कृषि शिक्षणासोबत आदर्श गुणांची जोपासना करा : शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे
कृषि शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी आदर्श गुण, सामाजिक बांधिलकी आणि
मूल्याधिष्ठित जीवनाची जोपासना करावी. वैयक्तिक व परिसर स्वच्छतेची सवय अंगीकारून पूर्णतः
निर्व्यसनी जीवन जगावे, तसेच किमान पाच झाडे लावून त्यांचे कुटुंबातील
सदस्यांप्रमाणे संगोपन करावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी केले. ते दिनांक ५
ऑगस्ट २०२६ रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील
लिहाखेडी कृषि महाविद्यालयात 'स्वच्छता पंधरवडा' आणि 'नशामुक्ती अभियान' अंतर्गत
आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, आज देशात आणि राज्यात व्यसनाधीनतेमुळे अनेकांची जीवने उद्ध्वस्त होत असल्याच्या
घटना सातत्याने समोर येत आहेत. व्यसन ही समाजाला लागलेली घातक कीड असून तिचे समूळ उच्चाटन
करणे आवश्यक आहे. नशा ही शेवटी व्यक्ती, कुटुंब आणि समाजाचे नुकसान
करते. त्यामुळे विद्यार्थी जीवनात कोणत्याही प्रकारच्या व्यसनापासून दूर राहण्याबरोबरच
मित्रपरिवारातील एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेली असेल, तर
तिला त्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करणे ही प्रत्येकाची सामाजिक
जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
याबरोबरच ते म्हणाले की, विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन आणि विस्तार
ही तीन प्रमुख कार्ये असली तरी आदर्श कृषि पदवीधर घडविणे हेच विद्यापीठाचे अंतिम ध्येय
आहे. विद्यार्थ्यांमध्ये चांगला माणूस, जबाबदार नागरिक आणि शेतकऱ्यांच्या
कल्याणासाठी समर्पित कृषि व्यावसायिक घडविण्यासाठी विद्यापीठातील शिक्षक व अधिकारी
सातत्याने प्रयत्नशील आहेत. विद्यार्थ्यांनी ज्ञानाबरोबरच संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सामाजिक उत्तरदायित्वही जोपासावे,
असे त्यांनी नमूद केले.
यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित
करत युवा पिढीने व्यसनमुक्त, निरोगी आणि सुदृढ जीवनशैली स्वीकारून समाजासाठी आदर्श निर्माण
करावा, असे आवाहन केले.
विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे यांनी आपल्या मनोगतात छत्रपती संभाजीनगर येथे विद्यापीठाचे
कृषि महाविद्यालय स्थापन करण्यामागील विद्यापीठ व शासनाची भूमिका स्पष्ट केली. या प्रक्रियेत
प्राचार्य डॉ. सूर्यकांत पवार यांनी प्रशासकीय स्तरावर मोलाचे सहकार्य केल्यामुळेच
महाविद्यालयाच्या उभारणीचा महत्त्वपूर्ण टप्पा गाठणे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सहयोगी अधिष्ठाता डॉ. सूर्यकांत पवार यांनी प्रास्ताविक
केले. कार्यक्रमास शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि) डॉ. बाबासाहेब ठोंबरे, डॉ. सचिन मोरे,
डॉ. दीप्ती पाटगावकर, डॉ. कलालबंडी, डॉ. दत्ता मुळे यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित
होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष बागडे यांनी केले, तर
आभार प्रदर्शन डॉ. संतोष ढगे यांनी केले.
कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी डॉ. दिलीप
हिंगोले, डॉ. चंद्रकांत पाटील, डॉ. ज्ञानेश्वर मुटकुळे,
डॉ. सुरेखा कदम, डॉ. संतोष ढगे तसेच कृषि विज्ञान
केंद्रातील डॉ. अनिता जिंतूरकर, डॉ. संजुला भावर, डॉ. बसवराज पिसुरे यांच्यासह उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.



.jpeg)

