांत दांगट (से.नि.भा.प्र.से.)
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ,
महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प (विशेष कक्ष) आणि बायफ डेव्हलपमेंट रिसर्च
फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय
"मराठवाडा बीज संवर्धक संवाद व कार्यशाळेचा” उद्घाटन समारंभ
दिनांक ६ ऑगस्ट २०२६ रोजी उत्साहात पार पडले. या कार्यशाळेत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील
७५ हून अधिक बीज संवर्धक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. या कार्यशाळेचे आयोजन ६ व ७ ऑगस्ट
रोजी विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात करण्यात आले. तसेच यानिमित्त मराठवाड्यातील
बीज संवर्धक शेतकऱ्यांच्या विविध जनुकाचे प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन
करण्यात आले. या कार्यशाळेत विविध दहा तांत्रिक सत्राच्या माध्यमातून शेतकरी,
विद्यापीठ शास्त्रज्ञ आणि मंडळाचे तसेच बायफ संस्थेच्या अधिकाऱ्यांमध्ये विचारांची
देवाणघेवाण होणार आहे.
उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि म्हणाले की, देशी वाणांचे जनुक संवर्धन करणारे शेतकरी हे महाराष्ट्राचे, देशाचे आणि समाजाचे खरे मित्र आहेत. वाढत्या मानवी गरजा आणि संसाधनांच्या अतिरेकी
वापरामुळे गेल्या शतकात जैवविविधतेचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झाला आहे. जैवविविधतेचे
संशोधन, संकलन, जतन, संवर्धन आणि प्रसार करणे ही काळाची गरज असून प्रत्येकाने या कार्यात योगदान
द्यावे, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठ परिसरही जैवविविधतेने
समृद्ध असून त्याचे दस्तऐवजीकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या
सहकार्याने विशेष उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. वनस्पती,
पशुधन आणि मत्स्य संपदेतील जनुकीय विविधतेचे जतन करण्यासाठी राष्ट्रीय
स्तरावर होत असलेल्या कार्याचा उल्लेख करत त्यांनी जनुक संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांची
नोंद घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. विद्यापीठाचे लातूर येथील जैवतंत्रज्ञान
महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यापीठ सातत्याने या क्षेत्रात कार्यरत असल्याचेही
त्यांनी नमूद केले.
माजी कृषि आयुक्त तथा स्मार्ट प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय डॉ.
उमाकांत दांगट (से. नि. भा.प्र. से.) यांनी देशी बीज संवर्धन हा अत्यंत महत्त्वाचा
पण दुर्लक्षित विषय असल्याचे सांगितले. निसर्गाने निर्माण केलेली जैवविविधता मानवी
हस्तक्षेपामुळे धोक्यात आली असून "जगा आणि जगू द्या" ही संकल्पना स्वीकारून
जैवविविधतेचे जतन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. मराठवाड्याचा नैसर्गिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक
वारसा समृद्ध असून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे त्यांनी सांगितले.
पूर्वी शेतकरी स्वतः उत्कृष्ट बियाण्यांची निवड व संवर्धन करत असत, ती परंपरा पुन्हा सुरू करून उत्पादन खर्च कमी करत शाश्वत शेतीकडे वाटचाल करण्याचे
आवाहन त्यांनी केले.
संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शेतकरी हेच खरे देशी बीज संवर्धक शास्त्रज्ञ
असल्याचे सांगितले. हवामान बदलामुळे पर्जन्यमानातील अनिश्चितता वाढत असून अशा परिस्थितीत
देशी बियाण्यांचे महत्त्व अधिक वाढले आहे. विद्यापीठाच्या लातूर येथील जैवतंत्रज्ञान
महाविद्यालयामार्फत जनुक संवर्धनाचे कार्य सुरू असून विद्यापीठाच्या २५ अखिल भारतीय
समन्वित संशोधन प्रकल्पांपैकी दहा केंद्रांनी राष्ट्रीय स्तरावर प्रथम क्रमांक मिळविल्याची
माहिती त्यांनी दिली. जैवविविधतेचे संवर्धन हे शाश्वत शेती, पोषण सुरक्षा आणि भावी
पिढ्यांच्या हितासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात महाराष्ट्र जनुक कोष प्रकल्प (विशेष कक्ष) च्या संचालक पूनम पाटे (भा.व.से.) यांनी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाच्या कार्याचा परिचय
करून दिला. जनुक संवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांची ओळख निर्माण करून त्यांना राष्ट्रीय
स्तरावर प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पद्मश्री
राहीबाई पोपरे यांच्या कार्याचा उल्लेख करत देशी बियाणे हीच आपली खरी ओळख आणि भविष्यातील
अन्नसुरक्षेची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे प्रकल्प अधिकारी श्री. रवींद्र वानखडे
(से.नि.भा.व.से.) यांनी मंडळाच्या स्थापनेची पार्श्वभूमी आणि विविध उपक्रमांचा आढावा
घेत कार्यशाळा बीज संवर्धन चळवळीला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त
केला.
बायफचे उपाध्यक्ष डॉ. रविराज जाधव यांनी हरितक्रांतीमुळे अन्नधान्य उत्पादनात
देश स्वयंपूर्ण झाला असला तरी जैवविविधतेच्या संवर्धनाकडे अपेक्षित लक्ष गेले नसल्याची
खंत व्यक्त केली. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या समस्यांवर मात करण्यासाठी बायफतर्फे
राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली.


.jpeg)






