वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी जालना जिल्ह्यातील वनामकृविच्या मोसंबी संशोधन
केंद्र,
बदनापूर येथे दिनांक ५ ऑगष्ट २०२६ रोजी भेट देऊन केंद्रातील विविध
संशोधन उपक्रम, प्रायोगिक क्षेत्रे, रोपवाटिका
तसेच मोसंबी पिकावरील सुरू असलेल्या संशोधन कार्याची पाहणी केली. बदनापूर येथील हे
संशोधन केंद्र विद्यापीठाच्या प्रमुख संशोधन केंद्रांपैकी एक असून त्याची स्थापना
सन २००६ मध्ये करण्यात आली आहे.
यावेळी माननीय कुलगुरूंनी संशोधन केंद्रातील रोपवाटिका, दर्जेदार रोपनिर्मिती, सुधारित मोसंबी वाणांचे
संवर्धन, आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान, तसेच
शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या संशोधन परिणामांच्या प्रभावी प्रसाराबाबत सविस्तर
आढावा घेतला. तसेच त्यांनी संशोधक व शास्त्रज्ञांना मार्गदर्शन करताना मोसंबी
उत्पादनातील गुणवत्ता वाढ, हवामान बदलाशी सुसंगत संशोधन,
रोग व कीड व्यवस्थापन, जलकार्यक्षम
तंत्रज्ञानाचा वापर, उच्च दर्जाची लागवड सामग्री निर्मिती
तसेच शेतकरी-केंद्रित संशोधनाला अधिक गती देण्याच्या सूचना दिल्या. भविष्यात
मोसंबी संशोधन केंद्र हे देशातील एक उत्कृष्ट संशोधन व प्रशिक्षण केंद्र म्हणून
विकसित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी
सकारात्मक भूमिका व्यक्त केली.
भेटीदरम्यान बदनापूर कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ
दीपक पाटील, संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ.
गजेंद्र जगताप, अधिकारी
व कर्मचाऱ्यांनी केंद्रात राबविण्यात येणारे विविध संशोधन प्रकल्प, उपलब्धी आणि आगामी विकास आराखड्याची माहिती माननीय कुलगुरूंना सादर केली.
संशोधन केंद्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विद्यापीठ प्रशासनाकडून सातत्याने
सहकार्य मिळेल, असा विश्वासही माननीय कुलगुरूंनी यावेळी
व्यक्त केला.


